उकंड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 12:02 AM2019-08-04T00:02:00+5:302019-08-04T00:05:06+5:30

मध्यरात्रीची वेळ होती. कारागृहात भयाण शांतता पसरलेली होती. किड्यांच्या किर्रर्र आवाजात भेटायला आलेल्या आपल्या मायला पाहून उकंड्या खडबडून जागा झाला होता. अवो.. माय! तू इथं कशी? मी तं अमर झालो.. तू कावून लडतं.. उकंड्या गजाआडून बोलत होता. उकंड्याला फाशी होणार होती. फाशीचा दिवस जसजसा जवळ येत होता तसतसा उकंड्याच्या चेहऱ्यावर क्रांतीचा रंग चढत होता. त्याचे रंग पाहून कारागृहातील पहारेकरीही दंग झाले होते. जणू त्यांच्या गुलामीचा गर्भ खाली कोसळून पडणार होता.

Ukandya | उकंड्या

उकंड्या

Next

उकंड्याची माय ढसाढसा रडायला लागली. उकंड्याला तिने तळहातावरच्या फोडासारखा जपला होता. तिचा भारी जीव होता उकंड्यात. तरीपण वीर मातेसमान तिने अश्रू आवरले. अश्रूंची फुले झाल्यागत उकंड्याचा तिला अभिमान वाटू लागला होता. ‘उकंड्या.. आरं लेका तुया मुळं लई लोकाईचा जीव वाचला रे..नाईतर त्या मेल्या दरोग्यानं आणकी कित्येक जीव घेतले असते.. तुयं नाव खरंच अमर झालं पोरा..साऱ्या लोकाईच्या तोंडी तुयंच नाव हाय तसं.. सारेच म्हणत्ये उकंड्यानं एका रट्ट्यात ब्रिटिश पोलीस मारला म्हणून, पण..आता उकंड्याचं काय होणार याची साऱ्याईलेच चिंता लागून आहे. काही खरं नाय मनून...सारे धाकी पडले..उकंड्या. 


उकंड्याची माय पदराआडून अश्रू पुसत उकंड्याशी बोलत होती. उकंड्याचा मृत्यूशी जणू पाठशिवणीचा खेळ सुरू होता. कारागृहात पहाटेच्या नीरव शांततेत फाशी दिलेल्या अन्य मानवी जीवांचा आवाज रोज त्याच्या कानी पडत होता. फाशीचे तख्त खाली कोसळण्याचा आवाज आणि फासात अडकून लोंबणाऱ्या निर्जीव सोबत्यांचं चित्र उकंड्यासमोर उभं राहत होतं. गेली चार वर्ष हे आवाज फाशीच्या खोलीतून उकंड्या ऐकत होता. उद्या आपल्याही पायाखालून हे तख्त निखळून पडेल हे त्याला माहीत होतं. इंग्लंडच्या बादशहाविरुद्ध उकंड्या नावानं चाललेल्या खटल्यात उकंड्याची तीनवेळा फाशी हुकली होती. १९४२ मध्ये आष्टीच्या तिरंगा क्रांतीत धामधुमीत उकंड्याच्या हाती रिकामी बंदूक लागली होती. बंदुकीच्या एका रट्ट्यात त्याने समद नावाचा ब्रिटिश पोलीस मारला होता. म्हणून उकंड्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. इंग्लंडच्या दरबारात उकंड्यावर खटला सुरु होता. पाहता-पाहता उकंड्याचंं नावं देशभर झालं होतं. त्याचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीने प्रयत्न करण्यात आले होते. रांगड्या उकंड्याच्या मनात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सहा सोबत्यांचे मृतदेह पाहून देशभक्तीची भावना जागी झाली असेल तर त्यात त्याचा काय गुन्हा? उकंड्याला फाशी म्हणजे हिंदुस्तानाला फाशी. फासावर एकटा उकंड्या लटकणार नाही तर त्यासोबत या देशातील संपूर्ण गाव संस्कृती फासावर चढणार आहे. हे योग्य ठरणार नाही. इंग्लंडच्या प्रीव्ही कौन्सिलमध्ये फाशी निवारण समितीच्या अध्यक्ष अनसूया काळे यांनी केलेला हा युक्तिवाद फाशी रद्द होण्यासाठी येथे महत्त्वाचा ठरला. अ‍ॅड. गंगाधर घाटे यांनी कायद्याच्या बिकट संकटातून वाट काढत फाशी झालेल्या उकांड्यासह सात चिरंजीवांचे गळफास चुकलेले, अ‍ॅड. केदार, डॉ. खरे यांच्या साथीने फाशीची लढाई जिंकली. महात्मा गांधींनी पुकारलेला हरताळ आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी इंग्लंडच्या सत्तारूढ पक्षाच्या गव्हर्नरला पाठविलेले पत्रसुद्धा फाशी रद्द होण्यासाठी कारणीभूत ठरले. दुसरे महायुद्ध जिंकल्याच्या आनंदात ब्रिटिश गव्हर्नरने उकंड्यासह देशातील सप्तचिरंजीवांची फाशीची शिक्षा रद्द केली. आष्टीच्या तिरंगा क्रांतीचा इतिहास उकंड्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. उकंड्या तुरुंगातून बाहेर येतो खरा..पण तो उकंड्या राहत नाही. उकंड्याचा क्रांतिवीर उकंडराव आनंदराव सोनोने झालेला असतो. आष्टीच्या क्रांतिकारी भूमीतच नव्हे तर संपूर्ण देशात आजही उकंडराव आनंदराव सोनेने या क्रांतिवीराचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. क्रांतीवीर उकंडराव सोनोने यांच्या क्रांतिकारी जीवनाची सुरुवात वर्धा जिल्ह्यातील आष्टी या छोट्याशा गावातून झाली. भारत छोडो आंदोलनाचे पर्व ८ ऑगस्ट १९४२ पासून सुरु झाले होते. महात्मा गांधींनी ब्रिटिशांना ‘चलेजाव’चा नारा दिला आणि त्याचे पडसाद संपूर्ण भारतभर पसरले. मुंबईच्या गोवालिया टँक येथे महात्मा गांधींच्या सभेला आष्टीपैकी सिरसोलीचे क्रांती सेनानी गोपाळराव वाघ उपस्थित होते. गोपाळराव वाघांनी चले जावचा संदेश आष्टीपर्यंत पोहचविला. आष्टीच्या पंचक्रोशीतील क्रांतिवीर एकत्र आले. पांडुरंग सवालाखे यांच्या घरी सभा झाली आणि रविवार १६ ऑगस्ट १९४२ हा क्रांतीचा दिवस ठरला. रविवारला नागपंचमी होती. सकाळी ९ च्या दरम्यान वडाळा, साहूर, धाडी या आष्टीलगत असलेल्या गावांचा क्रांतिकारी लोकांचा जत्था आष्टीला पोहचला. आष्टीचे क्रांतिकारक त्यांना मिळाले. जत्थ्याचे नेतृत्व पांडुरंग सवालाखे, रामभाऊ लोहे व रिंगलीडर मोतीराम होले करीत होते. क्रांतिकारकांचा जत्था पोलीस स्टेशनवर पोहचला. मिश्रा नावाच्या ब्रिटिश दरोग्याने सर्वांना डावाने आत घेतले. रामभाऊ लोहेंचे भाषण सुरू झाले. आम्हाला शांततेने तिरंगा फडकवू द्या, अशी दरोग्याला विनंती केली. परंतु दरोग्याने ऐकले नाही. झटापट सुरू झाली. पांडुरंग सवालाखे व युवा मोतीराम होले यांना कोठडीत डांबले आणि गोळीबार सुरू झाला. पहिली गोळी डॉ. गोविंद मालपे तर दुसरी गोळी वडाळ्याच्या रामभाऊंवर झाडली पण रामभाऊला वाचविण्यासाठी त्यांचा गडी पंची गोंड चित्यासारखा समोर आला व गोळी आपल्या छातीवर घेतली. केशव ढोंगे आणि उदेभान कुबडे रामभाऊं च्या या साथीदारांचाही ब्रिटिश पोलिसांनी रक्ताचा घोट घेतला. स्वातंत्र्याच्या या लढाईत पेठअहमदपूरचा नवाब रशीदखानही शहीद झाला. एकामागोमाग एक असे पाच क्रांतिवीर शहीद झाले. जमाव विखुरला व परतू लागला. तेव्हा उशिरा पोहोचलेला खडकी परसोडा गावांचा जत्था त्यांना मिळाला. याचे नेतृत्व गुलाबराव वाघ करीत होते. कासाबाई शिंदे, अहिल्याबाई नागपुरे व मंजुळा या कर्तबगार महिला त्यांच्या सोबत होत्या. हा जत्था ठाण्याचे फाटक तोडून आत गेला तेव्हा मिश्राने खडकीच्या १६ वर्षाच्या हरीलालचा बळी घेतला. असे सहा क्रांतिवीर एकापाठोपाठ धारातीर्थी पडले. आष्टीच्या या तिरंगा क्रांतीची इतिहासात आजही सुवर्णाक्षरात नोंद आहे.

  • वीरेंद्र कडू

Web Title: Ukandya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.