जगण्याच्या चढाओढीत सुटलं घर!.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 06:03 AM2020-05-03T06:03:00+5:302020-05-03T06:05:11+5:30

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि  कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतील नागरिकांनी राज्यात आणि बाहेरही अनेक ठिकाणी स्थलांतर केले आहे. सातार्‍यातील अनेक रहिवासी मुंबईत  माथाडी कामगार म्हणून काम करतात.  दिल्लीच्या झवेरी बाजारात अनेक सांगलीकरांचे  ‘गलई’ व्यवसाय सुरू आहेत.  पुणे, बंगलोर आणि हैदराबादच्या ‘आयटी’ क्षेत्रात अनेकांनी आपले करिअर घडवायला घेतले आहे. कोल्हापुरात तर पन्नास घरांमागे किमान एक जण परदेशात आहे. जगण्याच्या चढाओढीत इच्छेने वा अनिच्छेने स्थलांतराचा मार्ग त्यांनी पत्करला आहे. 

People left their home in the struggle of survival !.. | जगण्याच्या चढाओढीत सुटलं घर!.

जगण्याच्या चढाओढीत सुटलं घर!.

googlenewsNext
ठळक मुद्दे नोकरी, व्यवसाय किंवा मग अर्थार्जनाच्या निमित्ताने इच्छेने किंवा अनिच्छेने स्थलांतर केलेल्यांच्या विश्वात डोकावताना शहरातील जगण्याची चढाओढ आणि तितकीच गावची ओढ कोरोनाच्या निमित्ताने आढळून आली.

- प्रगती जाधव-पाटील 

मातृभूमी सोडून कर्मभूमीत विसावणं वाटतंय तेवढं खरंच सोप्पं नसतं.. नवी जागा, नव्या पद्धती, अनोळखींच्या विश्वात अंदाजानं विश्वास ठेवून एकेक माणूस जोडणं या सगळ्यासाठी प्रचंड धैर्य लागतं; पण हे वास्तव आहे. स्वत:चं गाव, आपली माणसं सोडून नोकरीच्या मागं पोरं पळतायत, मोठय़ा शहरांमध्ये अशी टिप्पणी करणं वेगळं; पण त्या पोरांच्या स्थलांतराचं दु:ख आणि त्यांनी पदोपदी केलेली तडजोड कधी समोर येतच नाही ! घेतलेल्या शिक्षणाची नोकरी न मिळणं, भौगोलिक परिस्थितीच्या र्मयादा याबरोबरच रखडलेले विकासाचे प्रकल्प ही पश्चिम महाराष्ट्रातील स्थलांतराची मुख्य कारणं आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांतील माणसे देशाबरोबरच जगात सर्वत्र विखुरली आहेत.
कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशातच लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर आपापल्या गावी जाणार्‍यांची संख्या अचानक वाढली. मोठय़ा शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर हकनाक जीव जाणार या भीतीने गावाकडं वाट्टेल तसा प्रवास करून पोहोचणार्‍यांची संख्याही आता काही लाखांमध्ये गेली आहे. नोकरी, व्यवसाय किंवा मग अर्थार्जनाच्या निमित्ताने इच्छेने किंवा अनिच्छेने स्थलांतर केलेल्यांच्या विश्वात डोकावताना शहरातील जगण्याची चढाओढ आणि तितकीच गावची ओढ कोरोनाच्या निमित्ताने आढळून आली.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांची भौगोलिक स्थिती, दुष्काळी पट्टा आणि औद्योगिक वसाहतीत असलेली शांतता या तीन प्रमुख कारणांमुळे येथील लोकांचे स्थलांतर होते. सातार्‍यातील जावळी आणि पाटण तालुक्यातील बहुतांश रहिवासी मुंबईत माथाडी कामगार म्हणून काम करतात. दिल्लीच्या झवेरी बाजारात अनेक सांगलीकरांचे गलई व्यवसाय थाटात सुरू आहेत. पुण्यासह बंगलोर आणि हैदराबादच्या आयटीमध्ये सातारा आणि कोल्हापूरकरांचे टॅलेंट पणाला लागत आहे. 
मुंबई आणि पुणे या दोन मोठय़ा शहरांनी सातारा आणि सांगली जिल्ह्याला कायम आधार दिला आहे. या महानगरांचा विकास झपाट्याने होत गेल्याने सातारा जिल्हा मागास राहिला. इथली औद्योगिक वसाहत पूर्ण मोडीत निघाली. परिणामी सातारकरांच्या हाताला काम मिळण्यासाठी त्यांना मोठय़ा शहरांमध्ये जाण्याशिवाय पर्यायच उरला नाही. शैक्षणिक क्रांतीतून अभ्यासक्रम ज्या झपाट्याने इथं पोहोचले त्या तीव्रतेने इथली औद्योगिक वसाहतही वाढावी, अशी दृष्टीच तयार झाली नाही. परिणामी मुंबईत माथाडी कामगार, रंगकाम करणारे, मेस चालविणारे, दुकानांमध्ये काम करणारे, हमाली करणारे, कशिदा काम करणार्‍यांमध्ये सातारकरांची भर पडली. पुण्यात असलेल्या आयटी कंपन्यांमध्येही सांगली, सातारा, कोल्हापूर येथून येणार्‍या तरुणाईचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
कोल्हापुरात असणार्‍या शिवाजी विद्यापीठात जवळपास सर्वच प्रकारचा अभ्यासक्रम शिकविला जातो; पण कौशल्यपूर्ण शिक्षण झाल्यानंतर नोकरीची सोय इथं नसल्याने स्थलांतराशिवाय पर्यायच उरत नाही. कोल्हापूरकरांमध्ये परदेशी असणार्‍यांची संख्या तुलनेने सर्वाधिक आहे. अगदी पन्नास घरांच्या मागे कुटुंबातील एखादा सदस्य तरी परदेशात असल्याचं चित्र कोल्हापुरात दिसतं. सातार्‍यात र्शीमंतांची वसाहत म्हणून परिचित असणार्‍या सदर बझारमध्ये असलेल्या मोठमोठय़ा बंगल्यांमध्ये निव्वळ आजी-आजोबाच राहतात, ही भीषण स्थिती आहे. सुरुवातीला वीकेण्डला येणारी मुलं नंतर ट्रॅफिक जामचं कारण सांगून महिन्याने, मग सणांना आणि त्यानंतर तर दिवाळी आणि उन्हाळा असं वर्षातून दोनदाच येतात. 
सांगली जिल्ह्यातला गलई व्यवसाय सर्वाधिक बहरला तो दिल्लीत ! हा व्यवसाय करून चार-चार पिढय़ा दिल्लीवासीय झाल्याचे अनेक दाखले इथल्या स्थानिकांकडे आहेत. कसोशीनं आणि प्रामाणिक काम करणारे सांगलीकर अशी ओळख असल्याने दिल्ली व परिसरात हजारो कुटुंबं या व्यवसायाच्या निमित्ताने वसलेली आहेत. सांगलीतील खानापूर, विटा, कडेगाव, तासगाव, आटपाडी तर सातारा जिल्ह्यातील खटाव, माण, तालुक्यातील स्थानिकांनी या व्यवसायात आपले मोठे नावही केले आहे.
सह्याद्रीची पर्वत रांग सातारा सांगली आणि कोल्हापूरमधून जाते. या पर्वत रांगांच्या पायथ्याशी वसलेल्या अनेक गावांना शेती आहे. पण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू शकेल इतकी शेती एकाच ठिकाणी नाही. डोंगर उतारावर असलेली शेती पुरेसं उत्पन्न मिळवून देत नाही, त्यात वन्यप्राण्यांपासून बचाव करण्यापेक्षा शेती न केलेलीच बरी अशी स्थानिकांची धारणा आहे. गावाकडं येऊन शेती कसणं हा पर्यायाच त्यांच्याकडे उपलब्ध नाही. शेतीतही काही नवे प्रयोग करणं, नवीन उत्पादन घेणं, त्यासाठी स्थानिकांना मार्गदर्शन करून वेगळी बाजारपेठ निर्माण करणं हा विचाराच कोणाला स्पर्शून गेला नाही. सातारा जिल्ह्यात तर टोकाची परिस्थिती आढळते. महाबळेश्वर हे थंड हवेचे, पाटण उच्चांकी पावसाचे तर माण-खटाव दुष्काळाचे तालुके आहेत. या भौगोलिक स्थितीमुळे स्थानिकांना नियमित अर्थार्जनासाठी स्थलांतरित होण्याशिवाय गत्यंतरच राहत नाही.
नोकरीच्या निमित्ताने जन्मभूमी सोडलेल्या स्थानिकांनी आपल्या गावाशी नाळ मात्र तोडली नाही. वार्षिक यात्रोत्सव, समारंभ, सुख-दु:खाचे प्रसंग याबरोबरच निवडणुकांच्या निमित्ताने त्यांचे गावाबरोबरच कनेक्शन अबाधित आहे. हे निव्वळ गावच्या यात्रेसाठी पावती करणं किंवा मत देणं एवढय़ापुरतं र्मयादित न राहता, मोठय़ा शहरांमध्ये हक्काचं ठिकाण उपलब्ध करून देण्यापर्यंतचा याचा प्रवास असतो. सातार्‍यातील अनेक दानशूरांनी मुंबईत सातारकरांची सोय करण्यासाठी स्वतंत्र खोल्या विनामोबदला राहण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. सांगलीतील गलई व्यावसायिकांच्या कुटुंबाला आधार वाटावं म्हणून आर्थिक संस्थाही सुरू करण्यात आल्या आहेत.
कोरोनाचं संकट डोक्यावर घोंगावू लागल्यानंतर मिळेल त्या मार्गाने गावाच्या दिशेने धावलेल्या अनेकांना धक्कादायक अनुभवही आला आहे. शासकीय यंत्रणेपासून लपून गावात येणार्‍यांना गावची वेस सील करण्यात आली. मोठय़ा शहरांतून आलेल्यांकडे त्यांनी अंगाखांद्यावरून कोरोना विषाणू आणल्याच्या नजरेने पाहिलं जात होतं. कधी नव्हे ते हे लोक कामाच्या टार्गेटशिवाय गावाकडं आले. मात्र, अनेकांना गावी वेगळाच अनुभव आला. जो त्यांच्यासाठी नक्कीच धक्कादायक होता. कारण, कोरोनाच्या संशयावरूनच त्यांच्याकडे पाहिले गेले. मात्र, शासकीय सोपस्कर पार पाडल्यानंतर शेवटी का असेना मायभूमीने त्यांना आपल्या कुशीत घेतले आणि आधारही मिळाला. आपल्या माणसांत राहण्याचा आनंद काही औरच हेही दिसून आलं. 

पै-पाहुणे ठरतायत आधार!
आपण गावाकडं राहिलो तरी पोराला मोठय़ा शहरात धाडायचं, अशी दुर्गम भागातील पालकांची धारणा आहे. त्यामुळे मामा, आत्या, मावशी, काका अशा जवळच्या पै-पाहुण्यांकडे जमेल त्या वयापासूनच मुलांना शिक्षणासाठी ठेवलं जातं. शिकायचा कंटाळा आला की हे मुलं कामाधंद्याला लागत. हातात पैसा येऊ लागला की तो गावाकडं काम मिळविण्याचा विचारच करत नाही, त्याची पावले आपोपच शहराकडेच वळतात, हे वास्तव आहे. 

पावसाळ्यात दरवर्षीच क्वॉरण्टाइन!
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाळ्यात तीन महिने सक्तीने घरीच थांबावे लागते. मे महिन्यातच घरात आवश्यक ते सर्व जीवनावश्यक साहित्य भरून हे स्थानिक स्वत:ला क्वॉरण्टाइन करून ठेवतात. पावसात घरांचे नुकसान होऊ नये म्हणून घराला प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून संरक्षित केले जाते. धो-धो कोसळणार्‍या या पावसात जनावरांनाही सांभाळण्याची कसरत त्यांना करावी लागते. अशीच परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, चंदगड, शाहूवाडी, गगनबावडा, सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात असते. 

pragatipatil26@gmail.com
(लेखिका लोकमतच्या सातारा आवृत्तीत उपसंपादक आहेत.)

Web Title: People left their home in the struggle of survival !..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.