15 days of ultimatum to insurance companies | विमा कंपन्यांना १५ दिवसांचा अल्टिमेटम
विमा कंपन्यांना १५ दिवसांचा अल्टिमेटम

मुंबई : बँका आणि विमा कंपन्यांनी १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा १६ व्या दिवशी आम्ही आक्रमक भूमिका घेऊन तुमच्या पेकाटात लाथ घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपन्यांना दिला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वांद्रे -कुर्ला संकुलातील ‘भारती अ‍ॅक्सा’ विमा कंपनीच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी बुधवारी धडक दिली. मुंबईमध्ये मोर्चा घेऊन काय करणार, असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, बँका, विमा कंपन्यांची कार्यालये इथे आहेत. त्यामुळे मोर्चा इथेच काढायला हवा. शेतकरी रक्त आटवतो, घाम गाळतो, तरीही चहूबाजूंनी तोच संकटग्रस्त झाला आहे. शेतकºयांच्या रक्ताशी आम्ही बांधील आहोत. विरोधकांनी काहीही टीका करू द्या, या टीकेला आम्ही भीक घालत नाही. आम्ही जे अन्न खाल्ले आहे. त्या अन्नाला आम्ही जागतो आहोत, असा टोलाही ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.
>बँकांना दिलेले कर्जमाफीचे पैसे गेले कुठे?
मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचे सर्व पैसे बँकांना दिल्याचे सांगितले आहे. २१ हजार कोटींची कर्जमाफी झाली असेल आणि सरकारने पैसे दिले असतील, तर ते पैसे गेले कुठे, याचा आम्हाला हिशेब हवाय. जसा विमा कंपन्यांना इशारा देतोय, तसा सर्वच बँकांनाही आज इशारा देतोय, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.


Web Title: 15 days of ultimatum to insurance companies
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.