कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर चिन्मयी सुमीतची ही सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 03:12 PM2019-12-28T15:12:10+5:302019-12-28T15:17:34+5:30

चिन्मयीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. 200 हून अधिक लोकांनी ही पोस्ट शेअर केली असून अनेकांनी या पोस्टवर कमेंट केली आहे.

actress chinmayee sumeet social media post viral on kushal punjabi suicide | कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर चिन्मयी सुमीतची ही सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल

कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर चिन्मयी सुमीतची ही सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल

googlenewsNext

टीव्हीचा लोकप्रिय चेहरा कुशल पंजाबीने अवघ्या वयाच्या 37 व्या वर्षी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. कुशलने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्स आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कुशलच्याच आत्महत्येची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. कुशलच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री चिन्मयी सुमीतने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित आत्महत्येच्या निमित्ताने एका वेगळ्याच मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. 200 हून अधिक लोकांनी ही पोस्ट शेअर केली असून अनेकांनी या पोस्टवर कमेंट केली आहे.

चिन्मयीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, कुशल पंजाबीच्या आत्महत्येच्या बातमीने खूप उदास वाटत आहे... किती आणि कुठले कुठले ताणतणाव सहन करत असतात ही कलाकार मंडळी. स्पेशली, टिव्ही आणि सिनेमातली. सततची अनिश्चितता, कामाच्या वेळेची अनियमितता, करमणूक, मनोरंजनासाठी वेळ नाही. कौटुंबिक स्वास्थ्याची पुरती लागलेली वाट... कितीतरी गोष्टी... त्यात सतत लोकांची नजर तुमच्यावर, चांगलं दिसत राहाण्याचं प्रेशर...

सुरुवात कुशलबद्दल लिहून केली आहे पण मला माझ्या मनातलं काही सांगायचं आहे, मी इथे बऱ्याचदा लिहिते. माझी विचारधारा, माझा स्वभाव अगदीच अपरिचित नसावा इथे जर असेल तर हे वाचून थोडा समजेलही... सुमीत हा माझा नवरा. अत्यंत गुणी नट आणि तितकाच लाखमोलाचा माणूस. तो देखणा आहे, चांगला गातो, फिटनेसबद्दल कमालीचा जागरुक आहे. समाजभान असलेला, संवेदनशील माणूस आहे तो. तितकाच चांगला मित्रही. मी त्याची बायको. त्याचं सगळ्यांकडून होणारं कौतुक मला खूप सुखावतो. मला खूप अभिमान आहे त्याच्याबद्दल. तो माझा आहे म्हणजे माझी त्याच्यावर मालकी आहे असं मुळीच कधीच माझ्या मनात आलं नाही. मी कधीही त्याची बरोबरी करण्याचा प्रयत्न न करता साथ केली आहे. पण तरीही सतत, मी कशी त्याला शोभून दिसत नाही, मी कशी काळी, मी कशी जाड याबद्दलच्या कमेन्ट्सचा मला सतत सामना करावा लागला आहे. तुम्ही आम्हाला आवडता पण सुमीत जास्त आवडतो हेही सांगून झालेलं आहे. 'I have hots for your husband' ' he was my first crush' हे खूप हसत हसत स्वतःचे नवरे आसपास नसताना (त्यांची मनं दुखावली जाऊ शकतात, माझ्याबाबतीत मी खूप कुल असल्याने तो संभव नसतो.) मला सांगितलं गेलं आहे. मी सतत सावलीसारखी कधीच नसते सुमीतबरोबर. काही पार्ट्या तर टाळते तर ' अरे, आया करो तुम, नहीं तो लोगों को लगता है तुम्हारे बीच कुछ ठिक नहीं चल रहा', मी ह्या गोष्टींना कधी भीक घातली नाही. पण ही भीक न घालणं, फरक पडू न देणं, आत्मविश्वास शाबूत राखणं या खूप ऊर्जा कामी लागते. कितीही नाही म्हटलं तरी जरा छातीत कसनुसं होतंच.

माझा रंग माझ्या हातात नाही. माझ्या जाडपणाची काही कारणं असू शकतील का? असतील का मला काही आजार हा विचारही नसेल का शिवत मनाला? आणि माझ्याबद्दल काहीच माहीत नसेल तर मी इतकी कणखर किंवा 'कुल' आहे की ह्या प्रतिक्रियांनी मला काहीच फरक पडणार नाही असं कसं काय ठरवता येत असेल?

आतापेक्षा जरा लहान होते तेव्हा अघोरी उपाय करून बारीक व्हायचा प्रयत्नही केला होता. तब्येत अजून खराब करून घेतली. आपण चांगले दिसत नाही म्हणजे आपण वाईटच आहोत अशीही समजूत करून घेतली होती काही काळ. मी फार लढलेय, झुंजलेय ह्या गोष्टींशी. आता निवांत झालेय, माझी ऊर्जा मी फक्त आणि प्रेम करण्यात उपयोगी आणते. खूपजण आहेत ज्यांना एका कानाची गरज असते , आपण सांगितलेलं ऐकून घेण्याची, समजून घेण्याची, माझ्याकडे तो वेळ आहे, ती समजूत आहे. बरंच काम असं आहे की जिथे माझ्या 'दिसण्याची' नाही' असण्याची गरज आहे, ते काम मी मनोभावे करते.

माझी ही पोस्ट वाचून खूपजण 'पण तू तर किती छान दिसतेस ' वगैरे लिहितीलही कनवाळूपणे.. त्यांना आधीच धन्यवाद. मला हल्ली खरंच काही गंभीरपणे घ्यावं असं वाटतं नाही.


कुशलची हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी चुकीची झाली होती म्हणे.. त्यानेही भर पडली असेल त्याच्या डिप्रेशनमध्ये कदाचित. इथे खूप मित्र मैत्रिणी आहेत... तुम्हीही कशाशी झुंजत असाल, कधीही वाटलं हक्काने बोलावं तर मी आसपासच आहे.

प्रिय कुशल, सदतीस हे वय नव्हतं मित्रा हार मानायचं. जिथे पोहोचला असशील ते ठिकाण तणावरहित असो. असीम शांततेचं असो.

Web Title: actress chinmayee sumeet social media post viral on kushal punjabi suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.