कसोटी आणि तृप्ती..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 06:03 AM2020-03-08T06:03:00+5:302020-03-08T06:05:10+5:30

अनेक सुखं पावलापावलांवर जिथे उभी आहेत  अशा अमेरिका नावाच्या र्शीमंत देशातील मी तरु णी.  वयाच्या आठव्या वर्षी अकस्मात एका मैत्रिणीच्या  अरंगेत्रममध्ये भरतनाट्यम बघितले आणि या नृत्याच्या मी प्रेमातच पडले.  त्यानंतर त्या प्रेमापोटी थेट भारताच आले.  देश वेगळा, बोली वेगळी, संस्कृती वेगळी. नृत्याची भाषा तर आणखीच वेगळी. ते सारं समजून घेणं आणि नृत्यात उतरवणं फारच कठीण होतं. पण ते जमायला लागल्यावर मिळालेले अपार तृप्तीचे क्षण जगण्याला विसावा देणारे होते.

Test and contentment .. An American Bharatanatyam dancer Sophia Salingaros expresses here feelings about India and India's rich music culture | कसोटी आणि तृप्ती..

कसोटी आणि तृप्ती..

Next
ठळक मुद्देअभिजात भारतीय संगीतासाठी जीव वेचणार्‍या परदेशी साधकांच्या दुनियेत..

- सोफिया सॅलिन्गारोस
द अनहर्ड व्हॉइस.  
देवाला वाहिलेल्या देवदासींचा मूक आक्र ोश. नृत्याच्या नव्या कार्यक्र माचा नवा विषय घेऊन सुरभी भारद्वाज नावाची मैत्रीण माझ्यासमोर बसून मला देवदासी म्हणजे काय ते समजावून सांगत होती. समजुतीचे सगळे दरवाजे सताड उघडून मी तो विषय आणि देवदासींच्या त्या मला अपरिचित अशा वेदना कवेत घेऊ बघत होते. भारतीय माणसाचा देव, त्यांची अनंत रूपे आणि त्या रूपांची नृत्यातून होणारी अभिव्यक्ती हे सगळे जाणून घेण्याचा एक मोठ्ठा प्रवास सुरू होता माझा. 
भारतीय भरतनाट्यम आपलेसे करू बघणार्‍या एका अमेरिकन तरु णीचा प्रवास. एका कार्यक्र माच्या निमित्ताने देवदासी हा विषय सुरभीच्या मनात आला आणि या देशातील परंपरेचा एक वेगळा चेहरा समोर आला. समजून घेण्यास अवघड आणि काहीसा अस्वस्थ करणारा. जगण्याच्या प्रत्येक पातळीवर स्वातंत्र्याचा आग्रह धरणार्‍या माझ्यासारख्या एका अमेरिकन तरु णीपुढे या देवदासींचे जगणे अनेक प्रश्न निर्माण करीत होते आणि मी स्वत:ला परत-परत सांगत होते, ‘हे सगळे मला त्यावर कोणताही शिक्का न मारता जाणून घ्यायचे आहे. कलाकार म्हणून या स्रियांची वेदना प्रभावीपणे रसिकांसमोर मांडायची आहे.’ कोणत्या अधिकाराने मी करणार होते या विषयावर टिपणी? काळाची अनेक वादळे बघत आणि पचवत ठाम उभी राहिलेली हजारो वर्षे जुनी अशी इथली नृत्य-संगीताची परंपरा. आणि मी?. - या परंपरेचा एक भाग होऊ बघणारी, त्या निमित्ताने या देशाच्या संस्कृतीची ओळख करून घेऊ बघणारी; पण या मातीत जन्माला न आलेली एक कालची तरु णी!  त्यामुळे याही वेळी मी मार्ग निवडला अभ्यासाचा. विषय समजून घेण्यासाठी इतिहासाचे दरवाजे ठोठावले, जमतील ती, मिळतील ती पुस्तके वाचली आणि भारतीय मित्रांची मदत घेत उभी राहिले स्टेजवर. उरात कल्लोळ असलेली, पण शब्द हरवलेली देवदासी दाखवण्यासाठी.! ते करत असताना मला परत जाणवले, एक व्यक्ती म्हणून हे नृत्य मला जीवनाच्या किती अनंत तर्‍हा दाखवते आहे आणि जगाशी बोलण्याची एक नवी, सृजनशील भाषा देते आहे ते. 
हाताच्या बोटांना स्पर्शाने जाणवतील आणि आपल्या मायावी रूपाने माणसाला उभी गिळून टाकून शकतील अशी अनेक सुखं पावलापावलांवर जिथे उभी आहेत अशा अमेरिका नावाच्या एका र्शीमंत देशातील मी तरु णी. वयाच्या आठव्या वर्षी अगदी अकस्मात एका मैत्रिणीच्या अरंगेत्रममध्ये (म्हणजे काय ते तेव्हा ठाऊक नव्हते!) मी भरतनाट्यम बघितले. नृत्याची माझी समज माझ्या आईमुळे फक्त बॅले नृत्यापुरती र्मयादित होती. त्यामुळे त्या अरंगेत्रम नावाच्या कार्यक्र मात समोर जे काही चालले होते ते काहीही समजत नव्हते; पण ते फार सुंदर वाटत होते. हाताच्या अतिशय रेखीव, डौलदार हालचाली, पायातील घुंगरांचा बिनचूक नाद आणि त्यासोबत वाजणारे संगीत. वाटलं, फारच अद्भुत आहे हे सारे. आणि तिने घातलेले कपडे व दागिने? नजर कुठेही इतर ठिकाणी जाऊच नये असे मोहमयी होते ते सारे.! 
मी आधी प्रेमात पडले ते त्या दिलखेचक कपडे-दागिन्यांच्या.! लवकरच त्या मोहातून बाहेर पडले. कारण मला ते नृत्य, भरतनाट्यम माझ्या जिवाभावाचे वाटू लागले होते. सुदैवाने माझ्या राज्यात टेक्सासमध्ये मला गुरु  मिळाले. बंगलोरहून अँटोनियोमध्ये आलेले डॉ. र्शीधरा अखीबल्लू यांची मी पहिली विद्यार्थिनी झाले. मैत्रिणीचे अरंगेत्रम बघितल्यावर वर्षभराच्या आतच माझे शिक्षण सुरू झाले. तेरा वर्षं हे शिक्षण सुरू होते, याचदरम्यान मला माझ्या गावात एका वर्कशॉपसाठी आलेले गुरु  राम वैद्यनाथन यांची भेट झाली आणि त्यांनी मला भारताची वाट दाखवली. ती दाखवताना त्यांनी मला एक मोठी सवलत दिली, ती म्हणजे अमेरिकेतील माझे शिक्षण आणि भरतनाट्यम शिकण्यासाठी कराव्या लागणार्‍या भारताच्या वार्‍या या दोन्ही गोष्टी साधण्यासाठी दिलेली परवानगी. भारताच्या पहिल्या भेटीतच मला जाणवलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नृत्य-संगीताकडे बघण्याची इथल्या प्रेक्षकांची प्रगल्भ दृष्टी. फार गंभीरपणे अािण चिकित्सक आहे हा प्रेक्षक. छोटीशी चूकसुद्धा त्यांच्या नजरेतून सुटत नाही. फार धाक असतो अशा प्रेक्षकांचा आणि त्यामुळे बिनचूक, नेमके तेच मांडण्याचा प्रयत्न अनेकदा थकवून टाकतो कलाकाराला.. 
भरतनाट्यम मला आवडले, फार आवडले. - कारण? तुमच्या आसपास सदैव असणार्‍या अदृश्य दैवी, डिवाइन शक्तीबद्दल त्यात असलेली अखंड सावधानता जी तुम्हाला माणसापेक्षा अधिक काहीतरी उदात्त, विराट असल्याची जाणीव करून देत असते. तुमच्या धर्माच्या चौकशीच्या फंदात न पडता त्याच्या पलीकडे असलेल्या  आध्यात्मिकतेची तुम्हाला इथे ओळख होते. मंदिरातील देवापुढे सेवा देण्यासाठी म्हणून जन्माला आलेले हे नृत्य. त्यामुळे त्यात सर्मपण आहेच! हे सर्मपण आणि त्यातील आध्यात्मिकता व्यक्त करणार्‍या या नृत्यातील बंदिशी, त्या बंदिशीमधील पात्रांचे परस्पर नाते, या नात्याला असलेले येथील सांस्कृतिक संदर्भ आणि त्या संदर्भांबद्दल लोकांच्या मनात असलेला जिव्हाळा हे जर समजून घेतले नाही तर हे नृत्य करणे अवघड. कदाचित करणे सोपे; पण रसिकांकडून त्याचा स्वीकार होणे अवघड. त्यामुळे माझ्यासारख्या परदेशी कलाकाराने निव्वळ भारतातच नाही; जगात कोठेही, भरतनाट्यम करण्यासाठी स्टेजवर उभे राहण्यापूर्वी अगदी पक्का गृहपाठ करणे फार गरजेचे. हे समजून घेण्यासाठी मी गीतेपासून रामायण, महाभारत हे सगळे माझी गरज भागवण्यापुरते वाचत होते. लोकांमध्ये वावरताना त्या वावरण्यातून आणि व्यवहारातून जाणवणारी या देशाची मूल्ये आणि समजुती, विश्वास जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होते. या देशात जन्मलेली आणि हे सगळे संस्कार घेत वाढलेली एखादी कलाकार आणि मी. आमच्या दोघींमध्ये असलेले अंतर कमीत कमी करण्याचा हा प्रयत्न होता. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे साडी नेसायला (आणि ती तेवढय़ाच सफाईने सांभाळणे!) शिकणे, गुरु  आणि वडीलधारी मंडळी समोर आल्यावर वाकून त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करणे आणि अर्थातच (आता मला अतिशय प्रिय असलेला) कुरकुरीत डोसा काटे-चमचे बाजूला ठेवून खायला शिकणे हेही आलेच.! 
या सगळ्या प्रवासातील आणखी एक आव्हान म्हणजे, माझी भाषा. नृत्यातील हिंदी, संस्कृत भाषेतील त्या बंदिशी, त्याचा अर्थ आणि त्यानंतर त्यातून व्यक्त करायचा भाव हे सगळे समजायचे तर ती भाषा ओळखीची हवी; पण माझ्या गुरुं नी त्यावर तोडगा काढला तो भाषांतराचा. मी सादर करायच्या बंदिशी, असल्यास संवाद हे सगळे इंग्लिशमध्ये माझ्यासमोर असते आणि कार्यक्र म करण्यापूर्वी मी ते सगळे पाठ केलेले असते. कपड्यांपासून भाषेपर्यंत आणि खाण्याच्या पदार्थांपासून हवा-पाण्याच्या बदलापर्यंत, प्रत्येक गोष्टीशी संघर्ष करीत शिकत असताना या प्रवासाच्या प्रत्येक वळणावर निराशा दबा धरून बसलेली असते; पण मला वाटते ती प्रत्येकच कलाकाराच्या वाट्याला येणारी बाब आहे. नैराश्याचा हा अतिशय अवघड क्षण पार करता आला तर पुढे जाणे शक्य होते. मी असे क्षण पार करू शकले. - कारण? या नृत्याने मला दिलेले अपार तृप्तीचे क्षण. जगण्याला विसावा देणारे.. 
नृत्य आणि आरोग्याचे प्रश्न 
भरतनाट्यमने मला केवळ जगण्यातील आनंदच दिला नाही तर आधुनिक जगातील एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याची, नृत्याद्वारे तो मांडण्याची संधी दिली. आपल्या जीवनशैलीमुळे गुंतागुंतीचे होत चाललेले आरोग्याचे प्रश्न केवळ औषधांनी बरे करता येतील की पारंपरिक नृत्य त्यासाठी मदत करू शकेल, हा विचार घेऊन ‘असीम कला’ संस्था काम करते आहे. किंबहुना या विषयावर काम करण्यासाठी जगभरातील कलाकारांना ते आमंत्रित करीत आहेत. या संस्थेची शिष्यवृत्ती मला मिळाल्यावर माझ्या प्रकल्पासाठी मी असा प्रश्न निवडला, ज्याचा प्रत्येक नृत्य कलाकाराला कधी ना कधी सामना करावा लागतो; पण ज्याच्याबद्दल कोणाशीही बोलता येत नाही. नृत्यासाठी आपल्या शरीराचा डौल, वजन राखण्यासाठी कसरत करणार्‍या आणि त्यासाठी आहारावर कमालीचे नियंत्रण ठेवीत कुपोषणासारख्या आरोग्याच्या प्रश्नांना सामोरे जाणारे कलाकार ही या क्षेत्रासाठी एक चिंतेची बाब आहे. या शिष्यवृत्तीसाठी मी हाच विषय निवडला. या क्षेत्रातील तीव्र स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गरज आहे ती शरीर नावाचे माध्यम डौलदार राखण्याची. त्यासाठी शरीराला पोषणापासून वंचित ठेवणार्‍या आणि एका क्षणी कोसळून पडणार्‍या एका कलाकाराचा संघर्ष मी यात मांडला आहे. आणि काही उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. पारंपरिक कलेचे हे सार्मथ्य आधुनिक होत चाललेल्या जगाला लक्षात घ्यावेच लागेल. 

सोफिया सॅलिन्गारोस
सोफिया सॅलिन्गारोस ही भरतनाट्यमच्या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक महत्त्वाची कलाकार. भारतातील आणि जगातील सर्व प्रमुख महोत्सवांमध्ये तिने हजेरी लावली आहेच; पण याखेरीज नृत्य आणि आरोग्याचे प्रश्न यांची सांगड घालीत काही वेगळ्या प्रकल्पांसाठी ती काम करते आहे. 

मुलाखत, शब्दांकन : वंदना अत्रे 
vratre@gmail.com
---------------
(ही लेखमाला दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होईल.)

Web Title: Test and contentment .. An American Bharatanatyam dancer Sophia Salingaros expresses here feelings about India and India's rich music culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.