Join us  

पवई तलावातील जलपर्णी काढण्यासाठी ११ कोटी

By जयंत होवाळ | Published: February 28, 2024 9:42 PM

पवई तलावातील वाढत्या जलपर्णी ही मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे.

मुंबई: पवई तलावातील वाढत्या जलपर्णी ही मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे. जलपर्णीमुळे तलावाच्या सौंदर्याला बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे या जलपर्णी आणि तलावातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्याची योजना पालिकेने हाती घेतली आहे. हार्वेस्टर यंत्र व एमफीबियस यंत्राच्या मदतीने जलपर्णी काढून टाकल्या जाणार आहेत. त्यासाठी तब्ब्ल सव्वा अकरा कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

पवई तलाव हा पूर्व उपनगरातील मुख्य पर्यटन स्थळ आहे. या तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तलावाचा परिसर अत्यंत सुंदर करण्यात आला असून त्या ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांचा ओढा वाढला आहे. रेतीच्या वेळेस तर या ठिकाणी फेरफटका मारण्यात वेगळाच आनंद मिळतो. मात्र तलावातील जलपर्णी वाढल्याने तलावाचे सौन्दर्य बाधित झाले आहे. त्यामुळे तलावाचे सौन्दर्य अबाधित राखण्यासाठी तसेच तलावातील जैव विविधतता जतन करण्यासाठी- संवर्धन करण्यासाठी सफाई मोहीम हाती घेतली जाणार आहे.

विशिष्ट यंत्रांच्या सहाय्याने जलपर्णी तसेच टाकाऊ पदार्थ बाहेर काढल्यानंतर त्यांची डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावली जाईल. या कामासाठी एस.के. डेव्हलपर्स या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून त्याने ८ कोटी ३७ लाख रुपयांची बोली लावून कंत्राट मिळवले आहे. विविध करांसह कंत्राटाची एकूण रक्कम ११ कोटी १८ लाख एवढी आहे. जलपर्णी काढण्याचे काम सहा महिन्यात पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील १८ महिने तलावाची देखभालही करायची आहे.

यापूर्वी २०१२ मध्ये जलपर्णी काढण्याचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र त्यानंतर पुन्हा जलपर्णी वाढली आहे. ० जलपर्णी घातक जलपर्णीची बेसुमार वाढ झाली की ती पाण्याचा पुष्ठभाग झाकून टाकते. त्यामुळे तलावातील जैव विविधततेपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचण्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे माशांचे खाद्य असणाऱ्या वनस्पतींची वाढ खुंटते. तसेच तलावाच्या पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन तापमानात फरक पडतो. जलपर्णीमुळे डासांची उत्पत्ती होते. ० दूषित पाण्याचा निचरा तलावातील दूषित पाणी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याशिवाय सांडपाण्याचा निचरा कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी स्वतंत्रपणे कार्यवाही केली जात आहे.

टॅग्स :मुंबई