महाराष्ट्राच्या इतिहासातील रणरागिणी 'छत्रपती ताराराणी' साकारणार सोनाली कुलकर्णी, पाहा तिचा लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 10:17 AM2021-02-15T10:17:58+5:302021-02-15T10:21:48+5:30

औरंगजेबासारख्या क्रूर,बलाढ्य आणि महत्वाकांक्षी पातशहाला लढा देणाऱ्या या रणरागिणीची शौर्यगाथा आणितिचे वैयक्तिक आयुष्य प्रेक्षकांना 'छत्रपती ताराराणी'च्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.

Sonalee Kulkarni to play 'Chhatrapati Tararani', Ranaragini On Screen, See Her First look | महाराष्ट्राच्या इतिहासातील रणरागिणी 'छत्रपती ताराराणी' साकारणार सोनाली कुलकर्णी, पाहा तिचा लूक

महाराष्ट्राच्या इतिहासातील रणरागिणी 'छत्रपती ताराराणी' साकारणार सोनाली कुलकर्णी, पाहा तिचा लूक

googlenewsNext

छत्रपती महाराणी ताराबाई भोसले... मोगलांना सळो की पळो करून सोडणारी ही रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या इतिहासातील एक कर्तृत्ववान राजस्त्री. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि छत्रपती राजाराम भोसले यांच्या पत्नी असणाऱ्या ताराबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीमहाराज यांच्यामागे कणखरपणे स्वराज्याची धुरा सांभाळली. त्या एक उत्तम राजकारणी, व्यवस्थापिका तर होत्याच याव्यतिरिक्त एक आदर्श सून, पत्नी आणि माता या जबाबदाऱ्याही त्यांनी लीलया पार पाडल्या. अशा या रणरागिणीची शौर्यगाथा सर्वांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने राहुल जनार्दन जाधव दिग्दर्शित 'छत्रपती ताराराणी' या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. डॉ. जयसिंगराव पवार लिखित 'मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी' या चरित्रग्रंथावर आधारित या चित्रपटात ताराराणीची भूमिका सोनाली साकारणार आहे. 

'छत्रपती ताराराणी' या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राहुल जाधव सांगतात, ''छत्रपती ताराराणी चित्रपटाद्वारे फक्त एक व्यक्तिचित्र रेखाटण्याचा नाही तर एक अद्वितीय व्यक्तिमत्व जगापुढे मांडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, ज्याचा आदर्श आजच्या पिढीने, विशेषतः स्त्रियांनी जरूर घ्यावा. कारण त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. स्त्रीशक्ती आणि स्त्री नेतृत्वाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे छत्रपती ताराराणी.शक्तीसोबत युक्तीचा आणि सामर्थ्यासोबत संयमाचा सुरेख संगम म्हणजे छत्रपती ताराराणी. त्या खऱ्याखुऱ्या सुपरहिरो आहेत आणि अशा सुपरवुमनचा आदर्श 'छत्रपती ताराराणी' या चित्रपटाच्या माध्यमातून पुढच्या पिढीसमोर ठेवताना एक दिग्दर्शक म्हणून मला अत्यंत समाधान वाटत आहे.'' 

‘’छत्रपती शिवरायांची शूर आणि कर्तबगार सून महाराणी ताराबाई, जिच्या कामगिरीला जगाच्या इतिहासात तोड नाही, असे उद्गार ॲरिझोना विद्यापीठातील डॉ. रिचर्ड ईटन या इतिहासकाराने काढले आहेत. खाफीखानासारख्या औरंगजेबाच्या चरित्रकारानेही तिचा गुणगौरव केला आहे. 'छत्रपती ताराराणी' या चित्रपटाच्या रूपाने जगाच्या इतिहासातील एक अद्वितीय व महान स्त्रीची कहाणी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणार आहे. ही गोष्ट ताराबाईंचा चरित्रकार म्हणून माझ्यासाठी खूप आनंददायी आहे.” असे 'मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी'या ग्रंथाचे लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांनी सांगितले. तर छत्रपती ताराराणींची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने सोनाली म्हणते, '' छत्रपती ताराराणींचे प्रेरणादायी आयुष्य आणि तडफदार व्यक्तिमत्व पडद्यावर साकारण्याचे भाग्य लाभणे  म्हणजे एका कलाकारासाठी किंबहुना एका मराठी मुलीसाठी तिच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याच बरोबरीने आजवर ज्या रणरागिणीविषयी कुठल्याही चलचित्र माध्यमात वाच्यता झालेली नाही  तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे गाणे हे अत्यंत आव्हानातमक काम असेल, त्यामुळे ही भूमिका मला खूपच जबाबदारीने पार पाडायची आहे. त्यासाठी श्रींचा आणि महाराजांचा आशिर्वाद आम्हाला लाभो, आई भवानीने आमच्या मनगटात ही कामगिरी पार पाडण्याचे बळ द्यावे, हीच प्रार्थना.'' 

 औरंगजेबासारख्या क्रूर,बलाढ्य आणि महत्वाकांक्षी पातशहाला लढा देणाऱ्या या रणरागिणीची शौर्यगाथा आणितिचे वैयक्तिक आयुष्य प्रेक्षकांना 'छत्रपती ताराराणी'च्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात होणार आहे.

Web Title: Sonalee Kulkarni to play 'Chhatrapati Tararani', Ranaragini On Screen, See Her First look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.