The actor will be seen in Subedar Tanaji Malusare's role in "Fatteshikast" | 'फत्तेशिकस्त'मध्ये सुभेदार तानाजी मालुसरेच्या भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता
'फत्तेशिकस्त'मध्ये सुभेदार तानाजी मालुसरेच्या भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता

असीम निष्ठा आणि अतुलनीय शौर्याने मराठेशाहीच्या इतिहासात आपला अमीट ठसा उमटविणारे व्यक्तिमत्व म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे. वयाच्या १६व्या वर्षी शिवाजी महाराजांनी आपल्या निष्ठावान सहकाऱ्यांच्या मदतीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील शेवटच्या श्वासापर्यंत ‘स्वराज्यासाठी लढण्याची आणि मरण्याची’ शपथ घेतली, याच मौल्यवान सहकाऱ्यांपैकी एक म्हणजे तानाजी मालुसरे. या सुभेदार तानाजी मालुसरे यांची तडफदार व्यक्तिरेखा अभिनेता अजय पूरकर आगामी ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटात रंगविणार आहेत. येत्या १५ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भूमिकेतलं वेगळेपण जपत रंगभूमी, चित्रपट, मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा साकारणारे अजय पूरकर यांच्यासाठी ही भूमिका आव्हानात्मक होती. ‘फर्जद’ मधील ‘मोत्याजी मामा’ यांची भूमिका साकारल्यानंतर अत्यंत शूर आणि पराक्रमी अशा तानाजींच्या या भूमिकेसाठी वेगळेपण जपणं गरजेचं होतं.

आपल्या या भूमिकेबाबत बोलताना अजयजी सांगतात की, फर्जंद च्या यशानंतर प्रेक्षकांना आमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मी साकारत असलेली ‘तानाजी’ ही व्यक्तिरेखा महत्त्वपूर्ण असल्याने या व्यक्तिरेखेसाठी मी चांगलीच मेहनत घेतली आहे. विशेष म्हणजे हा वेगळेपणा जपण्यासाठी सिंहगडावरील तानाजीच्या पुतळ्यावरून प्रेरित होऊन माझी वेशभूषा करण्यात आली आहे. तसेच भूमिका अधिक चांगली वठण्यासाठी तलवारबाजी, घोडेस्वारी यासारखी अभ्यासपूर्ण तयारी मी केली आहे. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी शब्दातून, अभिनायातून तसेच देहबोलीतून व्यक्त होणं गरजेच होतं त्यामुळे बारीक कंगोऱ्यांसह ही भूमिका उभी करण्याचा प्रयत्न मी केला आहे.

ए.ए फिल्म्सचे सहकार्य व आलमंड्स क्रिएशन्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. अजय आरेकर व अनिरुद्ध आरेकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. छायांकन रेशमी सरकार तर संकलन प्रमोद कहार यांचे आहे. संगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजी तर गीते संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, वि.स खांडेकर, दिग्पाल लांजेकर यांची आहेत. वेशभूषा पौर्णिमा ओक यांची असून रंगभूषा सानिका गाडगीळ यांची आहे. कार्यकारी निर्माता उत्कर्ष जाधव आहेत. १५ नोव्हेंबरला 'फत्तेशिकस्त' प्रदर्शित होणार आहे.
 

Web Title:  The actor will be seen in Subedar Tanaji Malusare's role in "Fatteshikast"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.