Alay Majha Rashila New Marathi Movie Shooting Start Soon | या कलाकरांच्या उपस्थितीत ‘आलंय माझ्या राशीला’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न, लवकरच होणार शूटिंगला सुरूवात

या कलाकरांच्या उपस्थितीत ‘आलंय माझ्या राशीला’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न, लवकरच होणार शूटिंगला सुरूवात

राशींच्या गुणधर्मानुसार व्यक्तीचा स्वभाव असतो, अशी ज्योतिषशास्त्रात मान्यता आहे. या राशींच्या वैशिष्ट्यातून अनेक गमतीजमती घडत असतात. अशाच बारा राशींच्या गमतीशीर कथा उलगडणारा ‘आलंय माझ्या राशीला’ हा मनोरंजनपर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच  अभिनेत्री निर्मिती सावंत व प्रसिद्ध वास्तुविशारद आनंद पिंपळकर यांच्या हस्ते संपन्न झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजित शिरोळे करणार आहेत. 


प्रत्येक व्यक्तीच्या राशीनुसार आणि स्वभावानुरूप घडणाऱ्या गमतीजमती दाखवणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची धमाल मेजवानी असेल असा विश्वास दिग्दर्शक अजित शिरोळे यांनी व्यक्त केला. ‘एक वेगळा विषय या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येतोय. या चित्रपटाची कथा कल्पना आवडल्याने तसेच आनंद पिंपळकर यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधामुळे मी हा चित्रपट स्वीकारल्याचे’ अभिनेत्री निर्मिती सावंत सांगतात. हा विषय माझ्या आवडीचा असल्यामुळे या विषयावर चित्रपट ही कल्पनाच मला भावली म्हणून या चित्रपटाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतल्याचे आनंद पिंपळकर यांनी याप्रसंगी सांगितले.


चित्रपटाचे लेखन हेमंत एदलाबादकर यांचे आहे. कलादिग्दर्शन वासू पाटील आणि सचिन पाटील तर नृत्यदिग्दर्शन नरेंद्र पंडित यांचे आहे. गीते गुरु ठाकूर अभय इनामदार यांची असून संगीत चैतन्य अडकर यांचे आहे. अजय गोगावले (अजय-अतुल), आदर्श शिंदे यांनी यातील गाणी स्वरबद्ध केली आहेत. संकलन विजय खोचीकर तर छायाचित्रण कृष्णा सोरेन करणार आहेत. चित्रपटाच्या चित्रीकरणास लवकरच सुरुवीत होणार आहे.
 

Web Title: Alay Majha Rashila New Marathi Movie Shooting Start Soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.