Join us

मुंबईत ३ लाख १९ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:07 IST

मुंबई : कोरोनाच्या दोन लाटांवर नियंत्रण मिळविल्यानंतर एकीकडे तिसऱ्या लाटेचा इशारा असताना अजूनही शहर - उपनगरातील १०० टक्के आरोग्य ...

मुंबई : कोरोनाच्या दोन लाटांवर नियंत्रण मिळविल्यानंतर एकीकडे तिसऱ्या लाटेचा इशारा असताना अजूनही शहर - उपनगरातील १०० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, मुंबईत सुमारे ३ लाख ७० हजार आरोग्य कर्मचारी आहेत. मात्र त्यातील ३ लाख १९ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे; शिवाय दुसऱ्या लसीच्या डोसच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाभार्थ्यांची संख्याही मोठी आहे.

मुंबई महापालिका प्रशासनाने तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सेवा - सुविधांसह नियमांची कठोर अंमलबजाणीचे निर्देश दिले आहेत. तर दुसऱ्या बाजूला लसीकरणावरही भर दिला जात आहे. मात्र लसीचे मर्यादित डोस, सततच्या कामाच्या वेळा आणि अन्य कारणांमुळे आरोग्य कर्मचारी लसीकरणापासून अजूनही वंचित असल्याचे दिसते आहे.

राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईतील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे प्रमाण दिलासादायक आहे. मुंबईत आतापर्यंत २ लाख ४७ हजार ७३६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर १ लाख ४९ हजार ४८६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत एकूण ३ लाख ५४ हजार २२२ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे.

एकूण आरोग्य कर्मचारी – ३ लाख ७० हजार

पहिला डोस – २ लाख ४७ हजार ७३६

दोन्ही डोस घेणारे – ३ लाख १९ हजार

एकही डोस न घेतलेले – सुमारे ३४ हजार

फ्रंटलाइन वर्कर्स – ४ लाख ८० हजार

पहिला डोस किती जणांनी घेतला - २ लाख ४६ हजार ५७९

दोन्ही डोस घेणारे – ३ लाख ६९ हजार

एकही डोस न घेतलेले – सुमारे ६५ हजार

लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील

मुंबईत लसीकरणाविषयी उदासीनता नाही, मात्र काही कारणास्तव अजूनही आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. पालिकेकडून सातत्याने या गटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या एकूण संख्येच्या तुलनेत अत्यल्प लाभार्थ्यांचे लसीकरण राहिले असून, लवकरच हे पूर्ण करण्यात येईल.

- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पालिका