गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रथमेश परबच्या 'टकाटक २'च्या शूटिंगला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 08:45 PM2021-04-13T20:45:11+5:302021-04-13T20:45:47+5:30

गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त साधत ‘टकाटक २’च्या मुहूर्ताचा शॉट घेण्यात आला आहे.

Shooting of 'Takatak 2' begins on the auspicious occasion of Gudipadva | गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रथमेश परबच्या 'टकाटक २'च्या शूटिंगला सुरूवात

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रथमेश परबच्या 'टकाटक २'च्या शूटिंगला सुरूवात

googlenewsNext

२०१९ च्या पहिल्या सहामाहीच्या अखेरीस मराठी चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवर कमालीचा व्यवसाय करणाऱ्या ‘टकाटक’ या चित्रपटाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. प्रेक्षकांच्या याच प्रेमाखातर ‘टकाटक २’च्या रूपात या चित्रपटाचा पुढील भाग बनवण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या घोषणेनंतर लगेचच ‘टकाटक’च्या शूटिंगचा शुभारंभही करण्यात आला आहे. गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त साधत ‘टकाटक २’च्या मुहूर्ताचा शॉट घेण्यात आला आहे.

पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि.च्या बॅनरखाली बनवणा-या ‘टकाटक २’ची निर्मिती ओमप्रकाश भट्ट आणि धनजंय सिंग मासूम करीत असून सहनिर्माते आहेत जगत सिंग. ‘टकाटक’ या चित्रपटाप्रमाणेच ‘टकाटक २’च्या मोशन पोस्टरला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने संपूर्ण टीमला एक वेगळाच हुरूप आला आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात मराठी सिनेसृष्टी आणि मराठी रसिकांसाठी ही एक गोड आणि सुखद बातमीच आहे. मोशन पोस्टरला मिळालेल्या यशाचा आनंद सेलिब्रेट करीत ‘टकाटक २’च्या टीमने चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. पुन्हा एकदा या चित्रपटात प्रेक्षकांना तरूणाईवर आधारित असलेलं कथानक पहायला मिळणार असलं तरी सर्वच वयोगटातील रसिकांसाठी यात एक जबरदस्त मेसेज दडलेला असेल असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. ‘टकाटक २’ची संकल्पना मिलिंद कवडे यांचीच असून, कथा-पटकथाही त्यांनीच लिहिली आहे. किरण बेरड यांनी कथानाकाला पोषक असं संवादलेखन केलं आहे. पुन्हा एकदा या चित्रपटात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्रथमेशसह अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, भारत गणेशपुरे, आशा शेलार, किरण माने, पंकज विष्णू, निशा परूळेकर, राहुल बेलापूरकर, किरण बेरड, आरजे महेश काळे, अभय कुलकर्णा आणि इतर कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.


‘टकाटक २’च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना एक उत्तम कलाकृती देण्याचा आपला प्रयत्न असल्याची भावना मिलिंद कवडे यांनी व्यक्त केली आहे. रसिकांनी जसं ‘टकाटक’वर भरभरून प्रेम केलं तसेच ‘टकाटक २’वरही करावं आणि ते करतीलही अशी आशाही कवडे यांनी व्यक्त केली आहे. जय अत्रे यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केले असून, संगीत दिग्दर्शन वरूण लिखते यांनी केलं आहे. निलेश गुंडाळे कार्यकारी निर्मात्याच्या भूमिकेत असून या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणा-या कॅमेरामन हजरत शेख वली यांच्या नजरेतून नयनरम्य लोकेशन्समधील निसर्ग सौंदर्य प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत.

Web Title: Shooting of 'Takatak 2' begins on the auspicious occasion of Gudipadva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.