Join us  

देशभरात २२६ महिलांची बलात्कारानंतर हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 4:11 AM

मनीषा म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : साकीनाकातील बलात्कार, हत्या प्रकरणाने देश हादरला. मात्र, मानवतेवर काळिमा असलेली गुन्हेगारी प्रवृत्ती ...

मनीषा म्हात्रे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : साकीनाकातील बलात्कार, हत्या प्रकरणाने देश हादरला. मात्र, मानवतेवर काळिमा असलेली गुन्हेगारी प्रवृत्ती एका ठिकाणापुरती मर्यादित नाही. गेल्यावर्षी देशभरात २२६ महिलांची बलात्कार आणि सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आली आहे. त्यापैकी २३ महिला महाराष्ट्रातील होत्या.

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) बुधवारी जारी केलेल्या अहवालानुसार गेल्यावर्षी अशाप्रकारचे सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात (३१) नोंद झाले. त्याखालोखाल मध्यप्रदेश (२७), आसाम (२६) आणि महाराष्ट्राचा (२३) क्रमांक लागतो. तसेच यामध्ये मुंबईतील दोन जणींचा समावेश आहे. २०१९ च्या तुलनेत हा आकडा ६० ने कमी आहे. या अहवालानुसार गेल्या वर्षी सर्वाधिक महिलांविरोधी ४९ हजार ३८५ इतके गुन्हे उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आले. त्याखालोखाल पश्चिम बंगाल (३६,४३९), राजस्थान (३४,५३५) तर महाराष्ट्रात ३१ हजार ९५४ गुन्हे नोंद केले गेले. २०१९ च्या तुलनेत ५ हजार १९० ने गुह्याचे प्रमाण कमी झाले आहे.

बलात्कार, हत्येपाठोपाठ महिलांना विविध कारणांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्यातही महाराष्ट्र आघाडीवर आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्रात ८४४, मध्यप्रदेश ७४४ आणि पश्चिम बंगालमध्ये ४९० महिलांना आत्महत्या करण्यासाठी भाग पाडण्यात आले. २०१९ मध्ये महाराष्ट्रात ८०८ महिला-तरुणींनी दबावाला बळी पडून आत्महत्या केल्या होत्या. लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार नोंद गुन्ह्यांमध्येही महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे. विविध कारणांसाठी अपहरण, विनयभंग, हुंड्यासाठी छळ या गुन्ह्यांचेही राज्यात प्रमाण अधिक आहे.

.....

महिला अत्याचारात मुंबई दुसऱ्या स्थानी

एनसीआरबीच्या अहवालानुसार महिला अत्याचारात पहिल्या वीस शहरांमध्ये राज्यातील मुंबई, नागपूर आणि पुणे शहरांचा समावेश आहे. महिलांविरोधी गुन्ह्यांत दिल्ली पहिल्या क्रमांकावर (९ हजार ७८२) तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर (४ हजार ५८३) आहे. लोकसंख्येच्या तुलनेने मुंबईचा महिलांसंबंधित गुन्हे दर ५३.८ टक्के आहे. नागपूर शहरात ९२० गुन्हे नोंद झाले आहेत; तर पुण्यात १ हजार ५५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

.....