सयाजी शिंदेंचा 'फास' सिनेमा करणार शेतकऱ्यांच्या जीवनावर भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 03:03 PM2021-11-26T15:03:45+5:302021-11-26T15:04:12+5:30

सातत्याने वाढत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, निसर्गाचं असंतुलन व सरकारी धोरण यांचा शेतकरी व त्यांच्या कुटुंबांवर होणारा परिणाम या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

Sayaji Shinde's film 'Fas' will comment on the lives of farmers | सयाजी शिंदेंचा 'फास' सिनेमा करणार शेतकऱ्यांच्या जीवनावर भाष्य

सयाजी शिंदेंचा 'फास' सिनेमा करणार शेतकऱ्यांच्या जीवनावर भाष्य

googlenewsNext

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच ज्वलंत आणि ह्दयाला भिडणा-या कथांवर चित्रपट बनत असल्याचं जगजाहीर आहे. या कारणामुळेच मराठी चित्रपट नेहमीच जगभरातील आघाडीच्या सिनेमहोत्सवांमध्ये बाजी मारताना पहायला मिळतात. याच वाटेने जात देश-विदेशातील जाणकार प्रेक्षक आणि समीक्षकांची दाद मिळवणारा ‘फास’ हा आगामी मराठी चित्रपट ४ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजवर या चित्रपटाने देश-विदेशातील विविध नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये १३० पेक्षा अधिक पुरस्कारांवर आपलं नाव कोरण्यात यश मिळवलं असून, मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

माँ एंटरटेनमेंट प्रस्तुत माहेश्वरी पाटील चाकूरकर निर्मित ‘फास’ हा चित्रपट समाजातील सद्यस्थितीवर भाष्य करणारा आहे. नरेश पाटील, पल्लवी पालकर, दयानंद अवरादे, बसवराज पाटील, अनिल पाटील, वैशाली पद्देवाड हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. अविनाश कोलते यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाद्वारे अतिशय महत्त्वाच्या मुद्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. सातत्याने वाढत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, निसर्गाचं असंतुलन व सरकारी धोरण यांचा शेतकरी व त्यांच्या कुटुंबांवर होणारा परिणाम या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

फ्रान्समध्ये झालेल्या “कान’’ चित्रपट महोत्सवामध्ये स्क्रिनिंग झालेल्या ‘फास’चं जापान आणि पॅरिससारख्या देशांसह राजस्थान व नोएडासारख्या बऱ्याच ठिकाणी आयोजित होणाऱ्या चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुक करण्यात आले आहे. उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, कमलेश सावंत, पल्लवी पालकर, गणेश चंदनशिवे, नामदेव पाटील, निलेश बडे, ज्ञानेश उंडगवकर, उमेश राजहंस, शरद काकडे, ईश्वर मोरे, पवन वैद्य, विनय जोशी, देवा पांडे, पूजा तायडे, तेजस्विनी, माधुरी भारती आणि श्रृतिका लोंढे या कलाकारांनी यात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. समाजाभिमुख कथानक आणि मातब्बर कलाकारांच्या अभिनयाचं नैसर्गिक सादरीकरण या ‘फास’च्या मुख्य जमेच्या बाजू आहेत. याला प्रसंगानुरूप गीत-संगीताची जोड देत चित्रपटाच्या कथेत मांडण्यात आलेला विषय प्रेक्षकांच्या मनापर्यंत अचूकपणे पोहोचवण्याचं काम करण्यात आलं आहे. रिअल लोकेशन्सवरील चित्रीकरण प्रेक्षकांना रोमांचक अनुभव देणारं ठरणार आहे.
‘फास’ची कथा व संवादलेखन माहेश्वरी पाटील चाकूरकर यांचे असून पटकथा अविनाश कोलते यांनी लिहिली आहे. कॅमेरामन रमणी रंजन दास यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली असून अपूर्वा मोतीवाले व आशिष म्हात्रे यांनी संकलन केलं आहे. गीतकार अमोल देशमुख यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार ऍलन के. पी. यांनी संगीत दिलं आहे. कला दिग्दर्शन संतोष समुद्रे यांनी केलं आहे.

Web Title: Sayaji Shinde's film 'Fas' will comment on the lives of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.