Join us  

नागपाडा, ताडदेवमधून १ कोटीचे एमडी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:06 AM

दाेघांना अटकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अमली पदार्थविरोधी पथकाने ताडदेव आणि नागपाडा परिसरातून अटक केलेल्या दुकलीकडून १ कोटी ...

दाेघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अमली पदार्थविरोधी पथकाने ताडदेव आणि नागपाडा परिसरातून अटक केलेल्या दुकलीकडून १ कोटी १६ लाख किमतीचा एमडीचा साठा जप्त केला.

ताडदेव परिसरात ड्रग्ज तस्करीसाठी आरोपी येणार असल्याची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन चव्हाण, अमर मराठे, सहायक फौजदार रणदिवे आणि अंमलदार यांनी मंगळवारी सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याच्या अंगझडतीतून तब्बल १ किलो १०५ ग्रॅम एमडीचा साठा सापडला. याची आंतरराष्ट्रीय बाजारात १ कोटी १० लाख रुपये किंमत आहे. मोहम्मद आरिफ अब्दुल गफार शेख (४३) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.

तर, साेमवारी नागपाडा परिसरात गस्त घालत असताना, कामरान जावेद शेख (३२) हा सहायक पोलीस निरीक्षक विवेक खवळे यांच्या पथकाच्या हाती लागला. त्याच्याकडून ६ लाख किमतीचा ६० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला. शेख हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर मरीन ड्राइव्ह, डोंगरी, एएनसीच्या आझाद मैदान पथक, वडाळा टी. टी., व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात ड्रग्ज संबंधित एकूण ५ गुन्हे, तर डोंगरी पोलीस ठाण्यात मारामारीच्या ४ गुन्ह्यांची नोंद आहे. तो मुंबईत ड्रग्जची विक्री करत असल्याची प्राथमिक माहिती असून पथक अधिक तपास करत आहे.

....................................................