‘स्टॉप’ नव्हे, ‘पॉज’चं बटण दाबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 06:01 AM2021-07-25T06:01:00+5:302021-07-25T06:05:02+5:30

मन भरकटतंय? स्वत:वर रागावलाहात? स्वत:लाच शिक्षा करताहात? बोल लावताहात?..

Press 'Pause', not 'Stop'! | ‘स्टॉप’ नव्हे, ‘पॉज’चं बटण दाबा!

‘स्टॉप’ नव्हे, ‘पॉज’चं बटण दाबा!

Next

- डॉ. राजेंद्र बर्वे

असं होतं माझं. सांगायला जावं तर नेमक सांगता येत नाही.. नाही, विसरते असं नाही. स्मरणशक्ती चांगली आहे माझी. ऑनलाईन क्लास घेते तेव्हा व्यवस्थित बोलू शकते. खरं म्हणजे मी एक विद्यार्थीप्रिय प्रोफेसर आहे. अत्यंत महत्त्वाच्या कामात लक्ष केंद्रित राहातं, पण काम संपलं, रिकामा वेळ आला की मन अक्षरश: भरकटत राहातं. जरा जरी काही महत्त्वाची गोष्ट समोर आली मी मनाची भटकायला सुरुवात. भटकतं तरी कुठे? काही तरी जाचक आठवणीत अडकतं, नाही तर हे पुढे असंच काही तरी घडेल असं वाटतं. त्या गोष्टींमध्ये मन हरवून जातं, अस्वस्थ होतं, असुरक्षित वाटतं. एरवी ज्या गोष्टींची काळजी वाटत नाही त्याची चिंता वाटते. मग एक मोठा पॉज!.. ‘डोळे भरून आलेत तु‌झे, होय ना!! जरा दीर्घ श्वास घे, घोटभर पाणी पी आणि बोलू लाग’, मी म्हटलं. ‘कसं रे ओळखलंस तू?’ थोडा अस्फुट हुंदका..

‘तुला असं तर नाही ना वाटलं की उद्या मला काही झालं तर तू कोणाला सांगशील? या विचारात मन भरकटलं का? तिनं पुन्हा पॉज घेतला. ‘प्रत्येक वेळी भरकटलेलं मन कुठच्या तरी निराशेच्या खडकावर आपटी खातं’, ती म्हणाली.

ही माझी जुनी मैत्रीण. हुशार आणि उत्साही. कडक शिस्तीची आणि पटकन रिॲक्ट होणारी.

‘अशा वेळी काय करतेस तू? म्हणजे मनानं आपटी खाल्ल्यावर?’

तिचा स्वर एकदम बदलला. हुंदक, सुस्कारे बंद. ‘अस्सा संताप येतो माझा मला! खरं सांगते, कधी कधी स्वत:ला चिमटा काढते, थोबाडीत मारून घ्यावीशी वाटते, स्वत:ची लाज वाटते, असं असुरक्षित वाटल्याबद्दल अपराधी वाटतं. माझ्या मनाला काय शिक्षा करू म्हणजे ते ताळ्यावर राहील? मी देवभक्त नाही, पण जप करते. स्तोत्र म्हणते तरी मनाची भरकट अवस्था संपत नाही. तोंडानं जप चालू म्हणून हातात माळ घेतली. तिचे मणी फिरताहेत पण मन.. ते निसटतं. या कोविडच्या आपत्तीने काय हाल केलेत बघ!! बरं, काय करावं अशा वेळी? - तिनं उत्सुकतेनं विचारलं.

मी म्हटलं, ‘ही कोविडकाळाचीच गोष्ट नव्हे गं. मनाचं भरकटणं. भूत-भविष्याच्या अस्तित्वात नसलेल्या जगात वास्तव्य करणं असुरक्षित वाटणं, स्वत:चा राग येणं, अपराधी वाटणं हे सध्याच्या काळात अधिक प्रकर्षानं जाणवतंय हे मात्र खरंय. कबीरजी म्हणतात ना,

माला तो कर में फिरै,

जिभि फिरै मुख माहि।

मनुवा तो दहुँ दिसि फिरै,

ये तो सुमिरन नाहिं।।

ही गोष्ट तर शेकडो वर्षांपूर्वीची आहे!

‘पण माणसाचं मन भरकटतं का?’ - तिनं विचारलं

माणसांच मन मुळात अस्थिरच असतं. असुरक्षित वाटणं स्वाभाविक आहे. माणसाचं मन म्हणजे मेंदू प्रगत झाला तो लाखो वर्षांपूर्वी. संगणकाच्या भाषेत सांगायचं झालं तर आपलं शरीर आणि मन ‘अपग्रेड’ झालेलं नाही. हे बदल उत्क्रांत होतात.

माणूस जेव्हा जंगलात होता, गुहेत राहात होता, शेती शिकत होता, तेव्हा त्याला कळलं की इतर प्राण्यांच्या मानानं तो फार कमकुवत आहे. सूक्ष्म मुंगीतही डसण्याची शक्ती असते. हरणं, ससे विलक्षण चपळ असतात. आपल्याकडे ना तीक्ष्ण वाघनखं, ना डरकाळी. आपल्याकडे स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी दाही दिशांकडे निरीक्षण करणारं मन आहे. तल्लख मन आहे. संकटाची चाहूल लागण्यापूर्वी ते पूर्वनियोजन करू शकतं. आपल्यावर हल्ला होण्यापूर्वी काही तरी बंदोबस्त करण्याची कल्पनाशक्ती ते लढवू शकतं. आपण खूप प्रगती केली, तरीदेखील कठीण काळ आला की मनातली ती असुरक्षिततेची सवय उफाळून येते. मन अस्वस्थ होऊन मागचा-पुढचा विचार करीत असतं. हा मानवी मनाचा स्वभाव आहे.

‘मग हे असंच चालत राहणार का?’, तिनं थोडं निराश होऊन विचारलं.

‘नाही, नाही, आपल्या मनाला आपण वळण लावू शकतो. त्याला वळण लावून सरळ करू शकतो. या शाब्दिक कोटीवर तिला हसूही आलं. म्हणजे ती आता सावध झाली होती.

आता खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुझी समस्या अशी आहे की तू स्वत:ला योग्य वेळी समजून घेत नाहीस. स्वत:वर रागावतेस, स्वत:चा द्वेष करतेस, शिक्षा करतेस, बोल लावतेस, स्वत:पासून दूर जातेस. स्वत:ची मैत्री तोडतेस.. उलट अशावेळी स्वत:शी समजून उमजून प्रेमानं जवळीक करायला हवी. स्वत:बद्दल अनुकंपा बाळगायला हवी. स्वत:वर मायेची फुंकर घालून सुसंवाद साधायला हवा!

‘तो कसा?’ तिनं विचारलं. (खाली चौकटीत पाहा.)

त्यापूर्वी एक छोटी गोष्ट सांगतो. तुला ठाऊक आहे. माळरानावरून शेळ्या-मेंढ्यांचा कळप घेऊन जाणारा मेंढपाळ त्यांच्याशी बोलतो. त्यांना शीळ घालून एकत्र करतो. त्याची शीळ किंवा पाण्याचे मधुर स्वर त्या मेंढ्यांना आपलंसं करतात. संकट आल्यावर कळप उधळला तर तो त्यांना काठीनं धोपटत नाही, उलट अधिक प्रेमानं शीळ घालतो. त्यांना समजेल अशा भाषेत हाकारतो. बिथरलेल्या कळपाला दिलासा मिळतो. आपण एकत्र येऊ, बरोबरीनं राहू, त्यामुळे सुरक्षित राहू हेदेखील त्याना कळतं. याचं कारण एकच. मेंढपाळ त्यांना प्रेमानं पुकारतो, चुचकारतो. लहानग्याला वाटल्यास उचलून घेतो.

आपली मनाशी मैत्री व्हावी ती अशी. प्रेमानं, सहानुभूतीनं स्वत:ला सावर आणि सांग, ‘चिडली आहेस, चुकीचं वागत आहेस. भरकटते आहेस ना, मग भानावर ये!! वर्तमानाशी जवळीक साध, आपोआप सावरशील!!

अशी करावी मैत्री!

१) ज्या क्षणी मन भरकटलं आहे, हे लक्षात येतं, तो क्षण अत्यंत मोलाचा. इथून परतीचा प्रवास सुरू होतो. लक्षात येताच, त्या क्षणी थांबायचं. ‘स्टॉप’ नव्हे, ‘पॉज’चं बटण दाबायचं.

२) आपण कसला बरं विचार करीत होतो? का बरं विचार करीत होतो? असं कसं आपलं मन डोळ्यांदेखत निसटलं? - हे प्रश्न निर्थक असतात. त्याची उत्तरं शोधू लागलो तर पुन्हा मन निसटतं आणि भरकटायला लागतं.

३) आता कसोटीचा क्षण. आपल्या मनाचा विना अट सर्वस्वी स्वीकार करायचा. असा स्वीकार कितीही वेळा करावा लागला तरी बेहत्तर. आपलं मन आपलंच रांगतं लेकरू आहे ना! त्याला धपाटा न घालता स्वीकारायचं. ‘लहान आहे अजून’ (वय कितीही असलं तरी) असं म्हणून स्वीकारायचं.

४) मन अशा रीतीने भरकटणं हा मानवी स्वभाव आहे. अगदी आपल्याला दोन हात, दोन पाय आणि दोन डोळे नि कान असतात इतकं नैसर्गिक आहे. त्याचा राग कशाला करायचा? तीन पाय, तीन हात का नाहीत असं विचारायचं नाही!

५) एक दीर्घ श्वास घेऊन प्रदीर्घ हळूहळू सोडायचा की मेंदूला अधिक प्राणवायू मिळतो आणि मन म्हणतं चला लागू कामाला!

(ख्यातनाम मनोविकारतज्ज्ञ)

drrajendrabarve@gmail.com

Web Title: Press 'Pause', not 'Stop'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.