'काय नेता काय जनता...'; सत्तासंघर्षावर सौमित्र किशोर कदम यांची मार्मिक कविता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 01:30 PM2022-06-29T13:30:26+5:302022-06-29T13:31:44+5:30

Kishor kadam: सौमित्र यांनी 'काय झाडी, काय डोंगार काय हाटील' या वाक्याला धरुन राजकीय विषयाकडे गांभीर्याने पाहायला लावणारी कविता सादर केली आहे.

actor kishor kadam marathi poem on kay jhadi kay dongar related to maharashtra political crisis | 'काय नेता काय जनता...'; सत्तासंघर्षावर सौमित्र किशोर कदम यांची मार्मिक कविता

'काय नेता काय जनता...'; सत्तासंघर्षावर सौमित्र किशोर कदम यांची मार्मिक कविता

googlenewsNext

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचं दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड केल्यामुळे सध्या राजकारणात दोन गट तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाऱ्याच्या वेगाने पसरणाऱ्या या वादाची चर्चा सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकामध्ये होत आहे. यात अनेक कलाकारांनी त्यांची मत मांडली असून आता अभिनेता,कवी 'सौमित्र' किशोर कदम (kishor kadam) यांनी मार्मिक कविता लिहिली आहे.

शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा 'काय झाडी, काय डोंगार काय हाटील' या वाक्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाला होता. या ऑडिओवरुन अनेकांनी मिम्स तयार केले.  इतकंच नाही तर त्यावर काही गाणीदेखील तयार करण्यात आली. मात्र, सौमित्र यांनी या वाक्याला धरुन राजकीय विषयाकडे गांभीर्याने पाहायला लावणारी कविता सादर केली आहे.

वाचा सौमित्र यांची कविता -

काय झाडी  काय डोंगार काय हाटील 
काय गावकरी काय सरपंच काय पाटील 
काय  समाज  काय  उमेदवार काय पक्ष 
काय आमदार काय खासदार काय लक्ष 
काय  नेता काय जनता काय विश्वास
काय  खरं   काय  खोटं  काय  आभास 
काय श्रीमंत काय मध्यमवर्ग काय गरीब 
काय  सुदैव  काय  दुर्दैव  काय  नशीब 
काय मतदार काय कॅांन्टीट्यूएंसी काय सत्ता 
काय फायस्टार काय थ्री स्टार काय गुत्ता 
काय भाषणं काय घोषणा  काय  नारे 
काय  मौसम काय वादळ काय  वारे 
काय विचार काय बांधिलकी काय तत्वं 
काय पक्षनेता काय कार्यकर्ता काय स्वत्वं 
काय बातम्या अन् अग्रलेख काय संपादक 
काय ढोबळ वैचारिकन् काय आस्वादक 
काय चॅनल काय मीडिया  काय  पेपर 
काय शिणिमा काय ष्टोरी काय  ठेटर 
काय फेसबुक काय वॅाट्सप काय ट्विटर 
काय ब्रिलियंट काय बकवास काय चीटर
काय  युपी काय महाराष्ट्र काय बिहार 
काय  आर्थर काय येरवडा  काय तिहार 
काय सकाळ काय दुपार अन् संध्याकाळ
काय विमान काय पायलट काय आभाळ 
काय झाडी  काय डोंगार  काय हाटील 
काय गावकरी काय सरपंच काय पाटील 
- सौमित्र

दरम्यान, किशोर कदम यांनी सादर केलेल्या या कवितेवर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे सध्या ही कविता वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. यापूर्वीदेखील मार्मिक कविता करत किशोर कदम यांनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
 

Web Title: actor kishor kadam marathi poem on kay jhadi kay dongar related to maharashtra political crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.