५ जणांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई
आंध्र प्रदेशमधून विक्रीसाठी आणलेला १३० किलो गांजा जप्त
५ जणांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आंध्र प्रदेश येथून मुंबईत विक्रीसाठी आणलेला १३० किलो गांजा जप्त करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हे शाखेच्या वरळी पथकाने ही कामगिरी केली असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
आंध्र प्रदेशचा रहिवासी असलेला दुर्गाप्रसाद स्वामी येडडू (२४), अंधेरीतील मोहम्मद हनीफ खान (३३), राजेश सुखराज जैस्वाल (४२), मोहम्मद निसार मोहम्मद अशफाक शेख (३१) आणि ठाणे येथील निजामुद्दीन अब्दुल लतीफ ऊर्फ शेफ (३३), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
कुर्ला येथील फिनिक्स मॉलजवळील एलबीएस मार्गावर आंध्र प्रदेश येथून एक जण गांजाच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती वरळी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रविवारी सापळा रचला. त्यांनी मिळालेल्या माहितीनुसार कारला अडविले. त्यात सहा रेक्झिनच्या पिशव्यांमध्ये १२९ किलो ९८० ग्रॅम गांजा मिळून आला. त्यानुसार, संबंधित तरुणासह एकूण पाच जणांना रात्री बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.