Join us  

१४व्या वर्षी सोडले १४ वेळा घर, यापूर्वीही ‘मस्ती’ करण्यासाठी केले होते पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 2:38 AM

मजा-मस्ती म्हणून वयाच्या १४व्या वर्षी दोन भावंडांनी यापूर्वी १३ वेळा घर सोडल्याचा धक्कादायक प्रकार आरेमध्ये उघडकीस आला. तेव्हा एक ते दोन दिवसांतच नातेवाईक, शेजारच्यांच्या मदतीने ही मुले घरी परतली होती.

मनीषा म्हात्रे मुंबई : मजा-मस्ती म्हणून वयाच्या १४व्या वर्षी दोन भावंडांनी यापूर्वी १३ वेळा घर सोडल्याचा धक्कादायक प्रकार आरेमध्ये उघडकीस आला. तेव्हा एक ते दोन दिवसांतच नातेवाईक, शेजारच्यांच्या मदतीने ही मुले घरी परतली होती. मात्र, आता त्यांनी १४व्या वेळेस घर सोडले असून, पाच दिवस होऊनही ती न परतल्याने कुटुंबाची चिंता वाढली आहे. या प्रकरणी त्यांच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.गोरेगाव पूर्वेकडील वनीचा पाडा परिसरात ममता परशुराम पाडवी (३५) या गेल्या दोन महिन्यांपासून पती, मुलगा विष्णू (१२), मुलगी अपूर्वा (१४) आणि ८ महिन्यांची मुलगी कुशीसोबत राहतात. ममता या आंबे विक्रीचा व्यवसाय करतात. सकाळी ८ ते ५ त्या बाहेर असतात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे त्या ५ वाजता घरी परतल्या, तेव्हा विष्णू आणि अपूर्वा घरात नव्हते. आजूबाजूला शोध घेऊनही दोघेही न सापडल्याने त्यांनी अखेर पतीला कळविले.दोघांचा शोध सुरू केला. यापूर्वीही या दोन भावंडांनी मजा-मस्ती करण्यासाठी तब्बल १३ वेळा घर सोडले होते. त्या वेळेस नागरिकांनी त्यांना कधी रेल्वे स्टेशन, तर कधी जवळच्या परिसरातून एक-दोन दिवसांतच घरी आणून सोडले होते. दोघांनाही घर सोडून जाण्याची सवयच लागली होती. त्यामुळे या वेळेसही ते लवकरच परततील, असे आईवडिलांना वाटत होते. मात्र, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही.अखेर रात्री उशिराने त्यांनी आरे पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला. मात्र, पाच दिवस उलटूनही दोन्ही भावंडांचा शोध लागलेला नाही.>चौकशी सुरू :मुलांच्या शोधासाठी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येत आहेत. जवळचे नातेवाईक, मित्र-मंडळींकडेही चौकशी सुरू असल्याची माहिती, आरे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. हिरेमठ यांनी दिली; तसेच या मुलांबाबत काहीही माहिती समजल्यास, पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.>तीन भावंडे ११ दिवसांनी परतली‘पेपरमध्ये कमी मार्क मिळाले म्हणून घर सोडून जातो’ अशी चिठ्ठी लिहून दोन सख्या भावंडांनी ठाण्यातील चुलत भावासह १० फेब्रुवारी रोजी घर सोडले. चुलत भावाकडील ४ हजार रुपयांवर शिर्डी गाठली.तेथे मजामस्ती केली. अखेर १० दिवसांनी भक्तालयातील जेवणासाठीचेही पैसे खिशात न उरल्याने त्यांनी घराची वाट धरली. आणि अखेर १० दिवसांनी ही तिन्ही भावंडे घरी परतल्याचा प्रकार दहिसरमध्ये उघडकीस आला. मात्र, या घटनेमुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती.>महिला दिनीच मुलगी बेपत्ता : महिला दिनाच्या कार्यक्रमाला जाते असे सांगून आरे परिसरातून घराबाहेर पडलेली १२ वर्षांची मुलगी घरीच परतली नाही. बराच वेळ होऊन ती घरी न परतल्याने तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेच दिसून आली नाही. रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी आरे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला आहे.>सर्व बाजूंनी तपास सुरूमुले नेमकी कुठे गेली याचा शोध सुरू आहे. यासाठी सर्व बाजू पडताळण्यात येत आहेत. ते स्वत:हून गेले की त्यांचे कोणी अपहरण केले, हे तपासण्यात येत आहे. त्यासाठी नातेवाईक तसेच शेजारी आणि परिसरातील सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहोत.- डॉ. विनयकुमार राठोड,पोलीस उपायुक्त, परिमंडळ १२

टॅग्स :मुंबई