फार बेकार, ही महामारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 06:03 AM2020-08-02T06:03:00+5:302020-08-02T06:05:10+5:30

पंधरा मिनिटांत भरारी पथकाने  दुकानातला सगळा माल उचलला. तो परत मागायची सोय नव्हती.  साहेबाची लहर फिरली असती, तर त्याने  पाच हजाराची पावती फाडली असती.  त्यापेक्षा माल लुटला जाणंच र्शेयस्कर होतं.

This pandemic is very dangerous !... | फार बेकार, ही महामारी!

फार बेकार, ही महामारी!

Next
ठळक मुद्दे14 दिवसांनी बरा होऊन घराकडे परत जाताना त्याने सरकारी ऑफिसबाहेर पाटी पाहिली. फूलवाल्याकडून हार घेऊन त्याने नथ्याच्या फोटोला घातला आणि हात जोडून म्हणाला, ‘साहेब फार चांगले होते. फार लवकर गेले !’

- मुकेश माचकर

‘साहेब, पाठीवर मारा; पण पोटावर मारू नका. लॉकडाऊनने वाट लावलीये धंद्याची. पाचपन्नास रुपये घ्या साहेब; पण माल उचलू नका,’ गोविंद धाय मोकलून रडत होता. पन्नाशीतला ताडमाड उंच गडी लहान पोरासारखा रडताना पाहून कोणाचंही काळीज द्रवलं असतं. पण, नथ्या काळीज द्रवणार्‍यांपैकी नव्हता. तसा असता तर भरारी पथकात इतके दिवस टिकला नसता.
‘नाटकं बंद कर 7777, आज वार कोणता तुझ्या लक्षात नाही का? आज पलीकडच्या बाजूची दुकानं उघडी राहणार, हे तुला माहिती नाही का?’ नथ्याने गोविंदच्या हातातली भेंडीची पिशवी गाडीकडे फेकली. गोपाळने ती अलगद झेलली आणि आत टाकली. ‘आज चाखण्याला भेंडी फ्राय करू कुरकुरीत,’ असा विचार त्याच्या मनात तरळून गेला.
‘साहेब, रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला फ्लायओव्हर आहे, खाली एकही दुकान नाही. आज तिकडे काय उघडं असणार साहेब,’ गोविंदने पुन्हा हात जोडून मिनतवार्‍या केल्या. 
‘आम्हाला कायदा शिकवतो का बे तू, पावती फाडू का दहा हजाराची?’ शिवाने कांद्याची छोटी गोणी पाठीवर घेतली.
‘तुम्हा लोकांना प्रेमाने सांगून समजलं असतं, तर ही वेळ आली असती का? आता बरोबर लक्षात राहील तुझ्या तारखेचं गणित,’ नथ्याची नजर दुकानात भिरभिरत होती. मग तो शिवाला म्हणाला, ‘आत फ्रूटबिट काय लपवून ठेवलंय का बघ? शिरसाट साहेबांनी सफरचंद मागवलीत.’
‘फ्रूट नाही आणलेली साहेब.’ गोविंद म्हणाला.
‘तू गप उभा राहा. आम्ही बघतो काय आहे नि काय नाही ते.’ 
पंधरा मिनिटांत नथ्याच्या भरारी पथकाने दुकानातला पाच हजाराचा माल उचलला होता. तो परत मागायची सोय नव्हती. मोठय़ा साहेबाकडे रडून भेकून परत मिळवला असता तरी हजाराचा माल हाती लागला नसता. शिवाय साहेबाची लहर फिरली असती, तर त्याने पाच हजाराची पावती फाडली असती, नाहीतर दोन-चार हजाराला कापला असता. त्यापेक्षा माल लुटला जाताना पाहणंच र्शेयस्कर होतं.
नथ्या सगळ्या भाजीवाल्यांमध्ये, टपरीवाल्यांमध्ये बदनाम होता. त्याला कोणाचीही, जराही दयामाया वाटायची नाही. त्याचं पथक येईल तेव्हा तो बोलेल तो कायदा मानायला लागायचा. मागे एकदा रघुरामने त्याच्याशी वाद घालण्याचा प्रय} केला तेव्हा सरकारी कामात हस्तक्षेप आणि सरकारी नोकरावर हात उगारला म्हणून पोलिसात कम्प्लेंट करून गुरासारखा बडवला होता त्याला. दोन महिन्यांनी जरा चालता यायला लागल्यावर रघुराम गावाला परत निघून गेला होता. ‘भाई, लाथा सगळीकडेच खायला लागणार आपल्याला, निदान आपल्या लोकांच्या तरी खातो,’ असं म्हणाला होता तो जाताना. नथ्याचा हा बदलौकिक माहिती असल्याने एकही दुकानदार पुढे आला नाही. इक्बालकडच्या 10 मुग्र्या परवाच उचलून घेऊन गेला होता तो. डिकोस्टा अंकलसारख्या सत्तर वर्षाच्या बुजुर्गाला ‘थेरड्या, अक्कल नाही का,’ असं म्हणून त्याने कोल्ड स्टोरेजमधली चिकन लॉलिपॉप, फ्रोजन मटर, फ्रेंच फ्राइज, नगेट्सची पाकिटं उचलली होती त्या दिवशी.
रिकाम्या दुकानाचं शटर ओढून गोविंद दिवसभर मुसमुसत राहिला.
दुसर्‍या दिवशी उधारीवर हजारची भाजी विकून चारशे रुपयेच हाताला लागले होते.ङ्घ धंद्यात मन लागत नव्हतं. सतत भाजी लुटणारा नथू डोळ्यांसमोर नाचत होता. संध्याकाळी शटर बंद करून पडून राहिला आणि अचानक त्याच्या घशात खवखवायला लागलंङ्घ दिवसभराची मरगळ आता थकव्यात बदलली. थंडी वाजू लागली, ताप चढू लागला, अंग दुखू लागलं. ‘अरे देवा, महामारीने गाठलं की काय,’ गोविंदच्या मनात भयशंका तरळून गेली. 
त्याचं कुटुंब त्याने गावी पाठवून दिलं होतं. उगाच आपल्यामुळे कच्च्याबच्च्यांना लागण होण्याचा धोका नाही, म्हणून त्याला बरं वाटलं, पण अशा आजारात सोबत कुणी नाही, याचं वाईटही वाटत होतं. रात्री बायकोला फोनवर त्याने काही सांगितलं नाही.
रात्रभर तो खोकत होता, शिंकत होता. लाल गमछा ओलाकिच्च झाला होता.
सकाळी उठून एक कप चहा पिऊन तो डॉक्टरकडे निघाला. नथूचा खबरी लंगडा लालू दिसल्यावर पुन्हा त्याच्या डोक्यात तिडीक गेली आणि अचानक डॉक्टरकडे जाण्याऐवजी तो माघारी फिरला. परतताना त्याने फ्रूटवाल्याला फोन लावला होता.
‘लय खुजली आली काय गोविंद तुला?’ अपेक्षेप्रमाणे नथ्या दुकानावर आला होताच, ‘परवा माल उचलला तरी किडे काय जात नाहीत. आज काय नेऊ?’
आज दुकानात काहीच माल दिसत नव्हता. गोविंद शांतपणे म्हणाला, ‘साहेब, दुकान उघडं आहे; पण माल नाही लावलेला काहीच.’ 
‘अरे तू लय बाराचा आहेस, मला माहिती आहे,’ आज मोटरसायकलवर एकटाच आलेल्या नथ्याची नजर लाल गमछात गुंडाळलेल्या सफरचंदांवर गेली. गाडी स्टँडला लावून तो आत घुसला आणि सफरचंदं त्याने उचलून घेतली. गोविंदने त्याला विरोध केला; पण त्यात दम नव्हता आणि नथ्या तसाही ऐकणार नव्हताच.
मांडीवर ओलसर गमछात बांधलेली सफरचंदं त्याने नेली आणि गोविंद सरकारी दवाखान्याकडे निघाला.
14 दिवसांनी बरा होऊन घराकडे परत जाताना त्याने सरकारी ऑफिसबाहेर ती पाटी पाहिली. जवळ उभ्या फूलवाल्याकडून 20 रुपयांचा हार घेऊन त्याने नथ्याच्या फोटोला घातला आणि हात जोडून म्हणाला, ‘साहेब फार चांगले होते. फार लवकर गेले. ही महामारीच फार बेकार आहे !’

mamnji@gmail.com
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)

चित्र : गोपीनाथ भोसले

Web Title: This pandemic is very dangerous !...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.