Join us  

मद्यपी वाहनचालकाला १० दिवसांचा कारावास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:09 AM

ठाणे : मद्यधुंद अवस्थेत ३१ डिसेंबरला वाहन चालविताना ठाणे वाहतूक पोलिसांनी विटावा नाका येथे पकडलेल्या एका वाहनचालकासह सहप्रवाशाला ठाणे ...

ठाणे : मद्यधुंद अवस्थेत ३१ डिसेंबरला वाहन चालविताना ठाणे वाहतूक पोलिसांनी विटावा नाका येथे पकडलेल्या एका वाहनचालकासह सहप्रवाशाला ठाणे न्यायालयाने सात दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने या दोघांना सुरुवातीला १० हजार रुपये दंड ठोठावला होता. मात्र, ही रक्कम भरता न आल्याने त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. कळवा वाहतूक शाखेने त्या दिवशी पकडलेल्या उर्वरित २६ जणांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

३१ डिसेंबरच्या रात्री मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली होती. त्या रात्री ४१६ मद्यपी वाहनचालक आणि २०७ सहप्रवाशांवर पोलिसांनी कारवाई केली. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विटावा चौकी येथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस पथकाने एका मोटारसायकलस्वाराला रोखले होते. त्या चालकासह त्याच्यासोबतचा सहप्रवासी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. पोलिसांनी मोटार वाहन कायद्याचे कलम १८५ आणि १८८ अन्वये या दोघांवर कारवाई केली. न्यायालयाने त्यांना प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. परंतु, दंडाची ही रक्कम दोघांनीही भरली नाही. त्यामुळे त्यांची रवानगी तळोजा कारागृहात केल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

मोटार वाहन कायद्याचे कलम १८५ आणि १८८ अन्वये मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे किंवा अशा चालकासोबत प्रवास करणे यासाठी किमान दोन हजार रुपये दंड किंवा सहा महिने कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. परंतु, ३१ डिसेंबरच्या रात्री कळवा वाहतूक शाखेने पकडलेल्या १७ वाहनचालक आणि सात सहप्रवाशांना न्यायालयाने प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. कारागृहात रवानगी झालेल्या दोघांना वगळता उर्वरित २६ जणांनी दंडाची रक्कम भरली आहे.