‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 01:52 PM2018-11-15T13:52:59+5:302018-11-15T14:10:08+5:30

मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.

'And ... Dr. Kishinath Ghanekar 'movie is a huge response to the audience! | ‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद!

‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद!

ठळक मुद्दे उतरती कळा लागल्यानंतर त्यांनी कसा स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला

मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. मराठी मध्ये पहिल्यांदाच डॉ.काशिनाथ घाणेकर यांच्यावर सिनेमा येत असल्याने या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचलेली होती. चित्रपटाचा विषय, त्यामधील तगडे कलाकार यामुळे चित्रपट बराच चर्चेत राहिला असून हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे. प्रेक्षकांच्या पसंतीचा कौल मिळाल्याने साहजिकच या चित्रपटाच्या शोच्या संख्येत प्रेक्षागृहांनी लक्षणीय वाढ केली आहे. 

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ८ नोव्हेंबर रोजी ‘आणि ... डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा  सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. त्या काळातील प्रभाकर पणशीकर, डॉ. श्रीराम लागू, सुलोचना, भालजी पेंढारकर आदींच्या व्यक्तिरेखाही प्रभावीपणे रेखाटल्या गेल्या आहेत आणि त्या अनुक्रमे प्रसाद ओक, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, मोहन जोशी यांनी साकारल्या आहेत. सुबोध भावे यांनी आजच्या पिढीसाठी डॉ. घाणेकर जिवंत केला आहे. त्यामुळे डॉ. घाणेकर हे सुबोध भावेसारखे दिसत असे कोणी म्हटल्यास आश्चर्य वाटायला नको. लेखन आणि दिग्दर्शनाद्वारे हे आव्हान अभिजीत देशपांडे यांनी लीलया पेलले आहे. 

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला, ‘मराठी रंगभूमीवर उभं रहाण्याची थोडीशी धडपड करणाऱ्या माझ्यासारख्या कलावंताच्या आयुष्यात मराठी रंगभूमीच्या पहिल्या सुपरस्टारची व्यक्तिरेखा येण ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. ‘आणि...डॉ.काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाच्या माध्यमातून डॉ.काशिनाथ घाणेकर यांचं चरित्र अभ्यासायला मिळालं, त्यांच्या विषयी ऐकायला मिळालं, त्यांच रूप पहायला मिळालं, त्यांनी केलेल्या नाटकातली स्वगतं सादर करायला मिळाली. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांना जवळून स्पर्श करू शकलो, त्याचबरोबर त्या काळातल्या, त्यांच्याबरोबरच्या अनेक समकालीन ज्येष्ठ श्रेष्ठ  दिग्गजांना देखील स्पर्श करू शकलो. मला अस वाटतं या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांनी रंगभूमीवरच्या या सर्व मानाच्या शिलेदारांना दिलेली ही आदरांजली आहे, आणि त्यांना केलेला सलाम आहे’. 

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांची भूमिका चित्रपटामध्ये सुमित राघवन याने साकारली असून या अनुभवाबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘अशा मोठ्या चित्रपटाचा भाग होणे माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. मराठी नाटक प्रेमींना मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास, तो सुवर्णकाळ तसेच त्या सुवर्ण क्षणांना पुन्हाएकदा बघण्याची संधी या चित्रपटाद्वारे  मिळणार आहे. याचबरोबर नवीन पिढीला त्याकाळातील दमदार अभिनेते आणि वैभवशाली रंगभूमीची परंपरा जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. मी स्वत: नाटक आणि रंगभूमीचा चाहता असल्याने मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो कि, मला ज्येष्ठ अभिनेते डॉ.श्रीराम लागू यांची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. यापेक्षा जास्त मी काय मागू शकतो .. 
 'उसमे क्या है', 'एकदम कडक',‘संभाजी म्हणजे बेदरकार, नजर अशी तीक्ष्ण आणि भेदक; ज्याची जरब खुद्द औरंगाजेबलाही बसली.’ ‘तू असामान्य आहेस, आजपासून काशिनाथ घाणेकर पर्व सुरु तर होतेय…’ ‘या थिएटरचा लांडगा एकच आहे आणि तो मी आहे मी…’ , ‘ जोपर्यंत आपण आपली स्वत:ची लाल करून घेत नाही तोपर्यंत लाल्या होत नाही’ हे चित्रपटातील संवाद काळजामध्ये घर करतात. 

'तुम्हावर केली मी मर्जी बहाल' आणि 'गोमू संगतीनं' ही गाणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहेत. डॉ. काशिनाथ घाणेकर कसे होते ? डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यातील रंगभूमीचे, नाटकाचे महत्व... उतरती कळा लागल्यानंतर त्यांनी कसा स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला... डॉ. काशिनाथ घाणेकर आणि इरावती घाणेकर तसेच डॉ. काशिनाथ घाणेकर आणि कांचन घाणेकर यांचा प्रवास ... अशा विविध छटा उत्तम प्रकारे सुबोध भावेने या चित्रपटामध्ये साकारल्या आहेत. या जोडीला वैदेही परशुरामी या उदयोन्मुख अभिनेत्रीच्या भूमिकेला प्रेक्षकांची वाहवा मिळत आहे. 

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अतुलनीय योगदान आहे. मराठी व्यावसायिक रंगभूमीला त्यांनी वैभवाचे दिवस आणले. आपल्या कसदार अभिनयानं घाणेकरांनी मराठी रंगभूमी समृद्ध केली त्यांच्या केवळ प्रवेशानं नाट्यगृह शिट्ट्या, टाळ्यांनी दणाणून जायचे. त्यांना भेटण्यासाठी नाट्य रसिकांमध्ये अक्षरश: झुंबड उडायची. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’,’इथे ओशाळला मृत्यू’,’अश्रूंची झाली फुले’, ‘गारंबीचा बापू’, ‘आनंदी गोपाळ’, ‘शितू’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’, ‘मधुमंजिरी’ या आणि अशा अनेक नाटकांमधील त्यांच्या भूमिका जबरदस्त गाजल्या.थोडक्यात काय तर मराठी चित्रपटसृष्टीतला सुवर्णकाळ अनुभवायचा असेल तर वायाकॉम18 मोशन पिक्चर्स  प्रस्तुत ‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ला पर्याय नाही. 

Web Title: 'And ... Dr. Kishinath Ghanekar 'movie is a huge response to the audience!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.