Join us  

दहिसरमध्ये गुंडांकडून १७ रिक्षांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 2:34 AM

दहिसर (पू) येथील आनंदनगर परिसरात पार्किंगमध्ये लावलेल्या तब्बल १७ रिक्षांची तोडफोड झाल्याची घटना रविवारी रात्री घडली.

मुंबई : दहिसर (पू) येथील आनंदनगर परिसरात पार्किंगमध्ये लावलेल्या तब्बल १७ रिक्षांची तोडफोड झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. अज्ञात गुंडांनी केलेल्या या कृत्यामुळे लाखो रुपयांची हानी झाली आहे. स्थानिक राजकारणातून हे कृत्य करण्यात आले असून, पोलिसांकडून संबंधितावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप रिक्षाचालक व स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आला आहे. याबाबत दहिसर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दहिसर-आनंदनगर परिसरातील एक भूखंड पार्किंगसाठी ठेवण्यात आला आहे. त्याचा ठेका एक विधवा महिलेकडे आहे. रविवारी रात्री अज्ञातांनी रिक्षाच्या काचा फोडल्या. सीट व गालिचे फाडून त्याची नासधूस केली. परिसरातील कार्यकर्तेभवर कुमावत यांनी सांगितले की, स्थानिक गुंडांनी हे कृत्य केले असून, यापूर्वीही त्यांनी रिक्षांची मोडतोड केली होती. मात्र, पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची हिंमत वाढली आहे. ‘मी कर्ज काढून रिक्षा घेतली होती, नुकसानीत सुमारे दहा हजारांचा फटका बसला आहे. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती नुकसान झालेल्या एका रिक्षा चालकाने केली.या तोडफोडीमागे स्थानिक राजकारण असल्याचेही बोलले जात आहे. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींचा शोध पोलीस घेत असून, लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील, असे दहिसर पोलिसांकडून सांगण्यात आले.>कांदिवलीत तीन मोटारसायकली पेटविल्याकांदिवली पश्चिमच्या शिवसेना मैदानात पार्क करण्यात आलेल्या तीन मोटरसायकली रविवारी अज्ञाताने पेटविल्या.गर्दुल्याकडून हे कृत्य झाले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ज्वालाग्राही पदार्थ टाकून सीट जाळून टाकण्यात आल्या आहेत.