Join us  

महापालिकेला २०० कोटींचा दंड

By admin | Published: September 03, 2015 2:17 AM

महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापला जाणारा आयकर महापालिकेच्या वित्त विभागाने भरलेला नाही. परिणामी आयकर विभागाने महापालिकेला तब्बल २०० कोटी रुपयांचा दंड आकारला आहे

मुंबई : महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापला जाणारा आयकर महापालिकेच्या वित्त विभागाने भरलेला नाही. परिणामी आयकर विभागाने महापालिकेला तब्बल २०० कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. दुर्दैव म्हणजे एवढ्या रकमेचा दंड आकारूनही संबंधित विभागातील अधिकारी वर्गाचा हलगर्जीपणा सुरूच आहे. त्यामुळे आता आयकर विभागाकडून दंड आणि त्यावरील व्याज आकारण्याची कारवाई सुरू असल्याने महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे.बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे या विषयाकडे लक्ष वेधले. पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनातून जो आयकर कापण्यात येतो, तो पालिकेच्या वित्त विभागाने भरलेला नाही. त्यामुळे नियमानुसार आयकर विभागाने २००६ साली ७५ कोटी, २०१४-१५ साली १११ कोटी आणि यावर्षी साडेसहा कोटी अशा एकूण २०० कोटी रुपयांचा दंड आकारल्याचे देशपांडे यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. शिवाय अशाप्रकारे हलगर्जीपणा करणाऱ्या वित्त विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. त्यांच्या या मागणीला सर्वपक्षीय नगरसेवकांनीही पाठिंबा दिला. (प्रतिनिधी)