'माझ्या पिढीला "महाराज" तुम्ही दाखवलेत'; बाबासाहेब पुरंदरे यांना आस्ताद काळेचा मानाचा मुजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 03:37 PM2021-11-15T15:37:15+5:302021-11-15T15:39:25+5:30

Babasaheb purandare: आस्ताद काळेने अलिकडेच फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विशेष म्हणजे त्याने या पोस्टमध्ये लिहिलेला प्रत्येक शब्द नेटकऱ्यांच्या मनाला भिडला आहे.

marathi actor astad kale condoles demise shiv shahir babasaheb purandare | 'माझ्या पिढीला "महाराज" तुम्ही दाखवलेत'; बाबासाहेब पुरंदरे यांना आस्ताद काळेचा मानाचा मुजरा

'माझ्या पिढीला "महाराज" तुम्ही दाखवलेत'; बाबासाहेब पुरंदरे यांना आस्ताद काळेचा मानाचा मुजरा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज (१५ नोव्हेंबर) निधन झालं. गेल्या आठवड्याभरापासून बाबासाहेबांवर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, अखेर आज सकाळी ५.०७ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. बाबासाहेबांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली असून कलाविश्वातील काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली आहे. यामध्येच अभिनेता आस्ताद काळेने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.

आस्ताद काळेने अलिकडेच फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विशेष म्हणजे त्याने या पोस्टमध्ये लिहिलेला प्रत्येक शब्द नेटकऱ्यांच्या मनाला भिडला आहे.

"तीनशे वर्षं!!!! तीनशे वर्षं महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंध:काळात चाचपडत होता!!! वर्षातल्या बाराही अमावास्यांनी..जणू गराडा घातला होता!!! महाराष्ट्राची भूमी घोड्यांच्या टापांखाली वेदनांनी कण्हत होती, गा-हाणं गात होती......."
माझ्या पिढीला "महाराज" तुम्ही दाखवलेत, शिकवलेत. माझ्याच काय, आधीच्या दोन-तीन पिढ्यांनाही.
"आपला" हा डोळे दिपवणारा आणि मती गुंग करणारा इतिहास तुम्ही माझ्यासारख्या करोडोंसाठी "आपलासा" करून ठेवलात. त्या इतिहासाला नुसती सनांची वेष्टणं चढवून काहीसा रुक्ष न बनवता, त्याचं चित्तथरारक आणि अद्भुत कथारुपांतर करून घरोघरी पोचवलात, त्याची गोडी लावलीत.(अर्थात त्याला कुठेही बाधा न पोचवता.)
शिवाजीराजे, तानाजीराव, नेतोजीराव, बाजीप्रभू, मुरारबाजी, येसाजीराव, कोंडाजीराव, हिरोजीराव, कान्होजी, बाजी, सर्जेराव, गोदाजी, बहिरजी, दादोजी, संभाजी कावजी, गोदाजी असे कितीतरी नरवीरांची, आणि जिजाऊसाहेब, धाराऊ, सईबाईसाहेब, काशीबाईसाहेब अशा कितीतरी माउल्यांची पहिली ओळख तुमच्यामुळे झाली.
हे सारे माझ्यासह अनेकांसाठी कायमचे "SUPERHEROES" होऊन बसले ते तेव्हापासूनच. एवढं सगळं होऊनही तुमचं एक वाक्य आजही अचंबित करतं. "मला शिवराय फक्त ८% समजले."!!!!!! जवळजवळ ८ दशकं तुम्ही जो "एक मुजरा" करायला तळमळत असाल, तो तुम्हाला आता घालता आला असेल. तशी परवानगी राजांनीही दिली असेल तुम्हाला. तुमचा एक जीवाचा सवंगडीही भेटला असेल. पुन्हा "दुर्गभ्रमण" सुरू झालं असेल. हे सगळं असंच घडलं असणार असा माझा ठाम विश्वास आहे. कारण तुमची चेतना कालातीत आहे बाबा. ती कुठेही, कधीही स्वस्थ बसणार नाही.त्या चेतनेला, त्या ऊर्जेला.....आभार आणि आदरपूर्वक मुजरा", अशी पोस्ट आस्तादने लिहिली आहे. 

दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिआची लागण झाल्याने त्यांची प्रकृती खालावली होती, अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली होती. त्यानंतर, सकाळी रुग्णालय प्रशासनाने पत्रकाद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे 15 नोव्हेंबर 2021 रोजी पहाटे 5.17 मिनिटांनी निधन झाले. 

Web Title: marathi actor astad kale condoles demise shiv shahir babasaheb purandare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.