समीर कर्णुक, मुंबई - महापालिकेच्या एम (पूर्व) विभागातील मानखुर्द आणि गोवंडी परिसरात अनधिकृत बांधकाम करणार्या तब्बल २१ खासगी बांधकाम ठेकेदारांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये महानगर प्रादेशिक नगर योजना (एमआरटीपी) कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इतकी मोठी कारवाई होण्याची ही मुंबईतील पहिलीच घटना असून लवकरच त्यांनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवरही हातोडा फिरवला जाणार असल्याचे संकेत अधिकार्यांकडून देण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांत गोवंडीतील शिवाजी नगर आणि ट्रॉम्बेतील चिता कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. काही राजकीय नेते, पोलीस आणि पालिका अधिकार्यांच्या आशीर्वादाने सर्व नियम धाब्यावर बसवत ही बांधकामे झाल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येतो. याच वरदहस्तामुळे आजवर या बांधकामांवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. कारवाई होत नसल्याने या परिसरात अनधिकृत बांधकाम करणार्या ठेकेदारांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पालिका आणि पोलीस अधिकार्यांसोबत आपले संगनमत असल्याचे सांगून या ठेकेदारांनी अनेक रहिवाशांना दोन आणि तीन मजल्याची अनधिकृत बांधकामे करून दिली आहेत. अशाच प्रकारे महिनाभरापूर्वी गोवंडी-शिवाजी नगर येथील प्लॉट नंबर ३८ मध्ये राहणार्या आयुब खान यांच्या घराचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले. सलीम टकल्या या ठेकेदाराला त्यांनी या बांधकामाचा ठेका दिला होता. या ठेकेदाराने बांधकामासाठी लागणारे विटा, सिमेंट आणि रेती असे साहित्य पोटमाळ्यावरच ठेवले होते. मात्र क्षमतेपेक्षा या साहित्याचे वजन अधिक झाल्याने पोटमाळाच कोसळला. त्यात आयुब खान यांची पत्नी अमीनाबी खान (४५) आणि मोठा मुलगा आरीफ खान (२८) या दोघांचा ढिगार्याखाली मृत्यू झाला तर त्यांची १२ वर्षांची एक मुलगी गंभीररीत्या जखमी झाली होती. या घटनेची गंभीर दखल घेत पालिकेच्या एम (पूर्व) विभागाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी या परिसरात होणार्या अनधिकृत बांधकामाला आळा घालण्यासाठी एक पथक तयार केले. त्यात या १६ अधिकार्यांचा समावेश असून त्यांनी गेल्या महिन्याभरात या परिसरातील हजारो अनधिकृत बांधकामांची यादी त्यांना सादर केली. तसेच ही बांधकामे करणार्या ४० ते ५० ठेकेदारांची यादी त्यांनी साहाय्यक आयुक्तांना दिली आहे. त्यानुसार यातील २१ ठेकेदारांची माहिती काढून त्यांच्यावर शिवाजी नगर, गोवंडी, ट्रॉम्बे, मानखुर्द आणि आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
२१ ठेकेदारांवर ‘एमआरटीपी’
By admin | Updated: May 30, 2014 00:58 IST