Join us  

३१ टक्के मुंबईकरांना मनोविकार! २३ टक्के नागरिकांना रक्तदाबाचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 3:55 AM

पालिकेच्या रुग्णालय आणि दवाखान्यांमध्ये जाऊन गेल्या दोन वर्षांत केलेल्या अभ्यास विश्लेषणात ३१ टक्के मुंबईकरांना मनोविकारांशी संबंधित आजार असल्याचे दिसून आले आहे.

मुंबई : पालिकेच्या रुग्णालय आणि दवाखान्यांमध्ये जाऊन गेल्या दोन वर्षांत केलेल्या अभ्यास विश्लेषणात ३१ टक्के मुंबईकरांना मनोविकारांशी संबंधित आजार असल्याचे दिसून आले आहे. त्या खालोखाल सुमारे २३ टक्के मुंबईकरांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर, रुग्णसंख्येच्या प्रमाणानुसार अनुक्रमे प्राणी दंश, हृदयविकार, डेंग्यू, दमा, अनाकलनीय ताप, जुलाब व मलेरिया या आजारांचा समावेश आहे.महापालिकेची ४ प्रमुख रुग्णालये, १५ उपनगरीय रुग्णालये आणि १७५ दवाखान्यांमध्ये जाऊन आॅक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीचा केलेल्या अभ्यासाचा अहवालात समावेश आहे. त्यात ७२ लाख ६१ हजार १३० रुग्णांशी संबंधित माहितीचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्यात आले. या व्यतिरिक्त ७ दिवस रुग्णालयात वा दवाखान्यात प्रत्यक्ष जाऊन बाह्यरुग्ण किंवा आंतररुग्ण म्हणून दाखल झालेल्या १ लाख १३ हजार ४७२ रुग्णांच्या माहितीचादेखील अभ्यास करण्यात आला आहे.यानुसार, तब्बल ७३ लाख ७४ हजार ६०२ रुग्णांच्या माहितीवर आधारित अभ्यास अहवाल नुकताच महापालिका प्रशासनास सादर करण्यात आला आहे.हा अभ्यास अहवाल महापालिका प्रशासनास सादर करण्याच्या निमित्ताने, नुकतेच विशेष कार्यशाळेचे आयोजिन करण्यात आले होते. या एक दिवसीय कार्यशाळेला महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे, शीव रुग्णालयाच्या अधिष्ठात्री डॉ. जयश्री मोंडकर, भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे डॉ. दीपक राऊत व डॉ. एस. सुधाकर, महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर, मनपा विशेष रुग्णालयांचे प्रमुख डॉ. शशिकांत वाडेकर, बा.य.ल. नायर रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नर्सी, कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने तज्ज्ञ डॉक्टर मंडळी उपस्थित होती.महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या आरोग्य व वैद्यकीय सेवा सुविधांशी संबंधित भविष्यातील दिशा निश्चित करण्याच्या प्रमुख उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. शीव परिसरातील ‘लोकमान्य टिळक मनपा सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय’ येथील समुदाय औषधशास्त्र विभाग आणि महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे संयुक्तपणे हा अभ्यास प्रकल्प करण्यात आला. शीव रुग्णालयातील समुदाय औषधशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सीमा बनसोडे-गोखे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात ५१ तज्ज्ञ डॉक्टरांसह संबंधित कर्मचारी सलग ७ महिने या प्रकल्पावर काम करत होते.७३ लाख ७४ हजार ६०२ रुग्णांची तपासली माहिती- प्रमुख रुग्णालयातील ५ लाख ७८ हजार ८८६, उपनगरीय रुग्णालयांमधील ५ लाख ४६ हजार ५४० आणि मनपा दवाखान्यांमध्ये येऊन गेलेले ६२ लाख ४९ हजार १७६ रुग्ण, यानुसार एकूण ७३ लाख ७४ हजार ६०२ रुग्णांशी संबंधित माहिती अभ्यासण्यात आली आहे.तथापि, क्षयरोग किंवा एचआयव्ही एड्स यासारख्या आजारांचा अभ्यास व संशोधन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असल्याने, त्यांचा समावेश या अभ्यासात करण्यात आला नव्हता, अशी माहिती शीव रुग्णालयाच्या समुदाय औषधशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सीमा बनसोडे-गोखे यांनी दिली.केइएम, सायन, नायर आणि कूपर रुग्णालयातील दोन वर्षांतील रुग्ण संख्येचा अभ्यास -आॅक्टो. २०१५ ते सप्टें. २०१७एकूण रुग्ण - ५,५९,९५४ रुग्ण(रुग्णसंख्या टक्केवारीत)३१.१४ मनोविकार२३.२२ मधुमेह२२.७८ रक्तदाब९.९५ श्वान/प्राणी दंश७.४९ हदयविकार१.५ डेंग्यू१.४ दमा१.३८ अनाकलनीय ताप०.६१ जुलाब०.५३ हिवताप

टॅग्स :मुंबई