ठाणे : शहरात हरित क्षेत्र वाढविण्यासाठी ठाणे महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले असून हरित चळवळीच्या या पहिल्या टप्प्यात पालिकेने आतापर्यंत ११ हजार झाडे लावली आहे. या मोहिमेला खऱ्या अर्थाने १५ आॅगस्टपासून सुरु वात होणार असली तरी इतर सामाजिक संस्था व खाजगी विकासकांनीदेखील तेवढ्याच तत्परतेने यामध्ये सहभाग घ्यावा, यासाठी याची सुरु वात पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. संपूर्ण वर्षभरामध्ये केवळ २० ते ३० हजार झाडे लावण्यात येत असली तरी या दोन महिन्यांत पालिकेने तब्बल ११ हजार झाडे लावून इतरांनाही झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात होत असलेले शहरीकरण व अनेक बड्या विकासकांचे येऊ घातलेले गृहप्रकल्प यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. अनेक वेळा बेकायदेशीरपणे जुन्या वृक्षांची कत्तल केली जात असल्याचे प्रकार वृक्ष प्राधिकरण समितीकडून उघड करण्यात आले आहेत. २०१०-११ च्या वृक्षगणनेनुसार शहारात ४,५५,०७७ वृक्ष आहेत. ही संख्या अतिशय कमी असल्याने पालिका हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याची गरज निर्माण झाली आहे. हे हरित क्षेत्र वाढविण्यासाठी येत्या दोन वर्षांत ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये ५ लाख वृक्ष लावण्यात येणार आहेत. ठाणे महापालिकेबरोबरच खाजगी विकासक, सामाजिक संस्था, महाविद्यालये, वन विभाग, विविध प्रकारची प्राधिकरणे अशा अनेक जणांचा सहभाग घेतला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १ लाख झाडे लावण्यात येणार आहेत. जूनमध्येच पालिकेने या मोहिमेला सुरु वात केली आहे. अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात १५०० झाडे लावण्यात आली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आतापर्यंत ११ हजार झाडे लावण्यात आली आहेत.
पालिकेने लावली ११ हजार झाडे
By admin | Updated: August 11, 2015 01:30 IST