'फादर्स डे'च्या निमित्ताने 'जून' चित्रपटाकडून सर्व 'बाबां'ना अनोखी भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 12:33 PM2021-06-18T12:33:50+5:302021-06-18T12:34:44+5:30

'जून' चित्रपटातील 'बाबा' गाण्याचं रिप्राईज व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

A unique gift from the movie 'June' to all 'Baba's' on the occasion of 'Father's Day' | 'फादर्स डे'च्या निमित्ताने 'जून' चित्रपटाकडून सर्व 'बाबां'ना अनोखी भेट

'फादर्स डे'च्या निमित्ताने 'जून' चित्रपटाकडून सर्व 'बाबां'ना अनोखी भेट

googlenewsNext

बाबा... आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अशी व्यक्ती, जे आपल्या पाल्याला खुश ठेवण्यासाठी, त्याचे भविष्य घडवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करतात. प्रसंगी काही गोष्टींचा त्यागही करतात. कधी प्रेमाने समाजवतात, तर कधी कठोर बनतात. कधी स्वावलंबी होण्यासाठी काही गोष्टींची जबाबदारी घेण्यास सांगतात तर कधी कठीण काळात ठामपणे पाठीशी उभेही राहतात. जीवनात आधार देणारे, सोबत चालणारे आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे बाबा प्रत्येकासाठीच सुपरहिरो असतात. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातील या 'सुपरहीरो'ला 'फादर्स डे' च्या निमित्ताने एक अनोखी भेट देण्याचा प्रयत्न 'जून' चित्रपटाच्या टीमने आणि 'प्लॅनेट मराठी'च्या वतीने करण्यात आला आहे. 

'जून' चित्रपटातील 'बाबा' गाण्याचं रिप्राईज व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निखिल महाजन यांचे शब्द असलेल्या या गाण्याला शाल्मलीने संगीत दिले आहे तर आनंदी जोशीचा या गाण्याला आवाज लाभला आहे. या गाण्यात नेहा पेंडसे बायस, शाल्मली, आनंदी जोशी, रेशम श्रीवर्धन यांच्यासोबत सिनेसृष्टीतील अमृता खानविलकर, प्रिया बापट, गिरीजा ओक गोडबोले, मृण्मयी गोडबोले, पर्ण पेठे, गौरा नलावडे, संस्कृती बालगुडे या मैत्रिणींचीही या गाण्याला साथ लाभली आहे. 


'बाबा'विषयी भावना व्यक्त करताना शाल्मली म्हणते,''आपण अनेकदा वडिलांना द्यायला हवे तितके महत्व देत नाही. मला खूप अभिमान वाटतो, की 'जून'मधील 'बाबा' हे गाणे सोलो फिमेल ट्रॅक असून आनंदी जोशीने खूपच सुंदर गाणं सादर केलं आहे. जेव्हा जेव्हा मी हे गीत ऐकते तेव्हा तेव्हा मी कृतज्ञतेने भारावून जाते. मला खात्री आहे, की अशीच भावना प्रेक्षकांचीही असेल.मला असेही वाटते की हे गाणं ऐकून प्रेक्षक 'जून'शी अधिक खोलवर जोडले जातील.'' 


या गाण्याविषयी निर्माती, अभिनेत्री नेहा पेंडसे बायस सांगते,आयुष्यात भरभराट होण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते. जसे सचोटी, चिकाटी, प्रामाणिकपणा, तत्त्वे, मूल्ये हे सगळे गुण माझ्या बाबांमुळेच माझ्यात आले. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे माझ्या बाबांनी या गोष्टी मला कधीच सांगितल्या नाहीत. एकतर ते मितभाषी आहेत. त्यामुळे त्यांच्या कृत्यातून त्या मला समजत गेल्या. मी नेहमीच त्यांना नैतिक मूल्ये जपून आयुष्य भरभराटीला नेताना पाहिलं आहे आणि म्हणूनच ते माझ्यासाठी आदर्श आहेत. मी नक्कीच आईच्या खूप जवळ आहे मात्र मी बाबांसारखी आहे. त्यामुळे 'बाबा' या गाण्यातील बोल आमच्या नात्यासाठी अगदी तंतोतंत जुळणारे आहेत.


या गाण्याबद्दल चित्रपटाचे निर्माता आणि गीतकार निखिल महाजन म्हणतात, बाबा हे गाणं अशा व्यक्तीवर आहे ज्यांचे आपल्या आयुष्यात विशेष स्थान आहे. आपल्या आयुष्यातील 'बाबा' या खास व्यक्तीला हे गाणे 'जून' आणि 'प्लॅनेट मराठी'च्या वतीने समर्पित करण्यात येत आहे आणि यासाठी 'फादर्स डे'पेक्षा चांगला कोणता दिवस असूच शकत नाही.  तर या गाण्याविषयी 'प्लॅनेट मराठी'चे सीएमडी अक्षय बर्दापूरकर सांगतात, सगळ्याच 'बाबां'ना फादर्स डेच्या निमित्ताने हे गाणे समर्पित करण्यात आले आहे. तसेच या गाण्यात सहभागी झालेल्या माझ्या मैत्रिणींचेही मी 'प्लॅनेट मराठी'तर्फे विशेष आभार मानतो, कारण त्याच्या सहभागामुळेच  या गाण्याला चारचाँद लागले आहेत. मला आशा आहे, हे गाणे प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल.

सुप्री मीडियाचे शार्दूल सिंग बायस, नेहा पेंडसे बायस आणि ब्लू ड्रॉप प्रा. लि. चे निखिल महाजन आणि पवन मालू निर्मित, सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती दिग्दर्शित 'जून' या चित्रपटात नेहा पेंडसे  बायस, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन, निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवर 'जून' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: A unique gift from the movie 'June' to all 'Baba's' on the occasion of 'Father's Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.