‘अभिनय हे माणूस म्हणून समृद्ध करणारं क्षेत्र’ -मुक्ता बर्वे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 01:10 PM2018-02-21T13:10:35+5:302018-02-21T19:07:26+5:30

अबोली कुलकर्णी    टिव्ही, थिएटर, चित्रपट, निर्मिती क्षेत्र अशा वेगवेगळया पातळयांमध्ये स्वत:ला सिद्ध करणारी आणि स्वत:चं वेगळं असं ‘मुक्तांगण’ ...

'Acting will enrich this region as a man' -Mukta Barve | ‘अभिनय हे माणूस म्हणून समृद्ध करणारं क्षेत्र’ -मुक्ता बर्वे

‘अभिनय हे माणूस म्हणून समृद्ध करणारं क्षेत्र’ -मुक्ता बर्वे

googlenewsNext
ong>अबोली कुलकर्णी 
 
टिव्ही, थिएटर, चित्रपट, निर्मिती क्षेत्र अशा वेगवेगळया पातळयांमध्ये स्वत:ला सिद्ध करणारी आणि स्वत:चं वेगळं असं ‘मुक्तांगण’ निर्माण करणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे. ‘घडलंय बिघडलंय’,‘ आम्हाला वेगळं व्हायचंय’,‘चकवा’ यासारख्या कलाप्रकारांतून तिने मराठी इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली. मराठी संस्कृतीने शिकवलेल्या मराठी बाणाचा अंगिकार करत स्त्रीसन्मान, महिला सक्षमीकरण, सामाजिक भान, देशप्रेम उराशी बाळगत आज तिची मराठी इंडस्ट्रीत यशस्वी कारकीर्द सुरू आहे. ‘आम्ही दोघी’ या तिच्या चित्रपटातून ती अमला या व्यक्तिरेखेसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार  आहे. यानिमित्ताने तिच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीविषयी तिच्याशी मारलेल्या या गप्पा....

* तू कायम वेगळया धाटणीच्या, चोखंदळ भूमिका करतेस. अस्सल ग्रामीण टच असलेल्या या ‘आम्ही दोघी’ तील भूमिकेसाठी तुला कोणती खास तयारी करावी लागली?
- खरंतर, ‘अमला’ या माझ्या व्यक्तिरेखेला अस्सल बाज म्हणता येणार नाही. पण, निमशहरी वाटावी अशी माझी ही व्यक्तिरेखा आहे. कर्नाटक, कोल्हापूरकडे जशा प्रकारची भाषा बोलली जाते तसंच काहीसं तिचं बोलणं आहे. तिच्या व्यक्तिरेखेसाठी मला भाषा, राहणीमान यांवर बरंचसं काम करावं लागलं. तसेच अमला ही कायम तिच्या विश्वात मग्न असते. गजरे करणे, पक्षांना खायला घालणे, वीणकाम करणे ही सर्व कामे ती कायम करत असते. त्याप्रमाणे मलाही स्वत:ला भूमिके साठी या सर्व गोष्टी शिकाव्या लागल्या. भूमिकेला बरंच बारीकसारीक नक्षीकाम करता आलं.

*  प्रिया बापटसोबत तू पहिल्यांदाच परस्परविरोधी भूमिका करताना दिसते आहेस. कसा होता अनुभव?
- प्रिया आणि मी कामाच्या बाबतीत अगदी चोख. शूटिंग सुरू झाली की, आम्ही दोघीही आपापल्या भूमिकांमध्ये व्यग्र होत असू. ब्रेक झाला की, मग आमचा गप्पाटप्पांचा तास रंगायचा. प्रियाने ज्या सावित्रीची भूमिका साकारली आहे ती शहरी भागातील मुलगी असते. अमला आणि सावित्री यांचा आचार-विचारातील प्रवास म्हणजे हा चित्रपट असं म्हणायला हरकत नाही.

* मुक्ता बर्वे गंभीर चेहऱ्याची जरी दिसत असली तरी वास्तवात तू खूपच खोडकर असल्याचा अनुभव ‘आम्ही दोघी’च्या टीमला आला, खरंय का हे? 
- असं अगदीच काही नाही. कदाचित माझ्या टीमला तसा अनुभव आला असावा. पण, होय मला सेटवरचे वातावरण हलकेफुलके ठेवायला आवडते. त्यामुळे मला काम करायला मजा येते. 

* वडील वसंत बर्वे टेलको कंपनीत आणि आई विजया बर्वे शिक्षीका असताना तू अभिनय करण्याचा मार्ग कसा निवडलास?
- लहानपणीपासूनच माझ्यात अभिनयाची आवड होती. माझी आई शिक्षीका असली तरीही तिने शाळेत लहान मुलांसाठी २०/२२ नाटकं बसवली तसेच ती दिग्दर्शित देखील केली आहेत. वडील उत्तम वाचक आहेत. भाऊ एक उत्कृष्ट चित्रकार (कमर्शिअल आर्टिस्ट) आहे. कलेची उत्तम जाण असणारं असं आमच्या घरचं वातावरण असल्यामुळे मलाही अभिनेत्री होण्यासाठी त्यांचा कायम पाठिंबा मिळाला. 

* ‘जोगवा’ हा चित्रपट तुझ्या करिअरसाठी टर्निंग पॉर्इंट ठरला. नंतर ‘बॅक टू बॅक’ हिट्स तू दिलेस. काय सांगशील याबद्दल?
- या चित्रपटाची चांगली आठवण आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव पाटील आज आपल्यात नाही. पण, त्यांनी ‘जोगवा’ सारखी एक चांगली कलाकृती निर्माण केली. उत्कृष्ट कथानक, सामाजिक प्रबोधन करणाऱ्या या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. या चित्रपटाच्या टीमचा मी भाग असल्याचा मला कायम अभिमानच वाटत राहील. 

* तू तुझ्या आजीला बेस्ट फ्रेंड मानतेस. ‘आम्ही दोघी’ निमित्त तुला तुझ्या आजीसोबतच्या नात्याबद्दल काही सांगावेसे वाटेल काय? 
- आई-बाबा दोघेही नोकरी करत असल्यामुळे मी माझ्या आजीसोबतच राहायचे. आमच्यामध्ये एक खूप छान बाँण्डिंग होतं. आम्ही मस्त धम्माल, मस्ती, मजा करायचो. माझी अनेक गुपितं तिच्याकडे ‘सेफ’ असायची. सर्वसामान्य लहान मुलांचं जसं असतं तसंच अगदी माझं तिच्यासोबत चालायचं. आई-बाबांना माझी तक्रार करू नये म्हणून तिला गोडीत आर्जवं करायची. तीही माझ्यासोबत छान रमायची. माझी आजी तिच्या काळातील एक स्वतंत्र, स्वत:चं मत असणारी स्त्री होती. गृहिणी असली तरीही तिची ठाम मतं असायची. तिचीच काहीशी छाप माझ्यामध्ये देखील आली आहे. तिला कायम असं वाटायचं की, मी वकील व्हावं. ‘कोडमंत्र’ या नाटकात मी वकीलाची भूमिका साकारली होती. त्यावेळी मला तिची प्रचंड आठवण आली होती. ती असली असती तर तिला खूप आनंद झाला असता.

*  ‘द मुक्ता बर्वे शो’ साठी तू रेडिओ जॉकीचे काम पाहतेस. या माध्यमातून महिलाकेंद्रित प्रश्नही मांडतेस. या शोच्या जर्नीविषयी काय सांगशील?
- या माझ्या शोचे आत्तापर्यंत ३२० एपिसोड्स झाले आहेत. आजही महाराष्ट्रातील ९ शहरांत माझा शो ऐकला जातो. महिलावर्ग, युवापिढी माझ्याशी लवकर क नेक्ट होते. नाटक संपल्यानंतर अनेक जण येऊन मला स्वत:चे प्रश्न सांगायचे. मग असा एखादा शो सुरू करावा अशी संकल्पना माझ्या डोक्यात आली. चॅनेललाही वाटलं की, एखादा संदेश, आवाहन करायचे झाले तर ते माझ्यातर्फे केले तर लोक जास्त प्रेमाने ऐकतील. म्हणून मग मला त्यांनी विचारणा केली. आणि या माध्यमातून उत्तम अनुभव मिळतो.

* अभिनेत्री म्हणून हा इथपर्यंतचा प्रवास किती समृद्ध करणारा होता? 
- नक्कीच माणूस म्हणून समृद्ध करणारा होता. खूप शिकायला मिळालं. हे क्षेत्र असं आहे की, इथे तुम्हाला एका आयुष्यात अनेक आयुष्य जगायला मिळतात. आता जसं ‘अमला’ या व्यक्तिरेखेप्रमाणे मी कधीच आयुष्य जगले नसते. कारण की, अमला ही कुठलंही ध्येय नसणारी, तिच्या स्वत:च्याच विश्वात रमणारी अशी स्त्री आहे. मात्र, मला या चित्रपटाच्या निमित्ताने तिच्या भूमिकेचा अभिनय करता आला. एवढंच नाही तर आत्तापर्यंत अनेक प्रकारच्या, ध्येयाने प्रेरित असलेल्या भूमिका करता आल्या, याचा आनंद आहे. माझा छंद मला करिअर म्हणून निवडता आला यातच माझा आनंद आणि समाधान सामावला आहे.

* तुझ्यासारख्या अनेक मुक्ता आपापल्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. काय सांगशील त्यांना? 
- संदेश नक्कीच देणार नाही. पण, होय, एवढं नक्कीच सांगेन की, करिअर करत असताना स्त्री-पुरूष असा भेद करू नका. काम करताना प्रत्येकाचं आपलं एक कसब असतं. ते ओळखायला शिका. तसेच स्वत:मधील शक्ती ओळखायला शिका, स्वत:वर प्रेम करायला शिका. प्रत्येक स्त्रीने पाच मिनिटे वेळ काढून आरशासमोर उभे राहून असं म्हणायला हवं, की तू खूप छान आहेस, तू मला आवडतेस. एवढंही नाही तर स्वत:च्या आवडीच्या गोष्टी तिने कराव्यात. 

* मुक्ता अभिनेत्री नसती तर काय असती? 
- मला शिवणकाम करायला प्रचंड आवडतं. आणि आता अलिकडेच मला लागलेला छंद म्हणजे बागकाम करणं. हे शिकून पुढे मला करावंसं वाटलं असतं. कुठलंही काम जे प्रामाणिकपणे निष्ठेने करता येण्यासारखं असतं ते मी नक्कीच केलं असतं.

* आजच्या काळात प्रेक्षक आणि कलाकार यांचं नातं खूप हळवं झालं आहे. सेलिब्रिटींना काहीसं गृहित धरलं जाऊ लागलंय. याबद्दल तुझं काय मत आहे? 
- खरंतर, त्याची बरीच कारणं आहेत. प्रेक्षक आणि कलाकार यांच्यातलं अंतर कमी झालं आहे. प्रेक्षकांचे कलाकारांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग निर्माण झाले आहेत. प्रेक्षक हे विसरून जातात की, कलाकारही माणसंच आहेत. त्यांनाही प्रत्येकाला आपलं वैयक्तिक आयुष्य आहे. त्याच्यात डोकावून पाहण्याचा प्रेक्षकांनीही प्रयत्न करू नये. चांगल्या मनोरंजनाची, कामगिरीची प्रेक्षकांनी कलाकारांकडून जरूर अपेक्षा ठेवावी, पण कलाकारांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय करावं? आणि काय करू नये? हे प्रेक्षकांनी ठरवू नये.

* आज इंडस्ट्रीत मराठी दिग्दर्शिकांचं प्रमाण फार कमी आहे. काय करता येईल हे प्रमाण वाढविण्यासाठी?
- प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा एक कल असतो. खरंतर, मराठी दिग्दर्शिकांचं प्रमाण वाढवण्यासाठी काही करायची गरज नाहीये. ज्यांना यात आवड असेल, गती असेल त्या नक्कीच या क्षेत्रात येतीलच. प्रत्येक क्षेत्रात हे प्रमाण थोडंसं कमी-जास्त हे असतंच. 

* तुझी आत्तापर्यंतची बेस्ट कॉम्प्लिमेंट? 
- ‘आम्ही दोघी’च्या निमित्तानं अलिकडेच मला मिळालेली प्रतिक्रिया सांगते. माझ्या घराचं रिनोव्हेशनचं काम काढलं होतं. त्यावेळी या चित्रपटाचं एक पोस्टर घरी ठेवलेलं होतं. त्यावेळी आमच्या घरचे एक सुतार काका आहेत त्यांना मी म्हणाले,‘माझा हा नवा चित्रपट येतो आहे. पाहिलंत का हे माझ्या आगामी चित्रपटाचे पोस्टर?’ तर ते म्हणाले,‘ अरे बापरे, या तुम्ही आहात का?’ मला असं वाटतं की, हीच माझ्यासाठी बेस्ट कॉम्प्लिमेंट होती. जेव्हा एखादी टीम एखादी व्यक्तिरेखा उभी करण्यासाठी रात्रंदिवस एवढी मेहनत घेते ती मेहनत दिसतेय हे कळाल्यावर खरंच खूप छान वाटतं. 

* तुझी जवळची मैत्रीण रसिका जोशी आणि तुझे प्रोडक्शन हाऊस रसिका प्रोडक्शन्स यांचा काही संबंध आहे का?  
- होय, मी तिच्या स्मृतीप्रित्यर्थच या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती केली आहे. रसिका जोशी ही अत्यंत उत्कृष्ट दर्जाची अभिनेत्री होती. तिच्यात असणारा उत्साह, सळसळतं चैतन्य हे तिच्यामागेही कायम रहावा आणि माझ्या हातून चांगल्या दर्जाच्या कलाकृती निर्माण व्हाव्यात म्हणून मी कायम प्रयत्न करत राहीन.  

* मध्यंतरी पूण्याच्या यशवंतराव चव्हाण सभागृहातील टॉयलेट्सचे काही फोटो तू पोस्ट केले होतेस. त्यानंतरच मग तिथे अ‍ॅक्शन झाली. यावरून सध्याच्या रंगमंचाच्या परिस्थितीबद्दल काय सांगशील?
- याबद्दल बराच विरोधाभास आहे. कारण बरीचशी रंगमंच ही स्वच्छ आणि चांगल्या परिस्थितीतील आहेत. आता काही ठिकाणी जरी अस्वच्छता असली तरी त्यामध्ये काही प्रमाणात आपणही कारणीभूत नक्कीच असतो. आपणही आवाज उठवायला हवा. 

Web Title: 'Acting will enrich this region as a man' -Mukta Barve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.