Viewers will get musical treat from the movie 'Dokyala Shot' | 'डोक्याला शॉट'मधून प्रेक्षकांना मिळणार संगीतमय मेजवानी
'डोक्याला शॉट'मधून प्रेक्षकांना मिळणार संगीतमय मेजवानी

ठळक मुद्देहा चित्रपट जसा हटके आहे तशी गाणीसुद्धा हटकेच हवी

मार्च महिना म्हणजे आर्थिक वर्षातील शेवटचा महिना. त्यामुळे अनेकांच्या डोक्याला तसाही शॉट असतोच. हा तणाव जरा हलका करण्यासाठी 'अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन'ची निर्मिती असलेला 'डोक्याला शॉट' हा भन्नाट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चार ठार वेडे मित्र आणि एका 'शॉट'मुळे त्यांच्या आयुष्यात झालेला गोंधळ, असे धमाल कथानक असलेल्या या चित्रपटात सुव्रत जोशी, रोहित हळदीकर, ओंकार गोवर्धन, गणेश पंडित आणि प्राजक्ता माळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा जशी अफलातून आहे, तशीच चित्रपटातील गाणीही भन्नाट आहेत. मुळात या चित्रपटात आधी गाण्यांचा समावेश नव्हताच. परंतु चित्रपटाचे निर्माता उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांनी दिग्दर्शक शिवकुमार पार्थसारथी यांना चित्रपटात गाण्यांचा समावेश केला, तर चित्रपट अधिकच प्रभावी होईल, असे सुचवले. उत्तुंगची ही कल्पना दिग्दर्शकांनाही पटल्याने त्यांनीही हिरवा कंदील दिला. 

हा चित्रपट जसा हटके आहे तशी गाणीसुद्धा हटकेच हवी. म्हणूनच त्यांनी बॉलिवूडमधील आघाडीचे गायक मिका सिंग आणि कैलाश खेर यांना विचारणा केली आणि या दोघांनी होकारही दिला.अमितराज यांचे संगीत असलेल्या 'डोक्याला शॉट' या जल्लोषमय टायटल ट्रॅकला मिका यांचा आवाज लाभला आहे तर श्रीकांत - अनिता या नवोदित संगीतकारांच्या 'गुलाम जोरू का' या प्रत्येकाला थिरकायला लावणाऱ्या गाण्याला कैलाश खेर यांनी स्वरबद्ध केले आहे. चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे प्राजक्ता माळी आणि सुव्रत जोशी यांनी एक रोमॅंटिक गाणे गायले आहे. आणि तेही तामिळ भाषेत. या चित्रपटात प्रेक्षकांना मराठी गाण्यांत  दाक्षिणात्य तडका अनुभवायला मिळेल. त्यामुळे १ मार्च रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी संगीतमय मेजवानी ठरेल यात शंकाच नाही. 


Web Title: Viewers will get musical treat from the movie 'Dokyala Shot'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.