आयआयटी मुंबईच्या मुलांनी तयार केलं असं घर, जिथं येत नाही लाईटबिल

By पवन देशपांडे | Published: June 3, 2018 01:28 PM2018-06-03T13:28:06+5:302018-06-03T18:01:03+5:30

घरात विजेचा पुरेपूर वापर; पण विजेचं बिल मात्र शून्य! शिवाय हे घरही असं की, देशातल्या कोणत्याही ठिकाणी ते ‘उचलून’ नेता येऊ शकतं!

Zero House! | आयआयटी मुंबईच्या मुलांनी तयार केलं असं घर, जिथं येत नाही लाईटबिल

आयआयटी मुंबईच्या मुलांनी तयार केलं असं घर, जिथं येत नाही लाईटबिल

googlenewsNext

विजेवर चालणाऱ्या शेगडीवर तुमच्या घरात स्वयंपाक होतोय, फॅन फिरतो, बेडरूम, हॉलमधला एसी चालतोय, गिझरही विजेवरच. मोबाइल, टीव्ही, इंटरनेट, लॅपटॉप.. अशा साºयाच गोष्टींसाठी विजेचा दिवसरात्र वापर सुरू आहे... पण विजेचा एवढा सगळा वापर करूनही तुम्हाला विजेचं बिल मात्र शून्य आलं तर?...

- तुमच्या घरातल्या मीटरमध्ये काही फेरफार केलेला नाही, सरकारची ही कोणतीही नवीन स्किम नाही की पोकळ आश्वासनंही नाहीत; ज्यातून तुम्हाला फुकटात वीज मिळेल!
देशातल्या प्रत्येक घरात वीज पोहोचविण्यासाठी सरकार वचनबद्ध असलं तरी प्रत्येक कुटुंबाला या विजेसाठी पैसे मोजावेच लागणार आहेत.
 

मग शून्य बिल ही कल्पना आली कुठून?..
हो, हे शक्य आहे आणि ते प्रत्यक्षात आणून दाखवलंय आयआयटी, मुंबईच्या विद्यार्थ्यांनी!
विजेवर चालणारी सर्व उपकरणं वापरूनही तुमचं घर बिनबिलाचं असेल आणि त्यासाठी तुम्हाला केवळ एकदाच खर्च करावा लागेल. तेही घर बांधताना!

शिवाय हे घर इको-फ्रेण्डली असेल, ज्यानं निसर्गाची कोणतीही हानी होणार नाही. सध्याच्या घरात तुम्ही ज्या ‘कम्फर्ट’नं राहाता, त्याचप्रमाणे या नव्या घरातही राहता येईल! आई-वडील, तुम्ही, तुमची पत्नी, मुलगा-मुलगी असे संपूर्ण कुटुंब यात सहज मावू शकेल!स्वप्नवत वाटणाºया या नव्या घराची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे ती मुंबईतील आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी! काय केलं या विद्यार्थ्यांनी?..

या विद्यार्थ्यांनी १८०० स्क्वेअर फूट जागेवर एक घर उभं केलं. ते एक मजली आहे. म्हणजे जी+1 बंगला. त्याला विद्यार्थ्यांनी ‘शून्य हाऊस’ असं नाव दिलंय! चीनमध्ये होणाºया ‘सोलार डिकॅथेलॉन २०१८’ या आंतरराष्टÑीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुलांनी हे तयार केलं आहे.
अमेरिका सरकारचं ऊर्जा खातं आणि चीनचं राष्ट्रीय ऊर्जा प्राधिकरण यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे. सोलारवर आधारित अत्याधुनिक घरांची निर्मिती करणाºयांची येथे स्पर्धा होते आणि त्यातूनच नव्या संकल्पनांचा जन्मही होतो. भारतातून या स्पर्धेत आयआयटी, मुंबईची एकमेव टीम सहभागी झाली आहे आणि त्यांची थीम आहे ‘शून्य हाऊस’! ६०पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या संकल्पनेत आपलं बुद्धिकौशल्य पणाला लावलं आहे.

या मुलांनी नेमकं केलंय तरी काय, म्हणून त्यांना भेटायला आयआयटीत गेलो. एक वेगळंच चित्र तिथे पाहायला मिळालं.
घर तर तिथे होतं; पण भिंती वेगळ्या, घराचे पिलर्स वेगळे, दरवाजे वेगळे! या घराचं स्ट्रक्चरच पूर्णपणे काढून ठेवलेलं होतं. सगळं काही ‘डिस्मेंटल’ केलेलं! हे भाग एकत्र करायचे, आपल्याला पाहिजे तिथे न्यायचे, तिथे जोडायचे, की झाले घर तयार!
विजय शर्मा हा या घराचा आणि एकूणच या प्रकल्पाचा स्ट्रक्चरल मॅनेजर. घराच्या प्रत्येक पार्टची माहिती देताना अगदी वैज्ञानिकदृष्ट्या विचार करून काय काय वापरलं आणि काय काय टाळलं हेही विजय सांगत होता.

या घरामुळे कोणत्याही प्रकराचं प्रदूषण होऊ नये किंवा प्रदूषणाचं कारण ठरू नये, हे आमचं पहिलं उद्दिष्ट होतं, हे विजयनं सुरुवातीलाच सांगून टाकलं. विजय सांगतो, सध्या वाढलेलं प्रदूषण आणि त्यासाठी कारणीभूत ठरणाºया गोष्टी या घरासाठी वापरायच्या नाहीत, अगदी काहीच पर्याय नसला, तर कमीत कमी प्रमाणात त्या वापरायच्या, घराचा टिकाऊपणाही जपायचा, हे आम्ही ठरवलं होतं. सर्व सुखसोयी असणारं, इको-फ्रेण्डली, स्वत:ची ऊर्जा स्वत:च तयार करणारं घर आम्ही बनवलं आहे. त्यासाठी आमच्या ६०पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या टीमनं दोन वर्षांची अथक मेहनत घेतली आहे गेल्याच आठवड्यात या घराची ट्रायलही आम्ही घेतली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले आहे. भूकंप, बर्फवृष्टी, वादळं आणि पूर अशा नैसर्गिक आपत्तींनी घरांची होणारी हानी मोठी आहे. या संपूर्ण प्रकल्पाची हेड के. नागा भाव्या ज्योती सांगते, आम्ही तयार केलेलं हे घर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते कुठेही बांधलं जाऊ शकतं. तुमची एका गावातून दुसºया गावात बदली झाली की तुम्हाला हे संपूर्ण घर ‘डिस्मेंटल’ करून दुसºया ठिकाणी नेता येतं.

भाव्या आपलं काम संपवून या घराचं जिथं पॅकिंगचं काम सुरू होतं तिथं सायकलवर आली. या स्पर्धेची पार्श्वभूमीही तिनं स्पष्ट केली.. चीनमध्ये होणारी ही स्पर्धा दहा तत्त्वांवर आधारित आहे. त्यासाठी आम्ही टीम इंडिया म्हणून जात आहोत. स्पर्धा जिंकायचीच या उद्देशानं आम्ही कामाला लागलो आणि तोच आमचा उद्देश आहे. इतर देशांचे स्पर्धकही काही वैशिष्ट्यपूर्ण घरं तयार करत असणार; पण आम्ही तयार केलेलं हे घर भारताच्या वैविध्यपूर्ण वातावरणाच्या दृष्टिकोनातून आणि निमशहरी भागासाठी तयार केलं आहे. एखादी मध्यमवर्गीय व्यक्ती आपल्या प्लॉटवर हे ‘शून्य हाउस’ सहज बांधू शकेल. विजयचंही म्हणणं तेच होतं.. आमच्या घराची रचनाच अशी आहे की, हे घर अमुकच ठिकाणी बांधायला पाहिजे असं नाही. हव्या त्या ठिकाणी आणि हव्या त्या वातावरणात हे घर बांधलं जाऊ शकतं. अट फक्त एकच की हे घर उन्हात असावं. हे घर सिमेंटचं नसेल. पूर्णपणे लोखंडाचं असेल. त्यामुळे त्याचा टिकाऊपणा आणि त्याचं आयुष्यमानही सिमेंटच्या घरापेक्षा खूपच जास्त असेल. चर्चा सुरू असतानाच इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग करणारा संदीप शाहू तिथे आला. संदीपने या शून्य हाउसचं संपूर्ण इलेक्ट्रिकचं काम पाहिलंय.

तो सांगतो, या घरात वापरली जाणारी वीज येथेच तयार होते. घरात कमीत कमी वीज लागावी आणि तरीही त्यावर सर्व उपकरणं चालावीत, अशा प्रकारची रचना करण्यात आली आहे. तुमच्या घराला लागणारी वीज क्षमतेपेक्षा अधिक असतील तर बाजूचे घरही तुमच्याकडून मिळालेल्या विजेवर उजळू शकते!

‘शून्य हाउस’च्या टीममध्ये सहभागी असलेली फेबा वर्गिस म्हणते, मुळात असं घर बनवा जे सर्वसामान्यांना परवडेल. त्यांना त्यात सुखानं राहता येईल. इंधनाची बचत होईल आणि पर्यावरणाचीही हानी होणार नाही. एवढेच नाही, ते कोठेही बांधता येईल आणि जगभरात असलेली घरांची मागणी पूर्ण करता येईल, अशी या ‘सोलर डिकॅथेलॉन’ स्पर्धेची अट होती. त्यामुळे अशा डिझाइनचे घर तयार करण्यासाठी टीम शून्यने वर्षभर रिसर्च केल्यानंतर मे महिन्यात आआयटी, मुंबईत तसं घर उभंही केलं. त्यासाठी आधी दिवसाचे १८ तास काम केले. आपल्याच संपूर्ण टीमचे काही भाग केले. काहींनी रिसर्च केला. काहींनी प्रत्यक्ष एक्झिक्युशनचं काम पाहिलं. काहींनी इंजिनिअरिंग सेक्शन सांभाळले तर काहींनी या घरांसाठी लागणारे स्पॉन्सरही शोधले.

संपूर्ण घर सौरऊर्जेवर आधारित असल्याने या प्रकल्पाला टीम शून्यने ‘प्रोजेक्ट सोलराइज’ असं नाव दिलं आहे. सूर्याच्या साक्षीनं तयार होणारं आणि सूर्याच्या साहाय्यानं चालणारं हे घर येत्या काळात जगावरील ‘ग्लोबल वॉर्मिंग’चं संकट दूर करण्यासाठी फायद्याचं तर ठरणार आहेच, शिवाय हा प्रोजक्ट सर्वसामान्यांसाठी कसा वापरता येईल, याचीही त्यामुळे चाचपणी होऊन जाईल. ही खात्री करून घेतली की ग्रामीण भारतात आणि छोट्या शहरांतील घरांची मागणी पूर्ण करता येणं शक्य आहे.

विजय शर्मा सांगतो, हे घर आम्ही १८०० स्क्वेअर फुटावर बांधलं आहे़ कारण एका मोठ्या कुटुंबासाठी सर्व सुखसोई उपलब्ध असतील असं घर आम्हाला बनवून दाखवायचं होतं़ हा स्पर्धेचा भाग होता़ मात्र, हेच मॉडेल वापरून या प्रकारची छोटी घरेही तयार केली जाऊ शकतात़ कोणाकडे जागा कमी असेल, रूम कमी बांधायच्या असतील तर तेही शक्य आहे़ खर्च लागेल तो, भिंतींना लागणारे लोखंडी, त्यात तापमान वाढू नये यासाठी वापरले गेलेले मटेरिअल, पिलर म्हणून उभे केले जाणारे लोखंडी बिम आणि सोलर ऊर्जेचा वापर करण्यासाठी लागणारे पॅनल्स यासाठी..

सध्या भारतात १ कोटी ८० लाख घरांची गरज आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी ३३० अब्ज डॉलर्स एवढा अगडबंब खर्च येणार आहे. हा खर्च सरकारनं केला तरी त्यासाठी लागणारी वीज आणि त्यातून होणारे प्रदूषण रोखता येणार नाही. पण टीम शून्यने तयार केलेलं हे नवं घर जर छोट्या मॉडेलमध्ये, बिल्डिंगच्या स्वरूपातही यशस्वी झाले तर येत्या काळात शून्य विजेच्या वापरात खऱ्या अर्थाने इको-फ्रेण्डली घरे उभी राहू शकतील. कोणत्याही घरासाठी जी वीज लागते, ती इंधन जाळून तयार केलेली असते़ कुठे कोळसा जळतो, कुठे गॅस तर कुठे पेट्रोल-डिझेल़ या सर्व प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात कार्बन डॉयआॅक्साइड तयार होतो आणि त्याचा फटका मग पर्यावरणाला बसतो़
विजय आणि भाव्या सांंगतात, आमची कल्पना अशी आहे की, आता गावेच्या गावे सोलर व्हावी आणि त्यातून प्रदूषणाचा भस्मासूर थांबावा़ त्यासाठी घराचे हे मॉडेल उपयोगी पडणार आहे़ भारतात कुठेही उभारू शकू असं इको-फे्रण्डली घर, शून्य हाउसच्या मॉडेलच्या रूपानं आम्ही तयार करू शकलो याचा आम्हाला सर्वाधिक आनंद आहे़ स्पर्धेच्या निमित्तानं का होईना, इको-फ्रेण्डली आणि देशाच्या कानाकोपºयात कोणत्याही ठिकाणी उभी राहू शकणारी, टिकाऊ आणि तुलनेनं स्वस्त अशी ही घरं निर्माण होणार असतील तर त्याचं स्वागतच आहे. त्यानिमित्तानं अनेकांच्या डोक्यावर मायेचं छत उभं राहू शकेल..


घराचं शिफ्टिंग थेट चीनमध्ये!
घरातलं सामान शिफ्ट केल्याचं आपण ऐकतो; पण अख्ख घर शिफ्ट करण्याचा पहिला प्रयोग ‘टीम शून्य’ थेट चीनमध्ये जाऊन करणार आहे़ काही दिवसांपूर्वी आयआयटी, मुंबईत उभं केलेलं हे घर पूर्णपणे डिस्मेंटल करून झालं आहे आणि आता त्याची पॅकिंग सुरू झाली आहे़ हे घर वेगवेगळ्या पार्टमध्ये आता बोटीनं चीनमध्ये दाखल होईल आणि तेथे हे विद्यार्थी पुन्हा एकदा घराची उभारणी करतील़ तेथेच राहतील आणि तेथे येणा-या पाहुण्यांना मेजवाणीही देतील़

२१ दिवसांत उभं राहणारं घर!
यावर्षी ९ जुलैपासून होणा-या स्पर्धेत आयआयटी, मुंबईचं ‘शून्य हाउस’ जगातील २२ नामवंत विद्यापीठांमधून आलेल्या टीमशी लढा देईल. या विद्यार्थ्यांना आता हे घर चीनमध्ये उभारून दाखवावं लागणार आहे आणि तेही २१ दिवसांमध्ये. त्यात सिमेंटचा वापर केवळ पाया मजबूत करण्यापुरता होणार आहे. विटांचा तर वापरच होणार नाही. त्यामुळे त्याला उभारण्यासाठी वेळही कमी लागणार आहे.

शून्य म्हणजे शून्यच!
शून्य हे नावही केवळ मराठी अर्थापुरतं मर्यादित नाही. त्यांच्या संपूर्ण स्पेलिंगचे मिळून प्रत्येक आद्याक्षराने अर्थपूर्ण इंग्रजी नाव तयार होते. ‘सस्टेनेबल हॅबिटॅट फॉर अ‍ॅन अर्बनाइझिंग नेशन बाय इट्स यंग अ‍ॅस्पायरण्ट्स’ (शून्य) असं पूर्ण नाव या विद्यार्थ्यांनी तयार केलं आहे. या विद्यार्थ्यांच्या मते ही एक टीम इंडिया आहे. आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये खेळणारे खेळाडू जसे गोल्ड मेडल घेऊन भारताचं नाव रोशन करतात, तसंच यांनाही या ‘सोलर आॅलिम्पिक’मध्ये गोल्ड मिळवायचं आहे. 

 (लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)

Web Title: Zero House!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.