मुलींचे विश्व उलगडणारा 'गर्ल्स' चित्रपट 'या' ताखलेला रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 04:09 PM2019-09-21T16:09:56+5:302019-09-21T16:14:18+5:30

या चित्रपटात मुलींच्या दुनियेची अजब सफर तुम्हाला घडणार आहे.'गर्ल्स' हा चित्रपट २९ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Girls Marathi Movie | मुलींचे विश्व उलगडणारा 'गर्ल्स' चित्रपट 'या' ताखलेला रसिकांच्या भेटीला

मुलींचे विश्व उलगडणारा 'गर्ल्स' चित्रपट 'या' ताखलेला रसिकांच्या भेटीला

googlenewsNext


'बॉईज'च्या भावविश्वावर प्रकाशझोत टाकल्यानंतर आता 'गर्ल्स'च्या अनोख्या दुनियेची सफर घडवण्यासाठी दिग्दर्शक विशाल देवरूखकर सज्ज झाले आहेत. लवकरच मुलींचे विश्व उलगडणारा 'गर्ल्स' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. असं म्हणतात, की मुलींच्या मनाचा ठाव घेणं जरा कठीणच असतं आणि याचा अनुभव दिग्दर्शक विशाल देवरुखकर आणि लेखक हृषिकेश कोळी यांना सुद्धा 'गर्ल्स' साकारताना आला. सिनेसृष्टीला 'बॉईज' आणि 'बॉईज २' सारखे जबरदस्त हिट्स दिल्यानंतर विशाल देवरुखकर आणि हृषिकेश कोळी या जोडीला 'गर्ल्स' केंद्रित एखादा चित्रपट करायचा होता. तसंही मुलींच्या दुनियेची सफर घडवणारा विषय मराठी सिनेसृष्टीत फारसा हाताळलेला नाही. अखेर अनेक चर्चांअंती 'गर्ल्स'चा जन्म झाला. या 'गर्ल्स' कशा सापडल्या याबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणतात,'' मुलींचेही एक वेगळे जग असते, काही स्वप्नं असतात. त्यांचे हे जग पडद्यावर अद्याप फारसे उलगडलेले नाही त्यामुळे  याच अनोख्या जगाची ओळख करून देण्यासाठी आम्हाला 'गर्ल्स' हा चित्रपट करायचा होता.

 

मात्र 'बॉईज' आणि  बॉईज २' ची लोकप्रियता पाहता 'गर्ल्स' हा चित्रपटही त्याच तोडीचा, धमाकेदार असणे अपेक्षित होते. त्यात हा विषय मुळात थोडा वेगळा आणि कठीण होता. त्यामुळे हा चित्रपट करताना एक दडपणही होते. तरीही काही कल्पना डोक्यात ठेवून एक दिवस मी, हृषिकेश, आमचे निर्माता नरेन कुमार आणि डीओपी सिद्धार्थ जाटला यांनी बसून या विषयावर सामूहिक चर्चा केली आणि अखेर 'गर्ल्स'चा जन्म झाला. या सगळ्या प्रक्रियेत हृषिकेशची खूप मदत झाली. हा विषय कधी काळी हृषिकेशने हाताळला होता आणि तोच धागा पडकून आता हा चित्रपट येत आहे. 'बॉईज' आणि 'बॉईज २' एवढीच धमाल तुम्हाला 'गर्ल्स'मध्येही अनुभवयाला मिळेल.''


 'गर्ल्स'ची कल्पना कशी सुचली यावर लेखक हृषिकेश कोळी म्हणतात, '' २०१५ मध्ये मी साठ्ये महाविद्यालयातून मुलींच्या आयुष्यावर आधारित 'अर्बन' नावाची एकांकिका केली होती आणि त्यामधील मुलींचं भावविश्व यावर मला एक रोड मुव्ही लिहिण्याबाबत डोक्यात चक्र सुरु होते. 'बॉईज'च्या दरम्यानच माझ्या डोक्यात 'कमिंग ऑफ ऐज' या संकल्पनेला घेऊन ट्रायोलॉजी करण्याचं डोक्यात सुरू  झालेलं. त्यामुळे 'बॉईज'नंतर 'गर्ल्स' होणं साहजिकच होतं आणि त्या दिशेने प्रवास सुरु झाला. कौटुंबिक बंधनात अडकलेली कुठलीही मुलगी व्यक्त होण्यासाठी तिचा मार्ग आणि तिचं भावविश्व शोधत असते आणि तिला नव्याने पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं कशी सापडतात, याचा रंजक प्रवास दाखवणारी ही एक आजच्या मुलींची गोष्ट आहे.''
 या चित्रपटाविषयी नरेन कुमार म्हणतात, मी नेहमीच नवीन विषयांच्या शोधात असतो. 'चुंबक' सारख्या चित्रपटाच्या निर्मितीनंतर मी एका चांगल्या कथेच्या शोधात होतो. जेव्हा 'गर्ल्स'साठी मला विचारणा करण्यात आली, तेव्हा ही संकल्पनाच मला इतकी आवडली, की मी त्वरित होकार दिला. त्यात काहीतरी वेगळेपण आहे. हा चित्रपट सर्व वयोगटासाठी मनोरंजनात्मक असेल आणि 'बॉईज' आणि 'बॉईज २' ची लोकप्रियता पाहता 'गर्ल्स' हा चित्रपटसुद्धा तितकाच लोकप्रिय ठरेल, याची मला खात्री आहे. या चित्रपटात मुलींच्या दुनियेची अजब सफर तुम्हाला घडणार आहे.'गर्ल्स' हा चित्रपट २९ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Web Title: Girls Marathi Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.