पोहे खाणार्‍यांना कुणी ‘बिदेशी’ म्हटलं तर दोई सिरा किंवा दोईचिडय़ातली ‘मिष्टी’ भावना कशी कळेल देशाला ?

By meghana.dhoke | Published: February 2, 2020 08:00 AM2020-02-02T08:00:00+5:302020-02-02T08:00:07+5:30

बंगाल, त्रिपुरा, आसाम या राज्यात प्रसादापासून परंपरेर्पयत आणि पोट भरायचं म्हणून धावपळीत खाण्याचं स्वस्त, पौष्टिक खाद्य म्हणून चिडे-चिरे-सिरा अर्थात पोहे सर्रास खाल्ले जातात. हक्काचं पोषण म्हणून दोई-चिरे-सिरा-मुरी-केळी वेगवेगळ्या रूपांत भेटतात. चटकन पोट भरतात. त्यांना परीक्षेला बसवण्यात काय हशिल?

Poha, pohe, Chida, Chira, Sira, a different form of poha, but a great tradition of Assam & Bengal. | पोहे खाणार्‍यांना कुणी ‘बिदेशी’ म्हटलं तर दोई सिरा किंवा दोईचिडय़ातली ‘मिष्टी’ भावना कशी कळेल देशाला ?

पोहे खाणार्‍यांना कुणी ‘बिदेशी’ म्हटलं तर दोई सिरा किंवा दोईचिडय़ातली ‘मिष्टी’ भावना कशी कळेल देशाला ?

Next
ठळक मुद्दे चिडे-चिरे आणि सिरा. ते गोष्ट सांगतात, भाषा आणि धर्मापलीकडे जाणार्‍या खाद्यपरंपरेची आणि लोकजीवनाचीही! 

मेघना  ढोके 

दोई सिरा जोलपान?
- माझी आसामी मैत्रीण तिच्या घरी आग्रहानं घेऊन गेली होती. ‘जोलपान’ (जलपान) हा खास आसामी शब्द, अगत्यानं, आदरानं एखाद्याचं आदरातिथ्यं करणं, आणि पदार्थापुढं जोलपान हा शब्द जोडणं, ही खास आसमिया रीत.)
संक्रांत झाली की साधारण 16 जानेवारीला तिकडं माघ बिहू सुरू होतो. घरोघरची जोलपानाची आमंत्रणं येऊ लागतात. माघ बिहुचा जोलपान ही तर खास बात असते. तर एकदा मैत्रिणीच्या घरी गेल्या गेल्या तिचं सुरू झालं विचारणं की, आधी ‘दोई सिरा’ खातेस की जेवताना खाशील? तो मी आधीच खावा अशी तिची इच्छा दिसली.
मग एका खास पितळी सुबक भांडय़ात तो दोई सिरा आला. आइस्क्रीमचा स्टिलचा कप असतो किंवा धुपदानी असते तसं ते चकाकतं भांडं. कहोर म्हणतात त्याला. त्याच्याखाली केळीचं पान, एक सुबक बांबूचा चमचा आणि त्या भांडय़ातला पांढरा शुभ्र पदार्थ दोई सिरा. 
तोंडात घालताच कळलं की हे तर दहीपोहे. दोई म्हणजे दही आणि पोहे म्हणजे सिरा. म्हशीचं दूध बांबूच्या भांडय़ात विरजायचं. दही लागलं की मग त्यात साय घालायची मस्त घोटघोटून. मग साखर किंवा गूळ घालायचा, शक्यतो पाम गूळ. झाला तयार दोई सिरा. खाताच मस्त सुख वाटतं हा पदार्थ जिभेवर ठेवला की!
अगदी असेच; पण आंबे आणि त्यासह अननस आणि केळी, सुकामेवा घातलेले दहीपोहे मी त्रिपुरातही खाल्ले होते. त्यांचं नाव चिरे दोई आम.
माझ्या आसामी मैत्रिणीला मी तसं सांगितलं तर ती अगदीच अनास्थेने म्हणाली, धीस इज ऑथेण्टिक आसमिया बिहू जोलपान, नॉट अ बेंगॉली स्ट्रिट फुड!’
त्यावेळी मला काही कळलं नाही, आणि इतकं मस्त दोई सिरा पुढय़ात असताना बंगाली-आसामी वादात मी काही गेले नाही.
मात्र काही दिवसांपूर्वी देशभर आणि विशेषतर्‍ समाजमाध्यमांत पोह्यांचा पुरता ‘चिवडा’ झाला तेव्हा हे आसामी-बंगाली पोहे, चिरे-चिडे-सिरा हे सारं आठवत राहिलं, आणि हुरहुरही की यंदा बिहू सुरू असताना आपल्याला दोई सिरा काही खाता येणार नाही.
मुद्दा असा की, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी अलीकडेच तारा तोडला की, त्यांच्या घरी कामाला आलेले मजूर जेवण म्हणून पोहे खात होते म्हणजे ते बांग्लादेशीच होते. खरं तर विजयवर्गीय मूळचे इंदुरी, म्हणजे पोहे काय चीज असतात हे त्यांना चांगलंच माहिती असणार? ‘पोहा खाओगे क्या, भिया?’ हे चार शब्द इंदुरी भाषेत किती मोठी मायेची गोष्ट सांगतात हे विजयवर्गीयांना माहिती नसेल का; पण तरीही ते पोह्यांना बांग्लादेशी ठरवून मोकळे झाले. त्यावरून मोठा वाद झाला. समाजमाध्यमात तर ‘पोहे’ या शब्दावर हगारो पोस्ट्स पडल्या. 
आणि तेव्हाच आठवत राहिले पश्चिम बंगाल, त्रिपुरा या बंगालीबहुल राज्यांसह आसाममध्ये (बंगाली-आसामी घरांत) खाल्लेले, वारंवार भेटलेले चिडे-चिरे आणि सिरा. ते गोष्ट सांगतात, भाषा आणि धर्मापलीकडे जाणार्‍या खाद्यपरंपरेची आणि लोकजीवनाचीही! 
बंगाल हा भातखाऊ प्रदेश. बंगालीत जिला घोटी बंगाली भाषा म्हणतात त्यात पोह्यांना म्हणतात चिडे. जिला बांगाल म्हणतात त्या बंगालीत म्हणतात चिरे. आसामीत आणि सिल्हेटी बंगालीत (हे सिल्हेट फाळणीत गेलं बांग्लादेशात याची जखम अजूनही ताजीच आहे तिकडे.) म्हणतात सिरा किंवा सिरे.
तर त्यांची ही गोष्ट. आज त्रिपुरात राहणारे बहुसंख्य बंगाली हिंदू तर कोणे एकेकाळी म्हणजे फाळणीपूर्वी किंवा त्यानंतर पूर्व पाकिस्तानात आणि त्यानंतरही आत्ताच्या बांग्लादेशात राहत होते. फाळणीनं त्यांच्या माथी स्थलांतर लिहिलं. बंगाल-त्रिपुरा-आसाममध्ये ते दाखल झाले. या स्थलांतरित बंगाल्यांना ‘घोटी’ बंगाली बोलणारे  ‘दुय्यम’ मानतात. पण खानपानपरंपरा  त्यांच्यात सारख्याच आहेत. लोकप्रिय समज असा आहे की हे चिरे आणि लाल डोई (पोहे आणि पाम गूळ घातलेलं लाल दही) याचा उगम पूर्व बंगालात झाला. बंगाली घरात अनेकदा दोई चिरे (घोटी बंगालीत दोई चिडे) हे सकाळी नास्त्यालाच खाल्ले जातात. कोजागरी पौर्णिमेला होणार्‍या लक्ष्मीपूजनात मात्र या दोई चिर्‍यांना सर्वच बंगाली घरात प्रसादाचं स्थान असतं. पोहे-लाह्या-दहीदूध-खवापेढा, नारळाचा गूळ घातलेला लाडू हा प्रसाद त्यादिवशी मानाचा असतो.
हेच चित्र आसाममध्येही अनेक बंगाली आणि आसामी कुटुंबात दिसतं. आसाममध्ये तर ‘कोमल सॉल’ नावाचा एक तांदुळाचा प्रकार आहे, तो तांदूळ नुस्ताही खाता येतो. त्या तांदुळाचं दोई सिरा करतात, जे अप्रतिम लागतं. तसाच मुरमुर्‍यांचाही दही घालून पदार्थ करतात त्याला दोई मुरी म्हणतात. पोहे-मुरमुरे-दही-साखर-केळ एकत्र करूनही दोई सिरामुरी करतात. अचानक कुणी पाहुणा आला तर हा पदार्थ पटकन सहज करता येतो.

पश्चिम बंगाल, त्रिपुराप्रमाणेच आसाममधल्या बंगाली घरातही चिरे भाजा (पोह्यांचा चिवडा), मुचमुचे चिरे भाजा (पोहे तळून केलेला चिवडा), मिश्टी चिरे भाजा (साखरेच्या पाकात परतलेले पोहे), दोई चिरा मख्खा हे सारे पोह्यांचे पारंपरिक पदार्थ मधल्या वेळचं खाणं किंवा नास्त्याला म्हणून घरोघर केले जातात. चिडे पुलाव किंवा चिरेर पुलाव हा साधारण मराठी पोह्यांचा आसपास जाणारा पदार्थ; पण त्यात भाज्या, सुकामेवा, कडधान्य, गरम मसाला घातला जातो. आता तर चायनीज सॉस वगैरेही काही हौशी घालतात. आणि चायनिज चिडे पुलाव असंही त्याला रंगरूप देतात.
बंगाल, त्रिपुरा, आसाम या राज्यात असे रोजच्या खाण्यात, प्रसादापासून परंपरेर्पयत आणि पोट भरायचं म्हणून धावपळीत खाण्याचं स्वस्त, पौष्टिक खाद्य म्हणून चिडे-चिरे-सिरा सर्रास खाल्ले जातात. जे लक्ष्मीपूजनात असतात आणि बिहूतही. मध्यमवर्गासह गरीब घरात नेहमी आणि श्रीमंताच्या घरी सणावाराला, कधीमधी खाल्ले जातात. मात्र हक्काचं पोषण म्हणून हे दही-चिरे-सिरा-मुरी-केळ वेगवेगळ्या रूपांत भेटतात. चटकन पोट भरतात. या भागातल्या रोडसाईड हॉटेलांत नाही म्हणायला पुरी-बटाटय़ाची हरबरा डाळ घातलेली भाजी सर्रास मिळते, भात आणि भाज्याही. पण घरगुती नास्त्यांत मात्र हे पोहे आवजरून केले जातात.
आणि हे सारं असं असताना केवळ पोहे खाणार्‍यांना कुणी ‘बिदेशी’ म्हणणार असेल तर प्रेमळ अगत्यानं आणि मायेनं जोलपानाची आमंत्रण देणार्‍यांची ‘मिष्टी’ भावना कशी कळावी या देशाला?

*******

चिरे स्ट्रिटफुड

बंगाली फुड तज्ज्ञ आणि ब्लॉगर कल्याण कलमकर सांगतात, बंगालमध्ये नाश्त्याला दोईचिरा खाण्याची परंपरा आहेच. चिडे पुलाव ( चिरेर पुलाव असंही त्याला म्हणतात.) हा पदार्थ तसा लोकप्रियच. भाज्या, सुकामेवा घालून करतात, तो पांढरा असतो. हळद वापरत नाहीत. 
दुसरं म्हणजे बंगालमध्ये रस्त्यावर लागणारे चिर्‍याचे ठेले. पण म्हणजे भेळ नव्हे. भेळ अर्थात झालमुरी, ती वेगळी. बंगाली झालमुरी प्रसिद्ध आहेच. पण हे चिरे म्हणजे भाजलेले पोहे, त्यात शेंगदाणे, डाळ, मसाला घालून देतात. चना जोरगरम असतं तसा हा पदार्थ. हे चिरे स्ट्रिटफुड म्हणून प्रसिद्ध आहेत.
*******

भारत-बांग्लादेशात प्रतिष्ठेचा वाद


फाळणीनं जमीनीवर रेषा आखल्या तरी खाद्यसंस्कृतीचा जो सामायिक वारसा आहे, तो वाटण्या झाल्या म्हणून काही सरला-संपला नाही. खाद्यपरंपरेने चालत आलेले पदार्थ बांग्लादेशातही सणावाराला केले जातात. आणि स्ट्रिट फुड म्हणूनही विकले जातात. त्याचंच उदाहरण म्हणजे बंगाली नववर्ष बांग्लादेशातही साजरं होतं. पोहेला बोईशाख हा दिवस 14 एप्रिलला बांग्लादेशात तर भारतात 15 एप्रिलला साजरा होतो. त्यादिवसाच्या पूर्व संध्येला बांग्लादेशातही दोई चिरा हा पदार्थ केला जातो. एरव्हीही त्याचे ठेले रस्त्यावर लागतात आणि पोहे, केळ, मीठ, साखर आणि किंचित ताक घातलेला हा पदार्थ गरीबांचं खाणं म्हणून तिथंही विकला जातो. चविष्ट हिल्सा मासा कुणाचा यावरुन भारत-बांग्लादेशात प्रतिष्ठेचा वाद असताना सर्रास मिळणार्‍या या गरीबांच्या खाद्याला मात्र तिकडेही फार प्रतिष्ठा नाहीच. 

meghana.dhoke@lokmat.com
(लेखिका लोकमत वृत्तपत्र समूहात मुख्य उपसंपादक असून त्यांनी अरुण साधु स्मृती पाठय़वृत्तीअंतर्गत आसाम -एनआरसी प्रक्रिया आणि आसाममधील राजकीय-सांस्कृतिक संघर्ष यांचा विशेष अभ्यास केला आहे.)

Web Title: Poha, pohe, Chida, Chira, Sira, a different form of poha, but a great tradition of Assam & Bengal.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.