संताप आणि चीड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 06:04 AM2019-12-22T06:04:00+5:302019-12-22T06:05:07+5:30

राज्यघटनेला नख लावून  सरकार लबाडी करत असेल तर  तरुण त्याविरुद्ध आवाज उठवणार.  आज आपल्या देशात तेच होत आहे.ं  हे तरुणांच्या हितसंबंधांचे लढे नाहीत.   समतेच्या प्रस्थापनासाठी, न्यायाच्या मागणीसाठी पेटलेली  आणि राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराच्या कक्षेतली  ही आंदोलनं आहेत. त्यांना दुर्लक्षून चालणार नाही!

Why Indian youth is Angry and Annoyed? | संताप आणि चीड

संताप आणि चीड

Next
ठळक मुद्देसरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले तरुणांचे जथ्थे  ही दडपून टाकता येणारी गोष्ट नव्हे!

- सुरेश द्वादशीवर

देशातल्या अस्वस्थतेला तरुणांनी वाचा फोडायला सुरुवात केली आहे. देशभर तरुणांचे रागावलेले संतप्त जथ्थे रस्त्यावर उतरत असल्याची वृत्तं येत आहेत. या तरुणांच्या तोंडी प्रश्न आहेत. सत्तेला जाब विचारणारे तर्क आहेत.
प्रत्येक देशाच्या आयुष्यात हे टप्पे येतच असतात.
संतापून प्रश्न विचारायला रस्त्यावर उतरलेलं तारुण्य ही गोष्ट ना जगाला नवीन आहे, ना आपल्या देशाला अपरिचित आहे!
 बदल, क्रांती, सामाजिक उलथालपालथ हे सगळं आजवर तरुणच घडवत आलेले आहेत.  जगभरातल्या बहुसंख्य  बदलांना आजवर तरुणच कारणीभूत ठरले आहेत. ज्ञान, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातले बदल तरुणांच्याच नेतृत्वाने, पुढाकाराने झाले. बदल, परिवर्तन हे तरुणांना हवं असतं आणि जग स्थिर होत जायला प्रौढ, वयस्क मंडळी कारणीभूत असतात.
अगदी आपल्या वैदिक ऋषींचं उदाहरण घ्या. तरुणपणीच त्यांनी वेदांची निर्मिती आणि त्यासाठीचा अभ्यास केला. शंकराचार्य, विवेकानंद हे ज्ञानी पुरुष, धर्म पुरुष, त्यांनी आपल्या कार्याचा आरंभ केला; तेव्हा तरुणच होते. सगळे ग्रीक तत्वज्ञ तरुण होते, सॉक्रेटिसचा अपवाद वगळला तर प्लेटो, अरिस्टॉटल यांनी तरुणच असताना जगाला मुलभूत तत्वज्ञान दिलं. आपण ज्यांची पूजा करतो ते सारे देव, त्यांची चरित्रही तरुण आहेत. र्शीराम, र्शीकृष्ण यांचं कार्य तारुण्यातलं आहे, त्यांची चरित्र लिहिणारेही तरुणच होते. शंकराचार्यांनी हिंदू धर्मप्रसाराचं काम केलं ते वयाच्या 31 व्या वर्षी. ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी वयाच्या 21 व्या वर्षी घेतली.  भगवान बुद्ध, भगवान महावीर यांनी आपलं कार्य ऐन तारुण्यात केलं. तुकाराम महाराज निवर्तले, तेव्हा त्यांचं वय फक्त 33 वर्षं होतं. तात्पर्य काय, तरुणांना बदल, क्रांती यांची आस असते.
अगदी अलिकडच्या काळात झालेल्या क्रांत्यांचं उदाहरण घ्या. फ्रान्स, अमेरिका या देशात क्रांत्या झाल्या, त्यांचेही आरंभीचे सारे नेते तरुण होते. आपल्या स्वातंत्र्यलढय़ाचं उदाहरण घ्या, महात्मा गांधींजींच्या संपर्कात आले तेव्हा जवाहरलाल नेहरु फक्त 26/27 वर्षांचे होते. मौलाना अबुल कलाम आझाद 35 तर सरदार पटेलही जेमतेम चाळीस वर्षांचे होते. इंग्रज सरकारविरुद्ध असंतोष निर्माण करणारे लोकमान्य टिळक तरुण होते, तेच आगरकरांचंही. तेच बाबासाहेब आंबेडकरांचंही. आपल्या ऐन तारुण्यात त्यांनी परिवर्तनासाठीचे लढे उभारले.  आपल्या स्वातंत्र्यलढय़ात ज्यांनी सशस्त्र क्रांतीची वाट निवडली ते क्रांतीकारी तरुण होते. वयाच्या 23 व्या वर्षी भगतसिंग फासावर गेला. सावरकरांनी ऐन तारुण्यात क्रांतीची वाट धरली. भारतीय स्वातंत्र्य लढा हा त्याकाळच्या तरुणाईचाच लढा होता. त्यावेळीही तरुण आंदोलनं करत होते आणि स्थितीवादी, प्रस्थापित तेव्हाही त्या संतप्त तारुण्याला विरोधच करत होते.
तरुणांना कायमच नव्याची, क्रांतीची, बदलाची आस असते, जुने-प्रौढ बदलविरोधी, क्रांतीविरोधीच असतात. त्यांना बदलाची भीतीच वाटते. त्याउलट  सगळ्याच बदलांचे आरंभकर्ते हे कायम तरुणच असतात. 
अगदी अलिकडच्या काळाची उदाहरणं तपासून पाहिली तरी या गोष्टी सहज स्पष्ट होतात. सगळे अमेरिकन अध्यक्ष हे तरुणच होते. भारतातही मोरारजीभाई देसाईंचा अपवाद वगळता बाकी पंतप्रधान तुलनेनं तरुणच होते. इंग्लंडमध्ये क्रांती झाली, ती क्रांती करणारा वर्ग तरुणच होता. 
मुख्य म्हणजे क्रांतीसाठी, बदलांसाठी कायम वंचित, दडपलेलं असणंही आवश्यक नाही. नसतंच. तरुण असणं, आणि त्या वयात बदलाची आस असणं हेच अनेकदा नव्या गोष्टींसाठी पोषक पुरक ठरतं.
आज आपण जे जग पाहतो आहोत, ते जग बदलायला 1960 च्या दशकात प्रारंभ झाला. जगभर मोठय़ा बदलांचा हा काळ होता. 1967 आगेमागे जगाच्या इतिहासानंच कूस बदलली. अमेरिकेत रॉबर्ट केनेडी आणि मार्टीन ल्यूथर किंग यांचे खून झाले. गोल्डा मायर या इस्त्रायलच्या पंतप्रधान झाल्या, जेमतेम पन्नाशीत. एकाचवेळी 14 अरब देशांना पराभूत करण्याची किमया त्यांनी याच काळात करुन दाखवली. त्याच काळात रशियाचा पोलादी पडदा सैल व्हायला सुरुवात झाली. चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या हुकुमशाहीला आव्हान द्यायला विद्यार्थी पुढे सरसावले. तिआनमेन चौकातलं हत्याकांड जगभर गाजलं.
इकडे भारतातही स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 1967 साली कॉग्रेस सत्तेतून बाहेर गेली. आणि युरोप खंडात क्रांतीचा वणवाही याच काळात पेटला. तसं पाहता या क्रांतीचं निमित्त अगदी लहानसं होतं.
कोहन बेंडिट हा विद्यार्थी पॅरीस विद्यापीठात शिकत होता. त्याकाळात पॅरीसमध्ये विद्यार्थी मोठय़ा बदलांची मागणी करत होते. नेमका तेव्हाच विद्यापीठात मुलांच्या आणि मुलींच्या हॉस्टेलला जोडणारा एक रस्ता बंद करण्यात आला. त्याला लागून असलेली भिंत ओलांडून मुलांना मुलींच्या आणि मुलींना मुलांच्या होस्टेलमध्ये एका विशिष्ट वेळेनंतर यायला बंदी घालण्यात आली. 
कोहन चिडला, त्याचा राग हा या नियमापुरता होता. त्यानं या नियमाला विरोध करत आवाज उठवला. बघता बघता अन्य विद्यार्थी त्यात सहभागी झाले आणि त्यांनी उठाव केला. त्याचं लोण अगदी अल्पकाळात सर्वत्र पसरलं. विद्यापीठात मोठा उठाव झाला, तसा तो समाजातही झाला. हा उठाव पाहून स्त्रियाही स्वातंत्र्याची मागणी करु लागल्या. मग हा उठाव एकट्या पॅरीस आणि युरोपपुरता र्मयादित राहिला नाही तर शेजारील अनेक युरोपिय देशातही असे उठाव सुरु झाले. त्या क्रांतीचा परिणाम असा झाला की, फ्रान्समधलं जनरल चाल्र्सचं सरकार गेलं. त्यांना राजीनामा द्यावा लागला. एकट्या फ्रान्समधलंच नाही तर त्याकाळात 14 युरोपिय देशांमध्ये सत्तांतरं झाली.
ही सारी उदाहरणं हेच सांगतात की, तरुणांची क्रांती करण्याची, बदल घडवण्याची ताकद फार मोठी असते. जगाच्या इतिहासात, तत्वज्ञानापासून राजकारणात, जगण्याच्या सर्वच क्षेत्रात ही गोष्ट पुन्हा पुन्हा सिद्ध झाली आहे. आजवर जगात जे जे बदल झाले, ते तरुणांनी घडवले आहेत.
हे सारे बदल तरुण का करतात तर त्यांना प्रस्थापित व्यवस्था बदलायची असते; किंवा त्यात दुरुस्ती करायची असते. मात्र त्यांच्या प्रेरणा इतक्या मोठय़ा असतात की बघता बघता त्या समाजाला कवेत घेण्याएवढा त्यांचा विस्तार होत जातो. आजवर अशाच प्रेरणांनी जगाचं लक्ष वेधून घेण्याचं काम केलं. त्यातून बदलासाठीच्या, चांगल्या व्यवस्थांसाठीच्या क्रांत्या जन्माला आल्या. जगाचा इतिहास ताडून पाहिला तर आजपावेतो हेच घडलेलं दिसतं.
आज आपल्या देशात जे सुरु आहे ते एका अन्यायाविरोधात सुरु आहे. सरकार देशातल्या नागरिकांवर एकाच मताची, विचारांची, भूमिकांची सक्ती करु शकत नाही. तरुणांवर तर नाहीच नाही. त्यामुळे मग तरुणांतूनच एखादा कन्हैयाकुमार पुढे येतो. मनुवाद, विषमता याविषयी बोलतो. त्याच्या वक्तृत्वात मोठी ताकद आहे. म्हणून तर तो जिथं शिकतो तिथं सरकार पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचा पराभव होतो. एकीकडे समाजात लोक विशिष्ट पक्षाला, विशिष्ट विचारधारेला मत देत असले तरी त्याचवेळी तरुण मात्र त्याच विचारांच्या विद्यार्थी संघटनांना नाकारतात.
सरकार राज्यघटनेला नख लावून लबाडी करत असेल तर तरुण त्याविरुद्ध आवाज उठवणार. आज तेच होत आहे. घटनेने जर न्याय, स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता ही मूल्यं स्वीकारली आहेत. तर नागरिकांवर धार्मिक, पारंपरिक, घटनाविरुद्ध गोष्टींची सक्ती करणं अन्यायकारक आहे. घटनेनं स्वीकारलेली मूल्यचं या सरकारला मान्य नाहीत. त्यांना भारतात एक धर्मीय राज्य करायचं आहे. त्यांचा तो अजेण्डा आहे, आणि त्यांनी तो कधी लपवूनही ठेवलेला नाही. देशात दुसर्‍या क्रमांकाची लोकसंख्या (18 कोटी) असलेल्या मुस्लीम धर्मियांची, 2 कोटी शिख, ख्रिश्चनांची कोंडी करणं त्यांनी सुरु केलं आहे. गोवंश हत्या बंदी, तीन तलाख्ां, कलम 370 हे सारे या सरकारने केलेले बदल दिसायला पुरोगामी दिसत असले तरी त्यांचं ‘लक्ष्य’ एकच आहे ; त्यांना एका धर्मविरुद्ध गोष्टी करायच्या आहेत.
देश म्हणजे सर्वसमावेशकता हे महात्मा गांधीजींचं तत्व, जे बाबासाहेब आंबेडकरांनीही स्वीकारलं तेच या सरकारला मान्य नाही. अलीकडेच देश म्हणजे सर्वसमावेशकता आणि राज्य म्हणजे  न्याय असे वक्तव्य नुकतेच निवृत्त झालेले सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनीही केले. आता सध्याच्या सरकारने देशात जे बदल करणं सुरु केलं आहे, ते आजवरच्या या देशाच्या इतिहासाच्या विरुद्ध जाणारे आहेत, घटनाविरुद्ध आहेत आणि या देशानं ज्या  परंपरा घालून दिल्या त्या  परंपरांच्याही विरुद्ध आहेत. मुख्य म्हणजे मानव धर्माविरुद्ध आहेत.
या सार्‍याविरोधात जर तरुण  बोलत असतील, विरोध करत असतील तर त्यांच्यावर लगेच हिंसाचाराचा ठपका कसा ठेवता येईल? आंदोलन केलं, दगडफेक केली हे मान्य, पण त्यांनी गोळ्या तर चालवलेल्या नाहीत. मग हिंसाचार झाला असं कसं म्हणता येईल? मुख्य म्हणजे तरुणांच्या मागण्यांना सरसकट अवास्तव कसं म्हणता येईल?
प्रस्थापितांना, ज्यांची सत्ता आहे, मोठे हितसंबंध आहेत त्यांना या आंदोलनाने जर धक्का बसला असेल तर ते विरोध करणारच तरुणांच्या आंदोलनांना! दडपायचाच प्रय} करणार ही आंदोलनं.
मात्र समाजाला या आंदोलनकर्त्या तरुणांना समजून घ्यायचं असेल तर माणूसकीच्या भूमिकेवर जावं लागेल. राजकारणापलिकडे, न्याय्य पातळीवर त्यांना समजून घेण्याचे प्रय} करावे लागतील.
हे सारं करताना हे लक्षात ठेवायला हवं की हे तरुणांच्या हितसंबंधांचे लढे नाहीत. समतेच्या प्रस्थापनासाठी, न्यायाच्या मागणीसाठी पेटलेली आणि राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराच्या कक्षेतली ही आंदोलनं आहेत. घटनेनं जे अधिकार दिलेत ते कायम रहावेत, धर्मनिरपेक्षता कायम रहावी म्हणून हे आंदोलन तरुणांनी छेडलेलं आहे. त्याकरताच हे लढे फक्त तरुणांचे लढे नाहीत तर ते माणुसकीच्या उत्थानाचे लढे आहे. या लढय़ांकडे सहानूभूतीने, माणुसकीच्या घटनात्मक चौकटीतच पाहिलं गेलं पाहिजे.
आज रस्त्यावर उतरलेली ही मुलं स्वार्थासाठी उतरलेली नाहीत, तर ती काही मुल्यांसाठी उभी आहेत. म्हणून त्यांना वाईट ठरवणार्‍यांच्या हितसंबंधांविषयी शंका घ्यावी लागते.
आपला समाज एक चूक कायम करतो. र्शद्धांना विचार आणि तर्क मानतो. पण र्शद्धा वेगळ्या आणि विचार व तर्क वेगळे. त्यामुळे र्शद्धा बाजूला ठेवून तर्क, विचार, समाजकल्याण, कायदा, घटना, देशाच्या चांगल्या परंपरा, माणुसकीच्या ऐक्याचा विचार यादृष्टीने घटनांकडे आणि भवतालाकडे पाहिलं पाहिजे. या तरुण मुलांच्या आंदोलनांकडेही पाहिलं पाहिजे. त्यांच्या विचारांना समजून घेतलं पाहिजे. आज जरी राजकीय पक्ष आणि संघटना या तरुण आंदोलकांसह आंदोलनात उतरलेले दिसत नसले तरी आज ना उद्या ते उतरतील. आणि नाहीच उतरले तर त्यांना करंटे म्हणावे लागेल.
प्रस्थापितांच्या हितसंबंधांचा विचार न करता समाजाला, माणुसकीच्या दिशेने, बदलांच्या दिशेने जाण्याची आवश्यकता आहे. आणि ते काम देशातले तरुणच करू शकतात.
(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत.)

suresh.dwadashiwar@lokmat.com

Web Title: Why Indian youth is Angry and Annoyed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.