घागर - कशी आणि कोणी घडवली असेल ही ‘घागर’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 06:01 AM2020-01-19T06:01:00+5:302020-01-19T06:05:03+5:30

एका व्यक्तीला योग्य तेवढंच  पाणी भरून वाहून नेता येईल,  परिस्थितीनुसार ते पाणी  योग्यरितीने साठवताही येईल  अशी ‘घागर’ ‘डिझाइन’ करताना  कोणकोणते मुद्दे लक्षात घेतले असतील? 

'Study of Lota'- how and who created this?.. | घागर - कशी आणि कोणी घडवली असेल ही ‘घागर’?

घागर - कशी आणि कोणी घडवली असेल ही ‘घागर’?

googlenewsNext
ठळक मुद्दे‘डिझाइन’ची गोष्ट- घडणार्‍या, मोडणार्‍या, नव्याने घडणार्‍या,  सतत बदलणार्‍या ‘आकारां’च्या दुनियेतला  विचार आणि शास्र

- स्नेहल जोशी

भांडी. रोज वापरात येणारी वस्तू. वर्षानुवर्षे आपल्याबरोबरीने आपल्या कुटुंबाचा भाग बनलेली असतात; मग ते बारश्या-मुंजीला आजीने दिलेलं चांदीचं भांडं असो किंवा नवीन घर थाटताना आपण हौसेने आणलेली ताटं-वाट्या असोत. काही भांडी तर कित्येकदा कुटुंबाची ओळखसुद्धा बनून जातात. ताट-वाट्या, पराती, कढया, पातेली, सतेली, लोट्या, कळश्या या सगळ्यांमध्ये भारताची अशी विशेष वस्तू म्हणजे ‘घागर’. भारतीय घरांमधला हा अविभाज्य घटक म्हणता येईल ! कोणत्याही खेड्यात अथवा शहरी घरांमध्ये ही ‘घागर’ दिसेलच दिसेल. कुठे तिला कळशी म्हणतात. हंडा हाही या घागरीचाच चुलत भाऊ. आपली सांस्कृतिक, प्रादेशिक आणि सामाजिक विविधता सामावून घेतलेली ही ‘घागर’ आपल्या वस्तू जगताचा ल.सा.वि ठरतो.
(‘डिझाइन’च्या अभ्यासकांच्या जगात मात्न या घागरीची प्रदीर्घ आणि अत्यंत रोचक अशी केस-स्टडी ‘स्टडी ऑफ लोटा’ म्हणून प्रसिद्ध आहे ! पण आपल्या मराठी लोकांसाठी ‘लोटा’ वेगळा आणि घागर वेगळी; म्हणून इथे ‘घागर’ हाच मूळ संशोधनाशी संबंधित शब्द वापरला आहे.)
1947नंतर, स्वतंत्न भारताच्या जडणघडणीत अहमदाबादच्या साराभाई कुटुंबाचा खूप मोलाचा सहभाग आहे. भारताची सर्व क्षेत्नांत नवी ओळख निर्माण व्हावी म्हणून बर्‍याच उपक्र मांना त्यांनी चालना दिली होती. यातला एक अत्यंत महत्त्वाचा मैलाचा दगड म्हणता येईल अशी घटना म्हणजे चार्ल्स आणि रे एम्स यांची भारत भेट. पुपुल जयकर आणि गौतम साराभाई यांच्या निमंत्नणाखातर हे दोघं अत्यंत हरहुन्नरी आणि अनुभवी अमेरिकी डिझायनर्स भारतात येऊन पोहोचले. आजच्या लेखात, आपली ‘घागर’ आणि एम्स दांपत्य यांची घडलेली एक वेगळीच ओळख महत्त्वाची आहे.
भारतभ्रमण करताना, लोकांची घरं पाहताना जीवनशैलीचं निरीक्षण करताना चार्ल्स आणि रे यांनी खूप वस्तू पाहिल्या. पण त्यांना दैनंदिन जीवनाची, संपूर्णत: भारतीय म्हणून प्रभावी ओळख देणारी कोणती वस्तू अधिक भावली असेल तर ती म्हणजे ‘घागर’! इथे आपण लोटा, कळशी, घडा, मटका इत्यादी भांड्यांचा प्रतिनिधी म्हणून ‘घागर’ मानूया. खेडोपाडी रोज पाणी भरून डोक्यावरून घागरी घेऊन जाणार्‍या बायका-मुली जेव्हा चिंच आणि राखुंडी वापरून आपली घागर धुतात, तेव्हा जणू काही पितळाचं सोनं करतात.
कशी आणि कोणी घडवली असेल ही ‘घागर’? एका व्यक्तीला योग्य तेवढंच पाणी भरून, वाहून नेता येईल, परिस्थितीनुसार ते पाणी योग्यरितीने साठवताही येईल अशी ‘घागर’ ‘डिझाइन’ करताना कोणकोणते मुद्दे लक्षात घेतले असतील? अशा प्रश्नांची उत्तरं निरीक्षणातून मिळवायला सुरुवात केली. 

तिचं ‘आकारमान’ पहा - ‘घागर’ हाताळणारी व्यक्ती प्रामुख्याने स्री असते. त्यामुळे घागरीचा आकार ठरवताना साहजिकच सर्वसाधारण स्रीच्या हातांचा आकार, माप आणि त्यांची ताकदही लक्षात घेतलेली दिसते. कुठल्याही व्यक्तीच्या शारीरिक क्षमतेनुसार लहान-मोठय़ा आकाराची घागर सहज उपलब्ध होते. त्याचप्रमाणे ‘घागर’ कशीही आणि किती तरी प्रकारे वाहून नेता येते. कोणी डोक्यावर धरतो तर कोणी खांद्यावर, स्रिया कमरेच्या खोबणीत धरतात, तर काही जणी हातात धरतात. बर्‍याच घागरी एका वेळेला वाहून न्यायला एखादा गाडासुद्धा वापरला जातो. थोडक्यात काय, तिचा आकार हा तिची ‘पकड’सुद्धा खूप सुलभ करतो.
आकाराबरोबर तिचा ‘तोल’पण खूप महत्त्वाचा आहे. ‘घागर’ रिकामी असली किंवा पाण्याने भरलेली असली तरीही ती कलंडत नाही. त्याचप्रमाणे त्यातून पाणी ओतत असतानादेखील तिचा तोल सांभाळला जाईल अशाप्रकारे तिचा आकार घडवला गेलेला आहे. घागरीत पाणी भरताना, भरून नेत असताना, त्यातून पाणी ओतताना निरनिराळ्या हालचाली होतात. अशातही त्यातलं पाणी सुरक्षित राहील, डुचमळणार नाही याची काळजी घागरीचा आकार घडवताना घेतली गेली आहे.
तोल आणि पकडीचे प्रकार सांभाळायला तिच्या ‘आकाराचं परिमाण’ योग्य असणं महत्त्वाचं आहे. घागरीचे तीन भाग आहेत. पाणी साठवणारा मोठा गोल म्हणजे पोट; पोटापासून वर सर्वात निमुळता भाग म्हणजे मान आणि तिथून वर, मानेपेक्षा जरा पसरलेलं तिचं तोंड. या तिन्हीचं परिमाण ‘घागर’ वापरण्याच्या दृष्टीने खूप सुंदर साधलं आहे. सर्वांत निमुळता मानेचा भाग पोटाच्या आणि तोंडाच्या सांध्याला असल्यामुळे पाणी सहजासहजी सांडत नाही. पाणी ओतायचं असेल तरी या मानेमुळे धारेवर नियंत्नण मिळवता येतं. ‘घागर’ धुताना त्यात हात घालून विनासायास सगळीकडे फिरवता येतो. तसंच पोटाचा भाग गोलाकार असल्याने स्वच्छ करायला सोपा.
या घागरीची ‘शिल्पाकृती’ खूपच सुबक आहे. हाताच्या तळव्यावर किंवा कमरेच्या खोबणीत चपखल बसणारं असं घागरीचं शिल्प आहे. स्थिर असताना तिचा आकार लयदार आहेच आणि त्याचबरोबर चालण्याच्या लयीलाही घागरीचा आकार पूरक आहे.
‘घागर’ पितळी पत्र्याला ठोके देऊन घडवली असल्याने त्याच ठोक्यांची सुंदर ‘पोत’ घागरीला मिळते. आतून मात्न ती गुळगुळीत असते. अर्थातच त्यामुळे स्वच्छता सोपी होते आणि बाहेरून एखाद्या पैलू पडलेल्या रत्नासारखी ती दिसते.
सोन्यासारख्या लखलखीत तांब्याची किंवा पितळेची, ठोक्याने पैलू पडलेली ‘घागर’ रिती असो की भरलेली ती स्पर्शाला, दृष्टीला सुखद अनुभव तर देतेच; पण तिला एखादं भांडं लागलं किंवा जमिनीवर ठेवताना तिचा र्शाव्य अनुभवसुद्धा आनंददायी असतो.
‘घागर’ घडवण्यासाठी मुख्यत: तांब्या-पितळ्यासारख्या धातूंचा वापर केला गेला आहे. कालांतरानी जसं मिर्श धातू निर्मितीचं तंत्न विकसित झालं, तशी ‘घागर’ स्टेनलेस स्टीलची झाली, प्लॅस्टिकचीही झाली. मुख्य हेतू असा की ‘घागर’ आणि त्यात साठवलेलं पाणी यांचा एकमेकांवर परिणाम होऊ नये. पाणी निर्जंतुक आणि स्वच्छ साठवता यावं, तसंच पाण्याच्या सहवासात ‘घागर’ झिजू नये.
आपल्या दोन पिढय़ा उलटतील एवढं घागरीचं किमान आयुष्य आहे. त्याचा विचार करता तिला घडवण्यासाठी लागणारी साधन-सामग्री आणि ऊर्जा ही माफकच म्हणावी लागेल. त्याचा दुसरा भाग म्हणजे ‘घागर’ निकामी जरी झाली, तरीही त्याची मोड काही प्रमाणात खर्चाची परतफेडसुद्धा करून देते.
अशी पारंपरिक ‘डिझाइन’ असलेली घागर म्हणजे काही एका व्यक्तीची निर्मिती नव्हे. ही विलक्षण ‘घागर’ घडवण्यासाठी बर्‍याच पिढय़ांमधल्या बर्‍याच लोकांचे हात लागलेले आहेत. अनुभव गाठीशी बाळगत, नवे प्रयोग करत, जे चांगलं वाटलं ते ठेवून निरूपयोगी असेल ते वजा करून विकसित होत गेलेली ही वस्तू आहे. शेकडो वर्षे झाली, कितीतरी नवीन आकाराची भांडी आता बाजारात मिळतात; पण ‘घागर’ अजूनही बहुतांशी तशीच राहिली आहे. धातूच्या जागी प्लॅस्टिक आलं; पण आकार तोच आहे.
आजच्या काळात आणि आजच्या गतीने जर ‘घागर’ आणि त्यासारख्या जीवनावश्यक वस्तू निर्माण करायच्या असतील तर त्यांच्या निर्मितीची पद्धत कशी असायला हवी? हा सवाल चार्ल्स आणि रे एम्स यांनी भारत सरकारसमोर ठेवला आणि उत्तरादाखल ‘डिझाइन’ शिकवणारी संस्था भारतात तयार व्हायला हवी असंही सुचवलं. यातूनच अहमदाबादमध्ये ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन’ची स्थापना झाली. भारतात डिझाइनचं पर्व सुरू झालं. त्याबद्दल आपण पुढे बोलूच. तूर्तास आपल्या घरातली घागर तुम्ही आज निरखून पाहाल याची खात्नी आहे मला.

snehal@designnonstop.in
(लेखिका वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत)

Web Title: 'Study of Lota'- how and who created this?..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.