प्रा. वामन केंद्रे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; 'राष्ट्रीय कालिदास सन्मान' पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 01:05 PM2021-11-25T13:05:26+5:302021-11-25T13:07:16+5:30

Waman kendre: हा पुरस्कार केंद्रे यांना त्यांच्या भारतीय रंगभूमीवरील योगदानासाठी घोषित करण्यात आला आहे.

bhopal declaration of national and state honors of madhya pradesh culture department waman kendre | प्रा. वामन केंद्रे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; 'राष्ट्रीय कालिदास सन्मान' पुरस्कार जाहीर

प्रा. वामन केंद्रे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; 'राष्ट्रीय कालिदास सन्मान' पुरस्कार जाहीर

googlenewsNext

मध्य प्रदेश शासनाच्या वतीने दिला जाणारा देशपातळीवरील सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठीत समजला जाणाऱ्या 'राष्ट्रीय कालिदास सन्मान २०२०' पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे  या वर्षासाठी प्रा. वामन केंद्रे यांना "राष्ट्रीय कालिदास सन्मान" जाहीर झाला आहे. हा पुरस्कार केंद्रे यांना त्यांच्या भारतीय रंगभूमीवरील योगदानासाठी घोषित करण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्यात प्रा. वामन केंद्रे यांना रोख दोन लाख रुपये आणि मंच सन्मान याने सन्मानित केलं जाणार आहे. 

 प्रा. केंद्रे यांनी भारतीय रंगभूमीचा ध्वज विश्वाच्या रंगमंचावर फडकवून तिला मानाचे स्थान प्राप्त करून दिलं आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं योगदान मोठं असून देशाने त्यांच्या नेतृत्वाखाली भरवलेलं ८ वे थिएटर ॲालंपिक्स हे त्याचे एक ठोस उदाहरण होय. 

भारतीय नाटकांना देशाच्या कानाकोप-यापर्यंत पोहंचविण्यासाठी त्यांनी केलेले आटोकाट प्रयत्नही अत्यंत महत्त्वाचे आणि पायाभूत मानले गेले आहेत. आदिवासी, लोक, हौशी,व्यावसायिक,शास्त्रीय तसेच वंचित कलावंतांना योग्य मंच मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले उपक्रम बेजोड ठरले आहेत. आपल्या अनन्य साधारण दिग्दर्शन शैलीमुळे आणि पथदर्शी नाट्य निर्मितींमुळे त्यांचे आज भारतीय रंगभूमीवरील स्थान आदर्शवत आणि अढळ ठरले  आहे. 
प्रा.वामन केंद्रे यांची गाजलेली नाटके

त्यांनी दिग्दर्शित केलेल्या असंख्य नाटकांनी भारतीय रंगभूमीवर इतिहास घडवला आहे. 'झुलवा', 'एक झुंज वा-याशी', 'दुसरा सामना', 'नातीगोती', 'तीन पैशाचा तमाशा','राहीले दूर घर माझे', 'गधे की बारात', 'सैंय्यॅां भए केोतवाल', 'टेम्ट मी नॅाट', 'लडी नजरिया', 'चार दिवस प्रेमाचे', 'रणांगण', 'ती फुलराणी', 'प्रेमपत्र', 'मध्यम व्यायोग', 'वेधपश्य' , 'मोहे पिया', 'मोहनदास', 'गजब तेरी अदा', 'लागी लगन', 'काळा वजीर पांढरा राजा' ही त्यांची अत्यंत गाजलेली नाटकं होत. 

प्रा.वामन केंद्रे यांना मिळालेले पुरस्कार

 प्रा.वामन केंद्रे यांना मिळणारा हा पाचवा राष्ट्रीय सन्मान आहे. यापूर्वी त्यांना पद्मश्री (२०१९), केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०१२), बी.व्ही.कारंत स्मृति पुरस्कार( २०१७,एनएसडी), मनोहर सिंग स्मृति पुरस्कार ( २००४,एनएसडी) प्राप्त झाले आहेत. राष्ट्रीय कालिदास सन्मान हा त्यांच्या शिरपेचातील आणखी एक मानाचा तुरा. 

राष्ट्रीय कालिदास सन्मान पुरस्काराने 'हे' दिग्गजही झालेत सन्मानित

आत्तापर्यंत कालिदास सन्मान हा शंभु मित्रा, इब्राहिम अल्काजी, हबीब तनवीर, बादल सरकार, ब.व.कारंत, पु.ल.देशपांडे,विजय तेंडुलकर, श्रीराम लागु, गिरीश कार्नाड,कावालम नारायण पण्णीकर, जोहरा सहगल, बाबासाहेब पुरंदरे, विजया मेहता, सत्यदेव दुबे, तापस सेन,रतन थियाम, बंशी कोल, अनुपम खेर, राज बिसारिया, राम गोपाल बजाज, देवेंद्रराज अंकुर आदि दिग्गज कलावंतांना त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी मिळाला आहे. 

Web Title: bhopal declaration of national and state honors of madhya pradesh culture department waman kendre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.