बरेच दिवस चर्चेत असलेला, अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापूरे या दिग्गजांच्या अभिनयाने नटलेल्या 'प्रवास' या मराठी चित्रपटाचा प्रिमियर सोहळा बॉलीवूड तसेच मराठी सिनेसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच दिमाखात संपन्न झाला.

‘ओम छंगानी फिल्म्स’ निर्मित व शशांक उदापूरकर दिग्दर्शित ‘प्रवास’ चित्रपटाच्या प्रिमियरला ज्येष्ठ गायिका आशा भोसले, अभिनेत्री श्रद्धा कपूर, जुही चावला, पूनम धिल्लाँ, भाग्यश्री पटवर्धन, तेजस्विनी कोल्हापुरे, प्रियांक शर्मा, सिद्धांत कपूर तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, अवधूत गुप्ते, भरत दाभोळकर, निवेदिता सराफ, प्रतिमा कुलकर्णी, कांचन अधिकारी, स्वप्ना वाघमारे तसेच ज्येष्ठ गायक पद्मश्री अनुप जलोटा आदि मान्यवर उपस्थित होते.

आयुष्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. काहीजण संघर्षमयी जीवनासमोर हार पत्करतात तर काहीजण याच कष्टप्रद जीवनावर मात करून स्वतःचं जगणं जिद्दीने सकारात्मकरित्या घडवतात, हे दाखवून देणारा ‘प्रवास’ चित्रपट जगण्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी देतो असे सांगतानाच चित्रपटातील अभिनयापासून ते संगीतापर्यंत प्रत्येक गोष्टीचं कौतुक उपस्थित सेलिब्रिटींनी याप्रसंगी केलं.

माणसाच्या आयुष्यातील दोन क्षण फारच महत्त्वाचे असतात. पहिला जेव्हा त्याचा जन्म होतो, आणि दुसरा ‘आपण जन्माला का आलोय’? याची त्याला अनुभूती येते तो क्षण, त्यामुळे आपण जन्माला का आलोय, हे कळणे आणि त्या कळण्यातून आपण केलेली निवड आयुष्याला कलाटणी देत असते. ‘जे शेष आहे ते विशेष आहे’ असं सांगत जगण्याचा अशाच वेगळा अर्थ उलगडून दाखवणारा अनोखा ‘प्रवास’ येत्या शुक्रवारी आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापूरे यांच्या सोबत विक्रम गोखले, श्रेयस तळपदे, रजित कपूर, शशांक उदापूरकर यांनीही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.


 

Web Title: The premiere of 'Prawaas' in the presence of veterans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.