शहरी स्वच्छ भारत मिशन : पाच वर्षांत होणार मोठे काम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात स्वच्छ भारतासाठी मोठ्या घोषणा केल्या. ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’ यावर जोर देताना त्यांनी शहरी स्वच्छ भारतावर विशेष लक्ष केंद्रीत केले. जल व वायू प्रदूषण वाढू नये, नागरिकांना स्वच्छ पाणी आणि हवा मिळावी, कचरा व्यवस्थापन करता यावे, यासाठी अर्थसंकल्पात १ लाख ४१ हजार ६७८ कोटी रुपयांची तरतूद आहे.
वाया जाणाऱ्या पाण्याचे नियोजन, कचरा वर्गीकरण, सिंगल युज प्लास्टिकचा वापर कमी करणे तसेच वायू प्रदूषण कमी करण्यावर जोर देण्यात आला आहे. बांधकामातील अनेक घटकांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. या प्रत्येक घटकाला आळा घालून शहरी स्वच्छ भारत मिशनची अधिक वेगाने अंमलबजावणी करण्यात येईल. स्वच्छ हवेवर लक्ष केंद्रीत करून त्यासाठी २०२१ ते २०२६ या पाच वर्षांत मोठे काम केले जाईल.
* सागरी जैवविविधता संवर्धनासाठी करणार ४ हजार कोटींपेक्षा जास्त खर्च
महासागरात खोलवर उत्खननासाठी आणि सागरी जैवविविधतेच्या संवर्धनासाठी पुढील पाच वर्षांसाठी ४ हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करून खोल महासागरी मोहीम सुरू करणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी भाषणात नमूद केले.
..........................