रोल‘मॉडेल’ महात्मा गांधी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 05:36 PM2019-10-02T17:36:29+5:302019-10-02T17:36:41+5:30

‘मॉडेल’ म्हणून चक्क महात्मा गांधींनाच  समोर बसवणे आणि त्यांचे शिल्प साकारणे, ही नुसती कठीणच नव्हे, तर अशक्यप्राय गोष्ट होती. गांधीजींनीही या गोष्टीला स्पष्ट नकार दिला होता. तरीही शिल्पकार विनायक करमरकर यांनी गांधीजींना राजी केले आणि  ‘मॉडेल’ म्हणून गांधीजींचे शिल्प साकार झाले !.

Roll 'Model' Mahatma Gandhi! | रोल‘मॉडेल’ महात्मा गांधी !

रोल‘मॉडेल’ महात्मा गांधी !

Next
ठळक मुद्दे2 ऑक्टोबर ही महात्मा गांधीजींची जशी जन्मतारीख आहे तशीच शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचीही. म्हणूनच ब्रिटिशांना टक्कर देण्याचा भीमपराक्रम केलेल्या शिल्पकार करमरकरांना आजचे अनेक तरुण शिल्पकार कलाकारांमधले महात्मा असे मानतात.

- श्रीराम खाडिलकर

 कलकत्त्यात 1916मध्ये घडलेली ही घटना आहे. त्याचे असे झाले की, सुरेन्द्रनाथ टागोरांचा आग्रह मान्य करून शिल्पकार विनायकराव करमरकर मुंबई सोडून कलकत्त्याला राहायला गेले. झाऊताला भागात घर आणि जवळच स्टुडिओ थाटला. सुरुवातीला रवींद्रनाथ टागोर, अवनींद्रनाथ टागोरांशी भेटीगाठी झाल्या. रवींद्रनाथ टागोरांना समोर बसवून करमरकरांनी त्यांचे शिल्प घडवले. त्यांनी कलकत्त्यात घडवलेले ते पहिले शिल्प होते. त्यानंतर टागोर घराण्यातल्या अनेकांची शिल्प घडवली. रामकृष्ण परमहंस यांचे शिल्प घडवण्याचे मिळालेले काम त्यांनी पूर्ण केले. कलकत्त्यातल्या वास्तव्यात शिल्पकार करमरकर यांच्या हातून एकाहून एक छान कामे होत होती. त्यांच्या हातून घडलेले प्रत्येक शिल्प बोलके असायचे. त्याचवेळी कलकत्त्यामध्ये महात्मा गांधी यांची चरखा मोहीम सुरू झाली. त्यांच्यात देशप्रेम ओतप्रोत भरलेले असल्याने सूत-कताईच्या मोहिमेत आपलाही सहभाग असावा म्हणून शिल्पकार करमरकरांनी एक चरखा विकत आणून सूत-कताई सुरू केली.
महात्मा गांधी हे त्या काळातल्या अगणित राष्ट्राभिमानी आणि राष्ट्रप्रेमी भारतीयांसाठी आदर्श व्यक्तिमत्त्व होते. आजच्या भाषेत सांगायचे तर ते त्या काळात अनेकांचे रोलमॉडेल होते. हे रोलमॉडेल आपल्यासमोर बसवावे आणि त्यांचे शिल्प घडवावे असे विनायकराव करमरकरांना मनापासून वाटत होते. मात्न आपली ही इच्छा खरोखरच कधी पूर्ण होऊ शकेल असे त्यांना कधीच वाटले नव्हते. वस्तुस्थिती ही होती की अनेक गोष्टींसाठी महात्मा गांधी हेच या शिल्पकारासाठी प्रेरणास्थान होते.
शिल्पकार करमरकर आणि महात्मा गांधी यांचा सामायिक मित्न असलेल्या एका बॅरिस्टरला असे वाटत होते की करमरकरांनी थेट महात्मा गांधींना भेटून ‘आपले शिल्प मला घडवायचे आहे’, असे त्यांना सांगावे. मात्न, शिल्प घडवण्यासाठी माझ्यासमोर पोझ देऊन बसाल का असा प्रश्न गांधीजींना विचारण्याची हिंमत काही शिल्पकार करमरकर यांना होत नव्हती. अखेर त्या मित्नानेच महात्मा गांधी आणि शिल्पकार करमरकर यांची भेट घडून येईल अशी योजना केली. शिल्पकार करमरकर यांनीच प्रत्यक्ष भेटून गांधीजींना विनंती करायची असा आग्रह करून त्यांना कसेबसे तयार केले आणि शिल्पकार करमरकर चक्क महात्मा गांधींच्या भेटीसाठी निघाले.
महात्मा गांधी उघडेच बसलेले होते. त्यांचे सगळे आयुष्यच खरे तर उघड्या पुस्तकासारखे होते. पोटभर खायला आणि अंगभर नेसायला पुरेशी वस्रे नसलेल्या भारतीयांची कायम आठवण होत राहावी यासाठी आणि  देशातल्या तळागाळातल्याला शोभावे असे गांधीजींचे ते रूप होते. त्यामुळेच त्यांचे हे रूप अगदी नैसर्गिक आणि स्वाभाविकही वाटत होते. ‘मॉडेल म्हणून बसाल काय’, असे समजा आपण म्हणालो तर महात्मा गांधी आपल्याला कदाचित रागावतील, ओरडतील असेही प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी क्षणभर त्यांना वाटून गेले. तरीही नाइलाजाने एकदा मनाची हिंमत करून महात्मा गांधींना शिल्पकार करमरकरांनी मनातला विचार बोलून दाखवला. ते म्हणाले, ‘बापूजी, माझी अशी मनापासूनची इच्छा आहे की आपल्यासमोर बसून आपले एक शिल्प घडवावे.’ 
त्यावर ठाम नकार देण्यासाठी महात्मा गांधी लगेच त्यांना म्हणाले, ‘जमायचे नाही.’
त्यावेळी शिल्पकार करमरकरांच्या अंगात उसने अवसान कोठून आले होते कोण जाणे? पण, शिल्पकार करमरकर म्हणाले, ‘बापूजी, आपण नाही असे म्हणताय हे मान्य. पण, तुमचे शिल्प घडवण्याचे हे काम तुमच्याच बॅरिस्टर मित्नाने माझ्यावर सोपवले आहे.’
त्यांच्या या उत्तरावर महात्मा गांधी यांनी क्षणभर विचार केला आणि शिल्पकार करमरकरांना ते म्हणाले, ‘तुझे म्हणणे जे काही आहे ते ठीकच आहे; पण, तुला माहीतच असेल की मला कामे खूपच असतात. शिवाय मी बॅरिस्टरसुद्धा आहे. त्यामुळे मी जर तुला वेळ दिला तर माझी कामे अडतील आणि माझे आर्थिक नुकसानसुद्धा होईल. तेव्हा, अशाही अवस्थेत तुला जर माझे शिल्प घडवायचे काम जर करायचे असेल तर मी काही रक्कम आकारेन. एका तासासाठी एक हजार रु पये द्यावे लागतील. जमत असेल तर पाहा.’
शिल्प घडवण्यापासून स्वत:ची सुटका करवून घेण्यासाठीच महात्मा गांधी असे म्हणत असले पाहिजेत असे शिल्पकार करमरकरांना वाटल्यावाचून राहिले नाही. एकाही क्षणाचा वेळ वाया न घालवता शिल्पकार करमरकरांनी महात्मा गांधींना सांगितले, ‘माझ्यासाठी बसण्याचा वेळ आपण देताय त्याबद्दल तुम्ही म्हटल्याप्रमाणे एका तासासाठी एक हजार रु पये द्यायला मी तयार आहे. पण, मग असे झाल्यावर तुम्ही माझ्यासाठी एक पेड मॉडेल बनाल. शिवाय मला आवश्यक वाटेल तेवढा वेळ तुम्हाला माझ्यासमोर बसावे लागेल.’
महात्मा गांधी यांना शिल्पकार करमरकरांनी दिलेले उत्तर फारच अनपेक्षित होते. खरे सांगायचे तर आपण स्वत: आपल्याच सापळ्यात फसलो आहोत, हे गांधींच्या लक्षात आले असावे. पण, तोवर बराच उशीर होऊन गेला होता. महात्मा गांधी यांनी करमरकरांना नाइलाजाने सांगितले. ‘कितीही पैसे दिले तरी पोज वगैरे देऊन बसायला माझ्याकडे थोडाच काय; पण अजिबातच वेळ नाही. कारण, त्या वेळेमध्ये मला कोणताही व्यत्यय येऊ न देता ध्यानधारणा, तसेच आलेली पत्ने आणि इतर वाचनही करायचे आहे.’
हे सांगताना महात्मा गांधींना कदाचित किंचित रागही आला असावा. थोड्याशा रागाच्याच भरात गांधीजी म्हणाले. ‘मला ते पैसे वगैरे काहीही नकोत, ते काही मी स्वीकारणार नाही.’
महात्माजींचे हे म्हणणे ऐकून शिल्पकार करमरकर म्हणाले, ‘तुम्हाला जी काही, ज्या कुणाशी चर्चा करायची असेल ती तुम्ही करा. वाचन करा किंवा अगदी ध्यान वगैरेही करा. मी तिथे आहे हे तुम्ही साफ विसरून जा. माझ्याकडून कोणताही त्नास तुम्हाला होणार नाही असे वचन मी तुम्हाला देतो.’ 
करमरकरांनी महात्मा गांधींना त्नास होऊ न देण्याची हमीच दिली. गांधीजींना हव्या असलेल्या शांततेच्या  आश्वासनाचा परिणाम असा झाला की शिल्पकार करमरकरांना त्यांचे स्वप्न पूर्ण होणार असे चित्न दिसायला लागले.
शिल्पकार करमरकरांनी अत्यंत कमी वेळात समोर बसलेल्या महात्मा गांधींचे एक शिल्प मातीमध्ये घडवले. व्यक्तिशिल्प असे त्याला म्हणता येईल. इतर शिल्पकारांना जे जमले नव्हते ते विनायकराव करमरकर यांना सहजसाध्य झाले होते. शिल्पकार करमरकर यांच्यासाठी गांधीजी चक्क मॉडेल होऊन बसले. ठरल्याप्रमाणे त्यांना पैसेही देण्यात आले. असे पैसे गांधीजी राष्ट्रीय फंडासाठी गोळा करत असत, त्यात ते जमा झाले. महात्मा गांधी यांचा दीड फुटाहून थोडासा अधिक उंचीचा बस्ट (डोक्यापासून छातीपर्यंत) शिल्पकार विनायकराव करमरकर यांनी गांधींना समोर बसवून मातीमध्ये तयार केला.
एका विचारी माणसाचा तो चेहरा आहे असे त्यात आपल्याला दिसते. सामान्य माणसाहून थोडेसे मोठे आणि थोडेसे बाहेर आलेले कान, डोळ्यांपुढे आणि नाकावर चष्मा नसल्याने थोडेसे लांब वाटावे असे नाक अशी त्यांच्या चेहर्‍याची सगळी वैशिष्ट्ये त्या शिल्पात आहेत. गांधीजींची मान या शिल्पात किंचित खाली असल्याचे दिसत असले तरी कागदपत्नांचे वाचन सुरू असल्याने ते तसे म्हणजे खाली मान करून पाहतायत हे जाणवते. तसेच त्यावेळी त्यांच्या मनात काही विचारही चाललेले आहेत असे त्या चेहर्‍याकडे पाहून जाणवते. खरे तर तो दिवस महात्मा गांधी यांनी शिल्पकार करमरकरांनाच दिला असावा. शिल्पकार करमरकरांच्याही आयुष्यातला तो एक महत्त्वाचा दिवस होता. गांधींच्या आयुष्यात ‘रामराज्य’ हा एकमेव चित्नपट पाहिल्याचा दिवस जसा महत्त्वाचा ठरला तसाच विनायकराव करमरकर यांच्या समोर मॉडेल म्हणून बसल्यामुळे महात्मा गांधींसाठी तो दिवसही नक्कीच वेगळा ठरला असणार. आपल्या हातून घडलेले एक सर्वोत्तम शिल्प असे विनायकराव करमरकर मानत होते. आपल्याकडे असलेला तो एक फार मोठा ठेवा आहे अशी या शिल्पकाराची धारणा होती. मुंबईतल्या मणीभवनमध्ये हे शिल्प आज आपल्याला पाहायला मिळते. 
योगायोगाची आणखी एक गोष्ट म्हणजे 2 ऑक्टोबर ही महात्मा गांधीजींची जशी जन्मतारीख आहे तशीच शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचीही जन्मतारीख आहे. म्हणूनच ब्रिटिशांना टक्कर देण्याचा भीमपराक्र म केलेल्या शिल्पकार विनायकराव करमरकरांना आजचे अनेक तरुण शिल्पकार कलाकारांमधले महात्मा असे मानतात. 
shriram1@rediffmail.com                                                                                                     

(लेखक कलासमीक्षक, दृश्यकला अभ्यासक आहेत.)

Web Title: Roll 'Model' Mahatma Gandhi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.