Join us  

नागरिकांच्या सुरक्षेसाठी ११ कोटी

By admin | Published: March 03, 2015 10:29 PM

अलिबाग नगरपरिषदेने आगामी आर्थिक वर्षाच्या ४२ कोटी ७६ लाख ६७ हजार ६४४ रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली आहे.

अलिबाग : अलिबाग नगरपरिषदेने आगामी आर्थिक वर्षाच्या ४२ कोटी ७६ लाख ६७ हजार ६४४ रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली आहे. त्यात सर्वाधिक ८ कोटी ३१ लाख ७६ हजार रुपयांची तरतूद आरोग्य उपाय योजनांकरिता करण्यात आली आहे. अलिबाग नगरपरिषदेचा २०१५-१६ चा अर्थसंकल्प डॉ. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात आयोजित सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सादर केला. चालू वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक २८ कोटी ९६ लाख ६७ हजार ६४४ रुपये इतके असून १३ कोटी ८० लाख प्रारंभीची शिल्लक रक्कम धरून ४२ कोटी ७६ हजार ६४४ रुपयांच्या या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली.नगरपरिषदेने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील रकमेपैकी सार्वजनिक सुरक्षिततेसाठी ११ कोटी ७८ लाख १ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी अग्निशमन विभागाची आस्थापना, वाहनदुरुस्ती, देखभाल, विमा, डिझेल व वंगण खरेदी करणे यासाठी २० लाख ५० हजार रुपये तर दिवाबत्तीसाठी ९० लाख ३१ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये आंग्रेसमाधी गार्डनमध्ये लाईट अँड साउंंड शो प्रकल्पासाठी ७ लाखांची अंदाजित खर्चाची तरतूद केली आहे.मोकाट कुत्र्यांपासून नागरिकांचे संरक्षण योजनेसाठी या अर्थसंकल्पात ५ लाख तर शहरातील काटेरी व निरूपयोगी वनस्पती काढण्यासाठी दोन लाखांची तरतूद आहे. साफसफाई आणि आरोग्यविषयक सोयीमध्ये गटार, नालेसफाई, सार्वजनिक शौचालय स्वच्छतेसाठी २८ लाख, जंतुनाशके, कीटकनाशके खरेदीसाठी ५ लाख, वृक्षलागवड व संवर्धन ४ लाख, उद्यान देखभाल व दुरुस्ती ३ लाख ५० हजार तसेच रस्ता रुंदीकरण अडथळे दूर करणे व लेव्हलिंग करून बांधकाम करणे १० लाख, पर्यटनास चालना मिळण्यासाठी महोत्सव व कार्यक्रम यासाठी ९ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. कुटुंब कल्याण, पल्स पोलिओ शासकीय कार्यक्रमांतील सहभाग यासाठी ५० हजारांची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्ष सुरक्षा शहा आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)सार्वजनिक आरोग्य, सोयी-सुविधांसाठी ८ कोटी ३१ लाख ७६ हजार रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये तलाव दुरुस्तीसाठी २ लाख तर जलशुद्धीकरणासाठी आवश्यक रसायने खरेदीसाठी १ लाखाच्या तरतुदीचा अंतर्भाव आहे. शिक्षणासाठी ५ लाख तर आपत्कालीन मदत, वृक्षसंवर्धन निधी आदी इतर अंशदानासाठी २ कोटी ६० लाख ७ हजारांची तरतूद आहे. यामध्ये प्रामुख्याने अपंग पुनर्वसनासाठी १० लाख, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ६ लाखांची तरतूद आहे.