लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगा अभिनय बेर्डेने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. त्याच्या ती सध्या काय करते या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. तो एक चांगला अभिनेता, डान्सर असल्याचे त्याने या पहिल्या चित्रपटाद्वारे सिद्ध केले आहे. आता रंपाट या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करत असून या चित्रपटात अभिनयसोबत कश्मिरा परदेशी ही नायिका झळकणार आहे.

रंपाट या चित्रपटात अभिनय मिथुन ही भूमिका साकारत असून या मिथुनला सुपरस्टार बनायचे आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रवी जाधव, अभिनय बेर्डे, कश्मिरा परदेशी आणि झी स्टुडिओचे मंगेश कुलकर्णी यांनी नुकतीच लोकमतच्या ऑफिसला भेट दिली. यावेळी या सगळ्यांनी या चित्रपटाबाबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. या चित्रपटात अभिनय मिथुन ही व्यक्तिरेखा साकारत असून या मिथुनला अभिनयक्षेत्रात करियर करायचे आहे.

या चित्रपटात तुझे नाव मिथुन असल्याने याचा मिथुन चक्रवर्ती यांच्या नावाशी संबंध लावला जात आहे. तू स्वतः त्यांचा फॅन आहेस का असे विचारले असता त्याने मिथुन आणि त्याच्या वडिलांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. अभिनय सांगतो, मी मिथुन चक्रवर्ती यांचा खूप मोठा फॅन असून त्यांचे अनेक चित्रपट मी पाहिले आहेत. अग्निपथ या चित्रपटातील सगळे संवाद देखील माझे तोंडपाठ आहेत. माझी आई प्रिया बेर्डे तर त्यांची खूप मोठी चाहती आहे. माझे बाबा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते खूप चांगले मराठी बोलायचे. ते बाबांशी मराठीतच बोलायचे या त्यांच्या आठवणींविषयी मला माझ्या आईने सांगितले आहे. 

रंपाट या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओने केली असून या चित्रपटाचे संगीत चिनार-महेशने दिले आहे. या चित्रपटाची गाणी सध्या प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहेत. या चित्रपटात चित्रपटसृष्टीत करियर करू इच्छिणाऱ्या एका तरुण-तरुणीचा प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 


Web Title: Mithun chakraborty has good relationship with laxmikant berde reveals his son Abhinay Berde while promoting rampat marathi movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.