Join us  

मुंबईच्या तलावांमध्ये २५ टक्के जलसाठा जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 1:07 AM

मुंबईकरांना दिलासा; आणखी दहा लाख ८७ हजार दशलक्ष लीटर पाण्याची गरज

मुंबई : तलाव क्षेत्रात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. गेल्या तीन दिवसांत तब्बल एक लाख ८६ हजार दशलक्ष लीटरने जलसाठा वाढला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आता २५ टक्के जलसाठा जमा झाला आहे. तीन महिने पुरेल एवढा हा जलसाठा आहे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

जून महिना कोरडा गेल्यामुळे मुंबईत पाण्याचे टेन्शन वाढले होते. तलावांमध्ये पाण्याच्या पातळीत सतत घट होत राहिल्याने, पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे होती.महापालिकेने शासकीय धरणातील राखीव जलसाठ्यातून पाणीपुरवठा सुरू केला होता. मात्र, जूनच्या अखेरीस पावसाने तलाव क्षेत्रात जोरदार हजेरी लावली. जुलै महिन्यात ठाणे जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस सुरू असल्याने, तलावांमधील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे.

वीकेंडच्या दिवशी तलावांमध्ये पावसाने मुक्कामच केला, यामुळे सलग तीन दिवस जलसाठ्यात दररोज पाच टक्क्यांची वाढ होत आहे. शनिवारी ३८ हजार दशलक्ष लीटर, रविवारी ९० हजार दशलक्ष लीटर तर सोमवार सकाळपर्यंत तलावांमध्ये एकूण ५८ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला होता. त्यामुळे तलाव भरण्यास आता आणखी दहा लाख ८७ हजार दशलक्ष लीटरने जलसाठा वाढण्याची गरज आहे.सुमारे ९०० दशलक्ष लीटर साठा जातो वायामुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. सध्या तलावांमध्ये तीन लाख ६० हजार ९२५ दशलक्ष लीटर जलसाठा जमा आहे.मुंबईला दररोज ३,८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. जूनमध्ये पावसाने पाठ फिरविल्यामुळे १५ नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. पाणीगळती व चोरीद्वारे सुमारे ९०० दशलक्ष लीटर जलसाठा वाया जातो. सध्या पाऊस चांगला पडत असल्याने, तसेच तलावातील जलसाठ्यात वाढ होत असल्याने, मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.