एस. एल. के.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 06:04 AM2019-05-19T06:04:00+5:302019-05-19T06:05:08+5:30

सांस्कृतिक क्षेत्नातील अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व कोण, असं विचारलं तर ‘पुल’, हे उत्तर जसं लगेच येईल, तसंच महाराष्ट्राचं औद्योगिक क्षेत्नातील लाडकं व्यक्तिमत्त्व कोण, असं विचारलं, तर ‘शंतनुराव किलरेस्कर’, हेच उत्तर येईल. प्रकाशचित्रणाच्या निमित्तानं काही वेळा माझी त्यांची भेट झाली; पण लहानसहान गोष्टींतूनही प्रत्येकवेळी मनावर ठसलं ते त्यांचं मोठेपणच !

Satish Paknikar expresses his elegant moments with great businessman Shantanurao Laxmanrao Kirloskar | एस. एल. के.

एस. एल. के.

Next
ठळक मुद्देप्रसिद्ध उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांचा २८ मे हा जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांचे एक स्मरण!

- सतीश पाकणीकर 

अवघ्या महाराष्ट्राचं सांस्कृतिक क्षेत्रातील लाडकं व्यक्तीमत्व कोण असं आजही विचारलं तर लगेच उत्तर येईल – “पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे”. याच धर्तीवर जर प्रश्न केला की अवघ्या महाराष्ट्रचं औद्योगिक क्षेत्रातील लाडकं व्यक्तीमत्व कोण तर नक्कीच उत्तर येईल – “ शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर अर्थातच एस. एल. के.! भारतातील पहिला लोखंडी नांगर, पहिला सेंट्रीफ्युगल पंप, पहिले डिझेल इंजिन, पहिली इलेक्ट्रिक मोटर, पहिले लेथ मशीन यांची निर्मिती करणारा देशातील महत्वाचा असा उद्योग समूह म्हणजे किर्लोस्कर उद्योग समूह. लक्ष्मणरावांपासून आजच्या आलोक किर्लोस्करपर्यंत पाच पिढ्यांनी घडवलेला हा उद्योग. पण यात महत्वाचा वाटा जाईल तो अर्थातच शंतनुराव किर्लोस्कर यांना. त्यामुळेच भारताच्या औद्योगिक प्रगतीच्या इतिहासात ‘किर्लोस्कर’ हे नाव ठळकपणे व आदराने घेतले जातेच पण बरोबरीने उल्लेख येतो तो शंतनुरावांचा.

१९८३ साली मी औद्योगिक प्रकाशचित्रणाची सुरुवात केली. पुण्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक वेळा शंतनुराव किर्लोस्कर यांना मी पाहिले होते. उत्तम दर्जाचा सूट, कोटाच्या खिशाला लावलेले पेन, सोनेरी काडीचा चष्मा, शर्टाच्या कॉलरखाली लावलेला डौलदार ‘बो’ आणि सस्मित चेहरा या गोष्टी कोणालाही आकर्षून न घेतील तरच नवल. पण मी त्यांचे प्रकाशचित्र तोवर टिपलेले नव्हते. मनात इच्छा मात्र प्रबळ होती. असं म्हणतात ना की “ The intensity of your desire governs the power with which the force is directed.” आणि झालंही तसंच.

एका कार्यक्रमाची जाहिरात माझ्या पाहण्यात आली. वर्किंग वुमेन असोसिएशनच्या हॉलमध्ये पंडित भास्कर चंदावरकर यांचा भारतीय अभिजात संगीत व पाश्चिमात्य संगीत यांच्या रसग्रहणाचा अनोखा कार्यक्रम होता. नुकताच माझ्या गळ्यात कॅमेरा आलेला होता. एक छोटा फ्लॅशही मी मिळवलेला होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी मी पोहोचलो. भास्करजींचा फोटो टिपण्यासाठी मी पुढे स्टेजपाशी गेलो. त्यांचा फोटो टिपला आणि वळणार इतक्यात रसिकांच्या पहिल्याच ओळीत मला यमुताई व शंतनुराव बसलेले दिसले. मी मनात ठरवले की आज त्यांना फोटोसाठी विचारायचे, पण कार्यक्रम संपल्यावर. भास्करजींच्या ओघवत्या शैलीत आणि उदाहरणांसह चाललेला कार्यक्रम दोन तासांनी संपला. रसिक पांगले. शंतनुराव काही बोलण्यासाठी भास्करजींच्या जवळ गेले. माझ्यासाठी ही संधी उत्तम होती. मीही स्टेजच्या जवळ पोहोचलो. त्या दोघांचे बोलणे चालले होते. शंतनुराव त्यांना म्हणाले -“ माझ्याकडेही पाश्चिमात्य संगीताच्या बऱ्याच रेकॉर्डस आहेत. त्या मी नेहमी ऐकतो. आता एकदा तुमच्याबरोबर ऐकू. तुम्ही वेळ काढून जेवायलाच या. मी मॉडेल कॉलनीत राहतो. ‘लकाकी’ असं माझ्या घराचं नाव आहे.” मी चकितच झालो. पुण्यातल्या समज असलेल्या कोणालाही किर्लोस्करांचे घर कोठे आहे असं विचारलं तर तर ती  व्यक्ती क्षणात ‘लकाकी’चा पत्ता सांगू शकेल. मग हे असं का सांगत आहेत? भास्करजी विनयानं म्हणाले – “ सर, मला माहित आहे तुमचं घर. मी फोन करून अवश्य तुमच्याकडे येईन. तुम्ही माझ्यासाठी असा वेळ काढणं हा माझा बहुमानच असेल.” बोलणं होताच शंतनुराव वळले आणि पुढच्या क्षणी सौ.यमुताईंची व्हीलचेअर ढकलत निघाले. त्यावेळी त्यांचे वय अंदाजे ८० च्या घरात असेल. पण ते वय त्यांच्या हालचालीत कणभरही जाणवत नव्हते. आणि ते स्वतः ती व्हीलचेअर ढकलत होते. माझी गडबड उडाली. पण तरीही मी तसाच पुढे झालो. त्यांना वाकून नमस्कार केला व म्हणालो- “ सर, मला तुमचा एक फोटो काढू द्याल का?” त्यांनी व्हीलचेअर थांबवली. मला म्हणाले- “ थांब एक मिनिट.” असे म्हणत त्यांनी त्यांचा कोट, ‘बो’ आणि पेन व्यवस्थित आहे याची खात्री केली. मंदसे हास्यही चेहऱ्यावर आले.         मग म्हणाले – “ हं, काढ आता फोटो.” मी तयारच होतो. पुढच्या क्षणाला त्यांची ती छबी मी कॅमेराबद्ध केली. त्यांनी परत विचारले – “ झालं?”  मी मान हलवली. बऱ्याच दिवसांची माझी इच्छा पूर्ण झाली होती. तीही त्यांना विचारल्यापासून दोन मिनिटात.

त्यांचे ते प्रकाशचित्र मी जेव्हा माझ्या ‘दिग्गज’ या २००५ च्या थीम कॅलेंडरमध्ये वापरले तेव्हा स्वरशब्दप्रभू अजित सोमण यांनी त्यावर ओळी लिहिल्या – ‘औद्योगिक भारताच्या मानचित्रावर महाराष्ट्राचं नाव सन्मानपूर्वक नेऊन ठेवणारा द्रष्टा उद्योजक. कुशल व्यावसायिक आणि कलाकार रसिकही!’

त्यानंतर मला बऱ्याचदा त्यांचे फोटो काढण्याची संधी मिळाली. एकदा किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड कंपनीच्या भारतभरच्या वितरकांची परिषद होती. स्थळ होते पुण्यातील हॉटेल ब्लू डायमंड. तेथील भल्यामोठ्या हॉलमध्ये परिषद सुरू झाली. स्टेजवर कंपनीतील ज्येष्ठ अधिकारी बसलेले. वितरणाच्या विविध मुद्द्यांवर वेगवेगळे वक्ते बोलत होते. श्रोत्यांच्या पाठी प्रवेशद्वाराकडे होत्या. साधारण एक तास झाला आणि अचानक स्टेजवरील सर्व अधिकारी उठून उभे राहिले. पटकन कोणालाच याचा बोध झाला नाही. सर्वांनी मागे वळून पाहण्यास सुरुवात केली. आणि काही क्षणात सारे सभागृह उठून उभे राहिले. मुख्य प्रवेशद्वारामधून नेहमीच्या ऐटीत शंतनुराव शांतपणे पावले टाकत स्टेजकडे येत होते. ते स्टेजवर पोहोचेपर्यंत सभागृहात टाळ्यांचा कडकडाट चालू होता. त्यांच्याबद्दल असलेले प्रेम, विश्वास आणि आपुलकीच्या भावना त्या टाळ्यांमधून सहजभावाने प्रकट होत होत्या.

परिषदेचा समारोप झाला. सर्व वातावरण सैलावले. वितरक घोळक्याने गप्पा मारू लागले. ब्लू डायमंडचे वेटर मद्याचे प्याले घेऊन प्रत्येकापाशी येत होते. ग्लासांचा किणकिणाट गप्पांच्या फडात रंग भरू लागला.   शंतनुराव अगत्याने वेगवेगळ्या ग्रुपजवळ जाऊन काही वेळ गप्पा मारत, विचारपूस करीत होते. त्यांच्या हातातही एक ग्लास होता. त्याभोवती पेपर नॅपकिन गुंडाळलेला होता. प्रत्येक ग्रुपमध्ये जात ते हास्यविनोदाने सर्वाना आग्रहही करत होते. ते ज्या ग्रुपमध्ये जात तेथे जाऊन मी त्यांचे व इतरांचे फोटो टिपत होतो. त्या तासाभरात शंतनुराव जवळजवळ प्रत्येकाला भेटले, बोलले. मग एका टेबलवर त्यांनी त्यांचा ग्लास ठेवून दिला. तेव्हा माझ्या लक्षात आले की त्या तासाभरात त्यांनी इतरांना कंपनी वाटावी म्हणून तो ग्लास हातात ठेवला होता. त्यातील एक घोटही त्यांनी प्यायला नव्हता. मग सर्वांचा निरोप घेऊन ते त्यांच्या आलिशान गाडीत बसून निघून गेले.

नंतर एकदा मला त्यांच्याकडच्या एका लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो काढायची संधी मिळाली. माझ्या आठवणीप्रमाणे शंतनुरावांचा नातू राहुल यांच्या विवाहानिमित्त ते रिसेप्शन होते. स्थळ होते ‘लकाकी’ बंगला. हिरवाईने वेढलेला, अवाढव्य जागेत असलेला तो सुंदर बैठा बंगला आणि त्याच्यापुढे असलेले विस्तीर्ण असे लॉन. प्रतिभा अॅडव्हर्टायझिंग ही किर्लोस्कर समूहाचीच जाहिरात संस्था. त्यातील प्रतिभावंत आर्ट डायरेक्टर श्री. रमेश तळेगावकर यांनी सर्व झाडांवर दिव्यांच्या माळा सोडून मातीच्या दिव्यांच्या व विविध फुलांच्या योजना करीत अतिशय देखणे वातावरण निर्माण केले होते. एका मोठ्या झाडाच्या पारावर उत्तम बैठक सजवली होती. त्या झाडाला सर्व बाजूनी मोगऱ्याच्या माळांनी सजवले होते. वातावरणात सर्वत्र मोगऱ्याचा धुंद करणारा सुगंध पसरला होता. रिसेप्शनची वेळ ही संध्याकाळी सात ते रात्री दहा अशी होती. मी सहालाच तेथे पोहोचलो होतो. तेथील सजावटीचे काही फोटोही काढून झाले. बरोबर सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी शंतनुराव घरातून लॉनवर आले. त्यावेळी पाहुणे कोणीच आले नव्हते. शंतनूरावांनी आम्हा उपस्थितांची चौकशी केली. चहा मागवला. मग ते त्या सजवलेल्या पारापुढे येऊन उभे राहिले. थोड्याच वेळात इतरही कुटुंबीय आले. पाहुण्यांचे येणे सव्वासात पासून सुरू झाले. काही वेळातच सर्व लॉन व परिसर पाहुणेमय झाला. पुण्यातील सर्व ‘हूज हू’ व्यक्तींची तेथे हजेरी होती. नवपरिणीत दाम्पत्य व शंतनुरावांना भेटायला काही काळ चक्क लाईन लागली होती.

सात वाजता सुरू झालेले रिसेप्शन बरोबर पावणेअकरा वाजता संपले. त्या सुमारे चार तासात शंतनुराव एकदाही खाली बसले नाहीत. मला प्रश्न पडला ‘कुठून आणत असतील ते ही उर्जा?’ आता लॉनवर फक्त किर्लोस्कर कुटुंबीय होते. इतक्यात मला फोटोला अजून एक विषय मिळाला. कोणीतरी शंतनूरावांच्याकडे त्यांच्या पणतूला सोपवले. त्याच्याशी बोबडे बोल बोलणारी शंतनुरावांची भावमुद्रा माझ्या कॅमेऱ्याने तत्काळ बंदिस्त केली. माझ्या दृष्टीने हा बोनसच होता. शंतनुरावांसह हास्यविनोदात रंगलेल्या किर्लोस्कर कुटुंबाचे काही फोटो घेऊन मी तेथून निघालो.

विश्वासार्हता व दर्जा जपण्याबरोबरच काळाच्या बरोबरीने नवे तंत्रज्ञान आत्मसात करीत आज किर्लोस्करांची पाचवी पिढी कार्यरत आहे. पूर्वजांच्या पावलावर पाऊल टाकीत आज त्यांनी जगातला सर्वात मोठा ‘ थ्री डी प्रिंटर’ तयार केला आहे. आज ते अर्ध्या अश्वशक्तीपासून - तीसहजार अश्वशक्तीचे पंप बनवतात. जे पंप भारताच्या जवळजवळ पंचवीस टक्के लोकसंख्येच्या पाण्याची गरज भागवत असतात. लक्ष्मणराव काय किंवा शंतनुराव काय त्यांच्या द्रष्टेपणाला वाहिलेली ही आदरांजलीच नव्हे काय?

sapaknikar@gmail.com                                 
(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)                           

Web Title: Satish Paknikar expresses his elegant moments with great businessman Shantanurao Laxmanrao Kirloskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.