Join us  

साथीच्या आजारांनी अडीच वर्षांत १ हजार ६७४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 5:33 AM

सध्या मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तर राज्यात पावसाने हजेरी लावली आहे.

- स्नेहा मोरे मुंबई : सध्या मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तर राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसासह बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांचा प्रादुर्भावही दिसून येतो आहे. परिणामी २०१७, २०१८ ते १५ जुलै २०१९ पर्यंत म्हणजे गेल्या अडीच वर्षांत साथीच्या आजारांनी १ हजार ६७४ मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात १ हजार ४३१ म्हणजेच सर्वाधिक मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, गेल्या अडीच वर्षांत हिवतापाचे ३० हजार ७८९ रुग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल डेंग्यूचे २० हजार ९९ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय, जपानी मेंदूज्वराचे अडीच वर्षांत ५० रुग्ण आढळले असून गेल्या वर्षी व यंदा मिळून दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर मागील अडीच वर्षांत इतर मेंदूज्वराच्या आजाराचे १२३ रुग्णांचे निदान झाले असून त्यात मागील दोन वर्षांत दोघांचा मृत्यू झाला आहे.याखेरीज, मागील अडीच वर्षांत उष्माघाताच्या आजाराच्या १ हजार ४१९ रुग्णांची नोंद झाली असून एकूण १८ जणांचा बळी गेला आहे. तर लेप्टोमुळे अडीच वर्षांमध्ये ३१ जणांचे मृत्यू ओढावले असून ७४३ लागण झाली आहे. राज्यात मागील अडीच वर्षांत चिकनगुनियाच्या २ हजार ६९४ रुग्णांची नोंद झाली आहे. माकडतापाच्या आजाराची अडीच वर्षांत ३९३ जणांना लागण झाली असून या आजाराने १९ जणांचा बळी घेतला आहे.साथीच्या आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यात साथरोगाचे दैनंदिन सर्वेक्षण, कीटकजन्य आजारासाठी कीटकशास्त्रीय सर्वेक्षण, उपचारासाठी आवश्यक औषधांची पुरेशी उपलब्धता, निदानासाठी प्रयोगशाळा सुविधा, स्वाइन फ्लू प्रतिबंधासाठी अतिजोखमीच्या व्यक्तींना ऐच्छिक व मोफत लसीकरण, पाणी गुणवत्ता नियंत्रण, साथरोग संदर्भात जनतेचे आरोग्य निरीक्षण, डासोत्पत्ती रोखण्यासाठी लोकसहभाग आणि सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.