Join us  

१० टक्के आरक्षणाचा निर्णय विचारपूर्वकच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 6:08 AM

रेल्वेमंत्री पीयुष गोयल; ‘अच्छे दिन’ ही निरंतर प्रक्रिया

मुंबई : आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने विचारपूर्वकच घेतला असून तो निवडणुकीवर डोळा ठेवून घेतला नाही तर अत्यंत विचारपूर्वक घेतलेला आहे, असे रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी येथे पत्र परिषदेत सांगितले.समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी एखादा निर्णय घेताना त्याला कालमर्यादा असू शकत नाही. निवडणूक असो वा नसो तो घेणे आवश्यक असेल तेव्हा घेतलाच पाहिजे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांनाही आरक्षण असले पाहिजे, अशी लोकभावना होती आणि तिचा आमच्या सरकारने आदर केला, असे गोयल म्हणाले.

आपल्या सरकारने अच्छे दिन आणण्याचा दावा केला होता. ते आणता आले असे आपल्याला वाटते का, या प्रश्नात गोयल म्हणाले की, अच्छे दिनची प्रक्रिया निरंतर चालणारी आहे आणि आमच्या सरकारने ती वेगाने सुरू केली आहे. लोकांच्या जीवनमानात अनेक सुधारणा आम्ही केल्या. महागाई नीचांकावर आणली.

आम्ही पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वास आहे आणि अच्छे दिन पूर्णत: आलेले नक्कीच दिसतील. आम्ही देशाला भ्रष्टाचारमुक्त कारभार दिला, असा दावा त्यांनी केला. २०१४ च्या निवडणुकीत आम्ही ५१ टक्के मते घेतली होत पूर्ण बहुमत मिळविले होते. या वेळी तीन चतुर्थांश जागा आम्ही जिंकू आणि एनडीएचे सरकारच सत्तेत येईल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.

मुंबईला हक्काचे देतोय : गोयललोकल रेल्वेचे जाळे वाढविणे, रेल्वे स्थानकांचा दर्जा सुधारणे आणि अन्य प्रवासी सुविधा मिळविण्याचा मुंबईचा हक्क आहे आणि तो आम्ही देत आहोत. यापूर्वी कोणत्याही पाच वर्षांच्या कार्यकाळात रेल्वेबाबत मुंबईला मिळाले नाही ते आजच्या केंद्र व राज्य सरकारने दिले आहे असे पीयूष गोयल म्हणाले.

टॅग्स :पीयुष गोयल