Join us  

मुंबईच्या सिद्धांतला जेईई मुख्य परीक्षेत १०० पर्सेंटाइल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:07 AM

जेईई ॲडव्हान्सवर लक्ष्य केंद्रित करून आयआयटी मुंबईत प्रवेशाची इच्छालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जेईई मुख्य परीक्षा २०२१च्या जाहीर ...

जेईई ॲडव्हान्सवर लक्ष्य केंद्रित करून आयआयटी मुंबईत प्रवेशाची इच्छा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जेईई मुख्य परीक्षा २०२१च्या जाहीर झालेल्या निकालात देशातील सहा विद्यार्थी हे देशातून १०० पर्सेंटाइल (एनटीए स्कोअर) मिळवून अव्वल आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून मुंबईचा सिद्धांत मुखर्जी यानेसुद्धा बाजी मारली आहे. मुंबईच्या अंधेरीत राहत असलेल्या सिद्धांतने ॲलन अकॅडमीतून अभ्यास करत कोटा, राजस्थान येथून जेईई २०२१ची परीक्षा दिली. आयआयटी मुंबईच्या कम्प्युटर सायन्स शाखेत प्रवेश घेत करिअर करू इच्छिणारा सिद्धांत जेईई ॲडव्हान्सची तयारी करून अधिक चांगला रँक मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे सिद्धांताच्या आईने नमूद केले आहे.

दहावीपर्यंत बीकेसीतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेमधून झालेल्या सिद्धांतने पुढील शिक्षण दिशा डेल्फी पब्लिक स्कूलमधून घेतले आहे. कोविड-१९च्या काळामधील संधीचा फायदा घेत आपल्या प्रवासाचा वेळ वाचाव आणि ऑनलाइन क्लासेसवर पूर्ण लक्ष देऊन अभ्यास केल्याचे त्याने नमूद केले. या यशाने हुरळून न जाता आपले लक्ष्य हे जेईई ॲडव्हान्समध्ये चांगले गुण आणणे हे असल्याचे त्याने अधोरेखित केले. सिद्धांतचे वडील संदीप मुखर्जी यांची रिस्क मॅनेजमेंट कन्सल्टन्सी असून, आई नवनिता मुखर्जी या सीए आहेत. या दोघांच्याही आपल्या यशात मोलाचा वाटा असल्याचे सिद्धांतने सांगितले. विद्यार्थ्यांनी नेहमीच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, सीबीएसईचा अभ्यास करावा आणि परीक्षेची तयारी करावी, असा कानमंत्रही त्याने दिला.

जेईई मुख्य परीक्षा २०२१च्या काळात प्रवासाच्या कारणास्तव दूरवरील केंद्रावर जावे लागणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा ड्रॉप केली. मात्र आपल्याला तशा काहीच समस्या आल्या नाहीत आणि केंद्रावरील सुरक्षिततेची व्यवस्था ही चोख असल्याचे सिद्धांत याने सांगितले. सध्याच्या परिस्थितीत केंब्रिज विद्यापीठात त्याला प्रवेश मिळाला असूनही तो जेईई ॲडव्हान्ससाठी प्रयत्न करत आहे.

इनोव्हेट इन इंडिया फॉर इंडिया

शिक्षण कुठेही झाले तरी देशातील नागरिकांसाठी, त्यांचा वेळ वाचेल, त्यांच्या दैनंदिन वापरात उपयोग होईल असे काहीतरी आपल्याला शिक्षणातून भारतीयांसाठी करायचे असल्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे. हे संशोधन किंवा शिक्षणातून घडलेले उपक्रम देशवासीयांसोबतच जगालाही उपयुक्त होईल, असे कार्य करायचे असल्याचे सिद्धांताने नमूद केले आहे.