Join us

१२४ शिक्षक निवृत्ती वेतनापासून वंचित

By admin | Updated: June 12, 2014 23:55 IST

वसई पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील गोंधळ काही थांबण्याचे नांव घेत नाही.

वसई : वसई पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील गोंधळ काही थांबण्याचे नांव घेत नाही. सेवानिवृत्त शिक्षकांना श्रेणीनुसार निवृत्तीवेतन देण्याचा प्रस्ताव जि.प.कडे न पाठवल्यामुळे सुमारे १२४ सेवा निवृत्त शिक्षक अद्याप निवृत्ती वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांतील सेवानिवृत्त शिक्षकांचा प्रस्ताव यापूर्वीच पाठवण्यात आला व त्याचा लाभही देण्यात येत आहे. वसई शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराचा फटका या सर्व सेवानिवृत्त शिक्षकांना बसला. या प्रकरणी लोकमतने आवाज उठवल्यानंतर अधिकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी सदर प्रस्ताव पाठवला. परंतू तो केवळ ९२ सेवानिवृत्त शिक्षकांचाच उर्वरीत ३२ शिक्षकांची सेवा पुस्तिका सापडत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.राज्य शासनातर्फे सेवानिवृत्त शिक्षकांना निवड श्रेणीनुसार निवृत्ती वेतन दिले जाते. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत असलेले शिक्षण या सेवानिवृत्त शिक्षकांची यादी तयार करुन जि.प.कडे पाठवते व त्यानंतर त्यांना सुधारीत निवृत्तीवेतन मिळते. वसई वगळता अन्य तालुक्यांतील शिक्षकांना हा लाभ काही महिन्यापूर्वी मिळाला. परंतू वसईतून हा प्रस्तावच पाठवण्यात आला नाही. (प्रतिनिधी)