आईना है मेरा चेहरा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 08:19 PM2021-11-20T20:19:28+5:302021-11-20T20:19:40+5:30

एखाद्याचा चेहरा आपल्याला परिचयाचा वाटतो, पण तो चटकन ‘ओळखता’ येतोच असं नाही. चेहरा कधीच विसरू नये, यासाठी आता ‘फेस रिकग्निशन’ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. पण काय आहे हा प्रकार?

What is face recognition technology? | आईना है मेरा चेहरा..

आईना है मेरा चेहरा..

googlenewsNext
ठळक मुद्देसंगणकांना छायाचित्रं ओळखण्याची क्षमता प्राप्त होऊ शकते. अर्थातच त्यासाठी संगणकांना चेहऱ्यांचे अक्षरश: लाखो किंवा कोट्यवधी नमुने पुरवावे लागतात.

- अतुल कहाते

संगणक व माहिती तंत्रज्ञानाचे अभ्यासक

---------------------------

‘ओळखलंस का मला?’ असा प्रश्न आपल्याला बऱ्याच काळानंतर भेटलेली; पण आपल्या परिचयातील व्यक्ती कधीकधी विचारते. काही वेळा आपण पटकन त्या माणसाला ओळखतो, तर कधीकधी आपल्याला हे आठवायला जरा वेळ लागतो. काही वेळा मात्र आपल्याला खूप प्रयत्न करूनही त्या माणसाची ओळख पटतच नाही. फेसबुक कंपनीनं आपलं बारसं ‘मेटा’ म्हणून करत असतानाच्या काळातच आपण लोकांच्या चेहऱ्यांवरून त्यांची ओळख पटवू शकणाऱ्या ‘फेस रिकग्निशन’ तंत्रज्ञानाचा वापर थांबवत असल्याची घोषणा केल्यामुळे मुळात हा नेमका काय प्रकार आहे आणि आत्ताच अशा प्रकारची घोषणा करण्यामागचं नेमकं काय कारण असावं हे प्रश्न विचारात घेणं भाग आहे.

सगळ्यात पहिल्यांदा संगणकीय यंत्रणांमध्ये आपला चेहरा ओळखण्याची क्षमता कशी निर्माण होऊ शकते या प्रश्नाचा उलगडा करणं भाग आहे. अलीकडच्या काळात सातत्यानं चर्चेत असलेली आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग अशा प्रकारच्या तंत्रज्ञानांचा यात मोठा वाटा आहे. याचं कारण म्हणजे आपणच दर वेळी संगणकाला कुठलाही प्रश्न कसा सोडवायचा हे सांगत राहण्याऐवजी संगणकालाच स्वत: शिकण्यासाठी संबंधीची माहिती पुरवली तर? म्हणजेच समजा आपण माणसांची असंख्य प्रकारची छायाचित्रं संगणकाला पुरवली आणि या छायाचित्रांचं नेमकं पृथक्करण कसं करायचं याविषयीचे काही मूलभूत नियम आखून दिले तर? हळूहळू संगणकाला माणसाच्या चेहऱ्याचे गुणधर्म, त्यामधील निरनिराळे घटक, त्याची वैशिष्ट्य या सगळ्या गोष्टी समजायला लागतील. तसंच निरनिराळ्या प्रकारच्या चेहऱ्यांमधील फरकही त्याला समजायला लागतील. हे म्हणणं सोपं असलं तरी यामागचं तंत्रज्ञान अत्यंत किचकट असतं. त्यामध्ये गणिताच्याही असंख्य मूलभूत संकल्पना वापरलेल्या असतात. याला तांत्रिक भाषेत ‘डीप लर्निंग’ असं म्हणतात. यातून संगणकांना छायाचित्रं ओळखण्याची क्षमता प्राप्त होऊ शकते. अर्थातच त्यासाठी संगणकांना चेहऱ्यांचे अक्षरश: लाखो किंवा कोट्यवधी नमुने पुरवावे लागतात.

याच तंत्रज्ञानाचा वापर करून फेसबुकनं आपल्या यूजर्सचे चेहरे ओळखण्यासाठीचं तंत्रज्ञान विकसित केलं. तिथपर्यंतही हे ठीक होतं. त्यानंतर मात्र फेसबुकनं लोकांची परवानगी न घेता सगळ्यांचीच ‘ओळख पटवून द्यायला’ सुरुवात केली. म्हणजेच उदाहरणार्थ एखाद्या माणसानं आपल्या काही मित्रांबरोबरचं एक छायाचित्र आपल्या फेसबुक वॉलवर टाकलं तर फेसबुक आपोआपच त्या छायाचित्रामध्ये कोण-कोण आहे हे दाखवायला लागलं! शिवाय या माणसांची नावं फेसबुकनं जाहीरपणे दाखवल्यामुळे समजा त्यापैकी कुठल्या माणसाच्या नावावर कुणी फेसबुकवर ‘सर्च’ केलं तर त्या माणसांसंबंधीची माहिती दाखवली जात असताना हे छायाचित्रही दाखवलं जायला लागलं. अर्थातच हे सगळ्याच लोकांना मान्य असेल असं नाही. यावर नेहमीप्रमाणेच आपण यासाठीची परवानगी संबंधित लोकांकडून घेतली असल्याचं स्पष्टीकरण द्यायचा दुबळा प्रयत्न केला. कदाचित कायद्याच्या दृष्टीनं फेसबुकचं हे म्हणणं खरं असेलही; पण एकूणच फेसबुकची ही आणि अशा प्रकारची वृत्ती धोकादायक असल्याचं मत बळावलं.

याखेरीज लोकांची माहिती अवैध रूपानं गोळा करणं, साठवणं, तिचा अनैतिक मार्गांनी वापर करणं, अमेरिकी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीपासून इतर असंख्य बाबतींमध्ये लुडबूड करणं किंवा खोटी माहिती पसरवणं अशांसारख्या आरोपांमुळे फेसबुक बेजार झाली आहे. तिचे तुकडे करून काही उपकंपन्या निर्माण कराव्यात यासाठीचा खटला अमेरिकेमध्ये सुरू आहे. साहजिकच आपल्या व्यवसायाचं स्वरूप आमूलाग्रपणे बदललं तर कायदेशीरपणे कंपनीचं विभाजन करण्याच्या मुद्द्यांमध्ये दम उरणार नाही असा कंपनीचा संस्थापक मार्क झुकरबर्गचा अंदाज असावा. यामुळे आपली प्रतिमा उजळून टाकण्यासाठी आणि ‘लोकांकडून सगळं ओरबाडून घेणारा संधिसाधू उद्योगपती’ याऐवजी आपल्याला लोकांनी ‘भविष्यवेत्ता’ म्हणून ओळखावं आणि आपल्या कंपनीची ओळखही तशीच व्हावी ही झुकरबर्गची इच्छा असावी. यामुळे ज्या अवैध प्रकारच्या गोष्टी असतील त्या तात्पुरत्या तरी बंद करून टाकण्याकडे फेसबुकचा कल आहे. स्वाभाविकपणे लोकांचे चेहरे आपोआप ओळखण्याचा हा प्रकारही त्याच गटात मोडणारा ठरला.

अमेरिकेत बॉस्टन, सॅन फ्रान्सिस्को यांच्यासह सुमारे २० शहरांनी लोकांचे चेहरे आपोआप ओळखू शकणाऱ्या तंत्रज्ञानावर कायद्यानं बंदी घातली आहे. यामुळे लोकांच्या खाजगीपणावर गदा येते आणि त्यांच्यावर पाळत ठेवता येते असं लोकशाहीवादी लोकांचं म्हणणं आहे. ‘राष्ट्रीय सुरक्षा’, ‘देशद्रोह’ अशा नावाखाली आपल्याकडेही पेगॅसससकट पाळत ठेवण्याच्या इतर साधनांचा कसा गैरवापर झाला आहे याची आपल्याला कल्पना आहेच. या पार्श्वभूमीवर सरसकट कुणाचाही चेहरा ओळखता येण्याचं तंत्रज्ञान सरकारी पातळीवर वापरलं जायला लागलं तर त्यातून काय घडू शकेल याची कल्पनाच केलेली बरी!

अर्थात म्हणून चेहऱ्यावरून माणसाची ओळख पटवण्याच्या तंत्रज्ञानावर सरसकट बहिष्कार टाकावा असं कुणीच म्हणणार नाही. फक्त त्याचा गैरवापर होऊ नये यासाठीची आणि जनतेच्या खाजगी हक्कांवर गदा येणार नाही याची तरतूद असलेले भरभक्कम कायदे असल्याशिवाय या गोष्टींचा वापर होता कामा नये. युरोप आणि न्यूझीलंड इथेही अशा प्रकारच्या तंत्रज्ञानावर म्हणूनच कडक निर्बंध घातले जात आहेत. भारतामध्ये माहितीच्या खाजगीकरणासंबंधीचा कायदा अजून अस्तित्वात नसल्यामुळे आणि जो कायदा येऊ घातलेला आहे त्यामध्येही सरकारी यंत्रणांकडे अनिर्बंध हक्क दिलेले असल्यामुळे अशा प्रकारच्या गैरवापराला कसं रोखायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहेच. म्हणजेच हा मुद्दा फक्त फेसबुक या एका कंपनीपुरता मर्यादित नसून त्याची व्याप्ती खूप मोठी आहे.

प्रत्येक माणसानं या बाबतीत वैयक्तिक पातळीवर काळजी घेणं आणि आपली माहिती कमीत कमी प्रमाणात उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं आहे. शेवटी यापलीकडे जाऊनही जी माहिती दिलेली असेल तिचा गैरवापर कशा प्रकारे होईल यावर आपलं काहीच नियंत्रण येऊ शकणार नाही. आपला चेहरा खूप बोलका असतो असं आपण म्हणतो; पण त्याचा असा अर्थ लावला जाईल याची आत्तापर्यंत कुणाला कल्पना आलेली नसेल...

Web Title: What is face recognition technology?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.