Join us  

मुंबईतील २ लाख ९८ हजार विद्यार्थी जाणार दहावी, बारावीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:07 AM

शैक्षणिक नुकसान कसे भरून निघणार; विद्यार्थी, शिक्षकांना चिंतालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील पहिली ते आठवीप्रमाणेच नववी आणि ...

शैक्षणिक नुकसान कसे भरून निघणार; विद्यार्थी, शिक्षकांना चिंता

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील पहिली ते आठवीप्रमाणेच नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही यंदा वर्गोन्नती देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने नुकताच जाहीर केला. या निर्णयानुसार मुंबईतील तब्बल २ लाख ९८ हजार ६९८ विद्यार्थी वर्गोन्नत होऊन दहावी व बारावीच्या वर्गात जातील. शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षणामुळे नववीच्या विद्यार्थ्यांचा बराचसा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला आहे. मात्र, अकरावीची प्रवेशप्रक्रियाच अगदी मार्चपर्यंत सुरू होती. या विद्यार्थ्यांचा अकरावीचा काहीही अभ्यास झालेला नसताना, त्यांनी अकरावीच्या कोणत्याही वर्गांना उपस्थिती लावलेली नसताना त्यांना थेट बारावीच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. बारावीच्या महत्त्वाच्या वर्षासाठी अकरावीचा अभ्यासक्रम पाया मानला जात असताना या विद्यार्थ्यांना काहीही न शिकता बारावीचा अभ्यास कसा शिकवावा, हाच प्रश्न प्राचार्य आणि विषय शिक्षकांना पडला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अकरावीचे प्रवेश खूप उशिराने सुरू झाले. मागील काही आठवड्यांपर्यंत हे प्रवेश सुरू होते. यामुळे अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला नाही. विशेषतः विज्ञान शाखेच्या उशिरा प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना बारावीचे विषय थेट समजावून सांगणे प्राध्यापक, शिक्षकांसाठी अवघड काम होणार असल्याचे मत शिक्षकांनी मांडले.

दरम्यान, अकरावीचे ऑनलाइन प्रवेश जिथे जिथे उशिरा झाले आहेत तिथे तिथे विशेषतः शहरी भागात, त्या विद्यार्थ्यांचा आधी अकरावीचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याची व मगच बारावीच्या अभ्यासक्रमाकडे वळायची जबाबदारी ही शिक्षकांची राहणार असल्याचे राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाचे समन्वयक मुकुंद आंधळकर यांनी सांगितले. यासंदर्भात शिक्षण विभागाशी बोलणे झाले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची जबाबदारी शिक्षण विभाग व शिक्षकांनी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

* दहावीच्या अभ्यासाची तयारी

आम्ही वर्षभर ऑनलाइन अभ्यास केला. शाळेतून काही चाचण्याही झाल्या आहेत. त्यामुळे आता अभ्यासातील काही भाग साेडला तर दहावीच्या अभ्यासाची तयारी आहे. मात्र, कोरोना कमी होऊन पुढील वर्षात तरी शिक्षक आमचा राहिलेला अभ्यासाचा भाग व्यवस्थित समजावून सांगतील अशी अपेक्षा आहे.

- रिया सोनावणे, विद्यार्थिनी, नववी

* बारावीचा काही भाग कळणे अवघड

मी मध्यंतरी माझ्या मूळ गावी असल्याने अकरावीचा प्रवेश घ्यायला उशीर झाला. तोपर्यंत महाविद्यालयाचा बराचसा अभ्यासक्रम शिकवून झाला होता. आता लवकरच बारावीचे वर्ग सुरू हाेतील. मात्र, त्याआधी मला शिक्षकांकडून आधीच अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यावा लागणार आहे, त्याशिवाय बारावीचा काही भाग कळणे अवघड जाईल.

- हर्ष दुधाने, विद्यार्थी, अकरावी

* मागील अभ्यासक्रम पूर्ण करण्याची चिंता

अकरावीच्या अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश हे नुकतेच झाले आहेत. बाकीच्या विद्यार्थ्यांचा जवळपास अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला आहे. आता आम्ही लवकरच बारावीचे लेक्चर्स सुरू करणार आहोत. मात्र, त्याआधी या नवीन विद्यार्थ्यांचा मागील अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा, हा यक्षप्रश्न संस्थेपुढे आहे. त्यात ऑनलाइन शिक्षणामुळे हवा तेवढा वेळ विद्यार्थ्यांना देता येत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.

- सुभाष चंदनशिवे , प्राध्यापक, सेंट मेरी ज्युनिअर कॉलेज.

............................