Join us  

एसी लोकलमध्ये नव्या रंगासह महिलांसाठी २ विशेष बोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 6:08 AM

महिला दिनाच्या ७२ तासांआधीच महिला प्रवाशांना पश्चिम रेल्वेने अनोखी भेट दिली आहे. वातानुकूलित लोकलमध्ये सोमवारपासून २ बोगी राखीव ठेवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

- महेश चेमटेमुंबई - महिला दिनाच्या ७२ तासांआधीच महिला प्रवाशांना पश्चिम रेल्वेने अनोखी भेट दिली आहे. वातानुकूलित लोकलमध्ये सोमवारपासून २ बोगी राखीव ठेवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.सामान्य लोकलप्रमाणे वातानुकूलित लोकलमध्येही महिला प्रवाशांसाठी राखीव बोगी असावी, अशी मागणी महिला प्रवाशांकडून करण्यात येत होती. ही मागणी मान्य करून पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकलमध्ये महिला राखीव बोगी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वातानुकूलित  महिला राखीव बोगी प्रवाशांना सहजपणे ओळखता यावी, यासाठी या बोगीला हिरवा रंग देण्यात आला आहे.प्रवाशांना वातानुकूलित लोकलबाबत हरकती आणि सूचना आॅनलाइन नोंदविता याव्यात, यासाठी पश्चिम रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर व्यवस्था केली आहे. सद्य:स्थितीत ३००पेक्षा जास्त प्रवाशांनी हरकती आणि सूचना नोंदविल्या आहेत. यात सर्वात जास्त म्हणजेच, २७ टक्के प्रवाशांनी एसी फे-या वाढवा, अशा सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर, एसी लोकलला अतिरिक्त थांबा द्या, मासिक प्रथम वर्ग पास वगळता अन्य पासधारकांना प्रवास करण्याची अनुमती द्यावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.चटकन लक्ष वेधण्यासाठी बोगीला हिरवा रंगगाडीच्या दोन्ही दिशेला महिलांसाठीची राखीव बोगी निश्चित करण्यात आली आहे. सध्या वातानुकूलित लोकल निळ्या आणि चंदेरी रंगात आहे.प्रवाशांना चटकन महिला बोगी ओळखता यावी, यासाठी राखीव बोगींना हिरवा रंग देण्यात आला आहे, असे पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी सांगितले.

 

टॅग्स :एसी लोकलमुंबई लोकल